प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळासारखे शाश्वत राष्ट्र अपेक्षित ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
सांगली : प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात राज्यव्यवस्था आदर्श तर होतीच; पण ती शाश्वतही होती. आजही तिचा उल्लेख केला जातो आणि भविष्यातही सहस्रो वर्षे या आदर्श राज्यव्यवस्थेचा उल्लेख केला जाईल. अशी शाश्वत राज्यव्यवस्था म्हणजेच ईश्वरी राज्य आपल्याला निर्माण करावयाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्याचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते ‘हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. ११ आणि १२ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरिदास भवन येथे हिंदूसंघटक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेसाठी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, ईश्वरपूर येथील ५० धर्मप्रेमी उपस्थित आहेत.
प्रारंभी श्री. पुरुषोत्तम रेपाळ यांनी शंखनाद केला. हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे आणि सौ. विद्या जाखोटिया यांनी ‘साधनेचे महत्त्व अन् प्रत्यक्ष प्रयत्न’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनीही उपस्थित धर्माभिमान्यांचे प्रबोधन केले.
क्षणचित्र – उपस्थित धर्माभिमान्यांमध्ये वीरश्री निर्माण होऊन त्यांच्याकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’, अशा घोषणा उत्सफूर्तपणे दिल्या गेल्या.