खेड येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ३५०० धर्माभिमान्यांची उपस्थिती !
खेड : हिंदु जनजागृती समितीकडून घेतली जाणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ही केवळ सभा नाही. या माध्यमातून हिंदूंना संघटित करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे. या सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राविषयी सातत्याने सांगितले जात आहे. हासुद्धा एक प्रकारच्या स्वातंत्र्यसमराचाच भाग आहे. आपल्या पिढीने हिंदु राष्ट्रासाठी त्याग केला, तरच पुढील पिढीपर्यंत हिंदु राष्ट्राचा विचार जाईल. त्यामुळे आता केवळ एकच लक्ष, ‘हिंदु राष्ट्र’ ! असे उद्गार सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी काढले.
१९ जानेवारी या दिवशी येथील एस्.टी. आगाराच्या गोळीबार मैदानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला त्या संबोधित करत होत्या. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे गुजरात, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागाचे समन्वयक श्री. मनोज खाडये आणि हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी उपस्थित होत्या. या सभेला ३५०० धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती लाभली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रारंभ सनातनचे साधक श्री. ज्ञानदेव पाटील यांनी शंखनाद करून केला. त्यानंतर सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपिठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांनी हार घातला. त्यानंतर वेदमंत्रपठण करण्यात आले. वेदमूर्ती सर्वश्री प्रवीण वैद्य, विनायक जोशी आणि योगेश जोशी यांचा सत्कार हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिकांत घाणेकर यांनी केला. या सभेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. जरळी आणि त्यांचे सहकारी यांनी स्वरक्षण प्रात्यक्षिके सादर केली.
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, ‘‘ १०० कोटी हिंदूंच्या देशात हिंदूंच्या हालअपेष्टांना न्याय्य आवाहन देणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ हे एकमेव वृत्तपत्र आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांमध्ये हिंदू अनेक हालअपेष्टा सहन करत आहेत. त्यांचेही रक्षण झाले पाहिजे. हिंदु राष्ट्र हे मानवासह झाडे, पशू, पक्षी आदींचाही उद्धार करणारे राष्ट्र असेल आणि असे राष्ट्र वर्ष २०२३ मध्ये अवतरणारच आहे. अशा हिंदु राष्ट्राविषयी आम्ही समाजाला जागृत करतो; म्हणून आम्हाला आतंकवादी ठरवले जाते. जे अपराध आम्ही केले नाहीत, त्यामध्ये आम्हाला गोवले जाते. आरोपी सापडत नाहीत; म्हणून आमच्यावर खोटे आरोप केले जातात. त्या सर्वांना मला एवढेच सांगायचे आहे की, आमच्यावरील खटले त्वरित चालू करा, या अग्नीदिव्यातून जाण्यासाठी सनातनचा प्रत्येक साधक सिद्ध आहे.
वर्ष २०२३ मध्ये येणार्या हिंदु राष्ट्रासाठी धर्म आणि राष्ट्र यांचा स्वाभिमान असणे आवश्यक आहे. पाश्चात्त्यांच्या विकृतीनुसार आपण केव्हा आचरण करू लागलो, हे आपल्याला कळलेच नाही. आपल्या ऋषिमुनींनी घालून दिलेले आचारधर्म आपण विसरलो. आता ते पुन्हा आठवायला हवेत. आम्ही आचारर्ध पाळला आणि धर्माचरण केले, तर ईश्वर आपल्याला साहाय्य करील आणि त्यामुळे ईश्वर आपल्याला हिंदु राष्ट्र लवकर देईल.’’
प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन ते पूर्ण करण्याचा निर्धार करावा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
वर्ष १९९० मध्ये आजच्या दिवशी, म्हणजे १९ जानेवारीला (ही सभा १९ जानेवारी या दिवशीच झाली.) धर्मांधांनी हिंदूंना ‘काश्मीर सोडा, मरा किंवा इस्लाम स्वीकारा’, अशी धमकी दिली. यामुळे काश्मीरमधील साडेचार लाख हिंदू विस्थापित झाले, तर तब्बल ९० सहस्र हिंदूंची कत्तल करण्यात आली. आज ३० वर्षांनंतरही काश्मिरी हिंदू स्वतःच्याच देशात विस्थापितांचे जीवन जगत आहेत. आता हिंदू संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करतील आणि ते निर्वासित म्हणून नव्हे, तर कल्याणकारी राजा म्हणून जीवन जगतील.
प्रत्येक हिंदूने हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे पवित्र ध्येय घेऊन ते पूर्ण करण्याचा निर्धार केला पाहिजे. हिंदु कोणाला म्हणायचे ? छत्रपती शिवाजी महाराज असोत, छत्रपती संभाजी महाराज असोत किंवा आपला वैदिक सनातन धर्म असो, यांचा जयजयकार करायला जो डगमगत नाही, तो हिंदु होय. स्वत:च्या मातृभूमीला वंदन करतांना ‘वन्दे मातरम्’ असे शब्द ज्याच्या तोंडात येतात तो हिंदु होय. ओवैसी बंधू म्हणतात, ‘‘या देशाची वाटचाल हिंदु राष्ट्राकडे चालू आहे आणि मुसलमानांवर अत्याचार चालू आहेत.’’ उलट अन्य देशांच्या तुलनेत या देशात सर्वाधिक सुरक्षित जर कोणी असेल, तर ते मुसलमान आहेत. मी याच व्यासपिठावरून तुम्हा सर्वांच्या साक्षीने सांगतो की, या देशाची वाटचाल हिंदु राष्ट्राच्या दिशेने होणारच आहे आणि वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची पहाट होणारच आहे. आता कोणीही ती रोखू शकत नाही.
स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्त्री शक्तीचे संघटन आवश्यक ! – अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी, रणरागिणी शाखा
हिंदु धर्मात स्त्रियांना महत्त्वाचे, आदराचे आणि देवतेचे स्थान देण्यात आले आहे. हिंदु स्त्री राष्ट्राचे नेतृत्वही करते. याशिवाय धनाची देवता श्रीलक्ष्मी, स्वयंपाकगृहाची श्रीअन्नपूर्णा माता, दैत्यांचा संहार करणारी श्री शाकिनी-डाकिनी देवी आहे. असे असतांनाही याच भूमीत आज महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे आता देवीची उपासना करण्याची आवश्यकता आहे. रामराज्यात अंगभर दागिने घालून रात्री १२ वाजताही स्त्री एकटी फिरत असे. आज मात्र सकाळी बाहेर पडल्यावर सायंकाळी ती सुखरूप घरी येईल, याची शाश्वती राहिलेली नाही. नैतिकतेचा होत असलेला र्हास आणि पाश्चात्त्यांचे अंधानुकरण, ही या समस्येमागील महत्त्वाची कारणे आहेत. या समस्येला सामोरे जाण्यासाठी, राष्ट्राप्रतीचे आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी, तसेच स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी स्त्री शक्तीचे संघटन आवश्यक आहे.
आज आपल्याला धर्माचरणाचे महत्त्व कोणी सांगितलेले नाही. स्त्रियांनी भ्रूमध्यावर लावलेल्या कुंकवामुळे देवीतत्त्व जागृत होते, हातातील बांगड्यांमुळे मनगटातील शक्ती वाढते. थोडक्यात कार्य करण्यासाठी शक्ती मिळते. पायातील पैंजणांमुळे वातावरणातील शुद्धी होते आणि असे धर्माचरण केल्यानेच देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. देवीतत्त्व जागृत झाल्यामुळे आपण कोणत्याही प्रसंगाला ठामपणे सामोरे जाऊ शकतो.
संत सन्मान आणि धर्मप्रेमींचा सत्कार
व्यासपिठावरील सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचा सन्मान मुंबके, खेड येथील धर्माभिमानी सौ. पूनम सालेकर यांनी केला.
हिंदु जनजागृती समिती रणरागिणी शाखेच्या अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांचा सत्कार सनातन संस्थेच्या सौ. मधुमती कदम यांनी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये यांचा सत्कार धर्मप्रेमी श्री. अनिल काटकर यांनी केला.
सभास्थळी उपस्थित असलेले सद्गुरु सत्यवान कदम, पू. श्रीकृष्ण आगवेकर आणि ह.भ.प. गणपत महाराज येसरे यांचा सन्मान भिलारे आयनी येथील धर्मप्रेमी श्री. राजेंद्र भिलारे यांनी केला.
पू. स्नेहलता शेट्ये यांचा सन्मान धर्मप्रेमी सौ. रसिका भिलारे यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह श्री. महेश सातपुते, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खेडचे श्री. प्रशांत खातू यांचा सत्कार सद्गुरु (कु.) स्वाती खाड्ये यांनी केला.
…आणि एकाच वेळी चालू झाले सहस्रो ‘मोबाईलचे टॉर्च’ !
हिंदु राष्ट्रासाठी जनजागृती करावी लागेल. गावागावांतून संघटित होऊन वैध मार्गाने आंदोलने करावी लागतील. गावातील हिंदु बांधवांना तालुका, जिल्हा स्तरावर आंदोलनासाठी यावे लागेल, असे सांगून यासाठी सिद्ध असलेल्यांना ‘मोबाईलचा टॉर्च’ चालू करून वर धरण्यास सांगितल्यावर सहस्रो जणांनी ‘टॉर्च’ चालू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.