नगर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नगर : भोपाळ येथे नुकत्याच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात वाटण्यात आलेल्या ‘वीर सावरकर -कितने वीर?’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती आणि देशात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हेतू असावा, अशी शंका येते. त्यामुळे या पुस्तकावर बंदी घालावी, तसेच या पुस्तकाचे संपादक आणि लेखक यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष गवळी यांनी केली. ते येथील तहसील कार्यालयासमोर हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तात्काळ ‘भारतरत्न’ घोषित करण्यात यावा’ अशीही मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.
आंदोलनामध्ये ‘प्रजासत्ताक दिनानिमित्त कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नयेत’ याविषयी प्रबोधन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन यांनी या वेळी ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत हिंसाचार करणार्या समाजकंटकांकडून सार्वजनिक संपत्तीची हानीभरपाई वसूल करावी’, अशी मागणी केली. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली.
वीर सावरकरांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही ! – महावीर कांकरिया, अध्यक्ष, वन्दे मातरम् ग्रुप
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कित्येक यातना भोगल्या. अशा वीर सावरकरांचा अशा प्रकारे केला जाणारा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही.