सांगली येथे दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेचा उत्साही वातावरणात समारोप
सांगली : वर्ष २००२ मध्ये रोवलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. विविध प्रसिद्धीमाध्यमांनी समितीच्या विरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रत्येक वेळी समितीने पत्रकार परिषद, तसेच सामाजिक माध्यमांद्वारे वस्तुस्थिती मांडली. यामुळे आता प्रसिद्धीमाध्यमे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची नोंद घेत आहेत. ही कार्यशाळा अर्पणदात्यांवरच पार पडत असून त्यासाठी आम्ही या कार्यातून समाजऋण फेडत आहोत, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते ११ आणि १२ जानेवारी या दिवशी हरिदास भवन येथे आयोजित हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेच्या समारोपीय सत्रात बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनीही उपस्थितांना संबोधित केले. दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सर्वच धर्मप्रेमींनी झोकून देऊन राष्ट्र आणि धर्म कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि ग्रामबैठका यांसह विविध उपक्रमांत सक्रीय होण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !
८ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभा, ७ ठिकाणी ग्रामबैठका, ४ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग, विविध सण-उत्सव यांच्या हस्तपत्रकांचे ठिकठिकाणी वितरण करणे, सनातन प्रभातच्या नियतकालिकांचे वर्गणीदार करणे, तसेच राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेणे, अशा राष्ट्र आणि धर्म जागृती यांच्या विविध उपक्रमांत सक्रीय होण्याचा निर्धार धर्मप्रेमींनी या प्रसंगी केला.
द्वितीय दिवशी झालेल्या घडामोडी
१. श्री. मनोज खाडये यांनी सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या स्थूल अन् सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक कार्याचा परिचय करून दिला.
२. गटचर्चेत शिबिरार्थींनी स्वयंस्फूर्तीने भाग घेतला. येणार्या काळात राष्ट्र आणि धर्म जागृतीच्या विविध उपक्रमांत कृतीशील सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. धर्मप्रेमींना बोलण्यासाठी विविध विषय देण्यात आले होते. त्यात प्रत्येकाचा सहभाग आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता.
३. शिबिरार्थींना स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेचा उद्देश आणि लाभ यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
साधनेच्या प्रयत्नांविषयी शिबिरार्थींनी व्यक्त केलेले मनोगत
१. श्री. भगवान गुरव, ग्रामपंचायत सदस्य, कुमठे (वय ६१ वर्षे) – ग्रामस्थांना कुलदेवता आणि दत्त यांच्या जपाचे महत्त्व सांगितले आहे. मी त्यांच्या साधनेचा आढावा घेतो. तेथील ५० ग्रामस्थ साधना करतात. (श्री. गुरव यांचे प्रयत्न कौतुकास्पद आणि तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत ! – संपादक)
२. श्री. संतोष पाटील, कुमठे – कुमठे गावात ३ सत्संग, तर ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कांचपूर गावात धर्मशिक्षणवर्ग चालू आहे. आमचे संपूर्ण कुटुंब साधनेत आहे.
३. सौ. शिल्पा पाटील, तासगाव – सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे मी सेवा करते. यातून आमचे ३० हून अधिक नातेवाईक जोडले आहेत.
शिबिरार्थींनी समारोपप्रसंगी व्यक्त केलेले मनोगत
१. श्री. गणेश बुचडे आणि सौ. सीमा देसाई – कार्यशाळेतून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून समाजाला साधनेचे महत्त्व पटवून देऊ.
२. श्री. मयुर चव्हाण – समाजात हिंदु धर्माचे महत्त्व सांगीन.
३. श्री. विजय पाटील – श्री. मनोज खाडये यांनी सांगितलेले विचार आत्मसात करून ते प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करीन.
४. श्री. वैभव खोत, जुळेवाडी – शिस्तीचे महत्त्व आणि सर्वांचा आदर कसा करावा, हे शिकायला मिळाले.