सर्वांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारी राज्यव्यवस्था म्हणजे ‘ईश्वरी राज्य !’ – हृषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती
बेळगाव : ‘मेरूतंत्र’ या धर्मग्रंथात दिलेल्या ‘हीनं दूषयति इति हिन्दुः ।’ या व्याख्येनुसार जो रज-तमात्मक हीन गुण आणि त्यांमुळे घडणारी कायिक, वाचिक अन् मानसिक स्तरांवरील हीन कर्मे यांचा त्याग करतो, म्हणजेच सात्त्विक आचरण करतो, तो ‘हिंदु’ असतो. अशी सत्त्वगुणी व्यक्ती ‘मी आणि माझे’ असा संकुचित विचार त्यागून विश्वाच्या कल्याणाचा विचार करते. संक्षिप्तपणे सांगायचे झाल्यास सामाजिक उन्नतीसाठी व्यक्तीगत स्वार्थाचा त्याग करून कोणताही भेदभाव न करता सर्वांच्या कल्याणासाठी कार्यरत असणारी राज्यव्यवस्था म्हणजे ‘हिंदु राष्ट्र !’ अर्थात् ‘ईश्वरी राज्य’ होय ! कालमाहात्म्यानुसार त्याची स्थापना होणारच आहे. त्यामुळे धर्मप्रेमींनी ही संकल्पना समजून घेण्याची नितांत आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी केले. छत्रेवाडा, अनसुरकर गल्ली, बेळगाव येथे १८ आणि १९ जानेवारी या दिवशी जिल्हा हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी श्री. हृषिकेश गुर्जर अधिवेशनाच्या उद्देशाच्या प्रारंभी सत्रात बोलत होते. या अधिवेशनासाठी अनेक धर्मप्रेमी उपस्थित आहेत.
अधिवेशनात सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेला संदेश हिंदु जनजागृती समितीचे श्री. काशिनाथ प्रभू यांनी वाचून दाखवला. राष्ट्र आणि धर्म यांची सद्यस्थिती यांविषयी अधिवक्ता मोहन मावीनकट्टी यांनी माहिती दिली. दोन दिवस चालणार्या या अधिवेशनात धर्मप्रेमींसाठी विविध विषयांवर उद्बोधन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.