हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान द्या ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
धुळे : धर्मकार्य करायचे असेल, तर साधनेने आध्यात्मिक बळ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. साधनेचे अनेक मार्ग आहेत. त्यांपैकी ‘गुरुकृपायोग’ हा ईश्वरप्राप्तीसाठीचा विहंगम मार्ग आहे. ‘गुरुकृपा संपादन करण्यासाठी प्रत्येकाने गुरूंना अपेक्षित अशा हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्यात स्वतःचे योगदान द्यायला हवे’, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते कार्यशाळेच्या प्रथम उद्बोधन सत्रात ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर बोलत होते. हिंदूसंघटन आणि हिंदुत्वनिष्ठांमध्ये कुटुंबभावना निर्माण करणे अशा उद्देशाने येथील ‘श्रीकृष्ण रिसॉर्ट’मध्ये एक दिवसाची ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ घेण्यात आली. या कार्यशाळेस श्रीकृष्ण रिसॉर्टचे मालक श्री. कल्पेश अग्रवाल, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.
शंखनाद करून कार्यशाळेला प्रारंभ झाला. वेदमूर्ती श्री. कुणाल देशपांडेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
क्षणचित्रे
१. धुळे येथे २२ डिसेंबरला हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. त्यानंतर धर्मप्रेमींसाठी विविध ठिकाणी ७ दिवसांचे प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये हिंदु जनजागृती समितीवर विश्वास ठेवून धुळे शहरातील स्वामी नारायण कॉलनी, शिव कॉलनी, तसेच लळींग, प्रभातनगर, काळखेडा, रानमाळा येथील धर्मप्रेमी आवर्जून आले होते.
२. आपापली महत्त्वाची वैयक्तिक कामे बाजूला ठेवून सर्व हिंदुत्वनिष्ठ या कार्यशाळेत सहभागी झाले.
३. कार्यशाळेत ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा वीरश्री निर्माण करणार्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते.