जाकादेवी येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ५५० धर्मप्रेमींची उपस्थिती
रत्नागिरी : आज आपण ज्याला हिंदु धर्म या नावाने ओळखतो त्याचे एक नाव आहे ‘सनातन वैदिक धर्म’. सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत जे अन्य २ धर्म आपल्याला ठाऊक आहेत. त्यातील एक म्हणजे ‘ख्रिस्ती’ धर्म आणि दुसरा मुसलमानांचा ‘इस्लाम’ धर्म होय. आज संपूर्ण जगात ख्रिस्ती धर्म असलेली १५७ राष्ट्रे आहेत, इस्लाम धर्मियांची ५२ राष्ट्रे आहेत, बौद्ध धर्मियांची १२, तर केवळ ६६ लाख ज्यू धर्मियांचे इस्रायल नावाचेही स्वतंत्र राष्ट्र आहे. हिंदूंचे मात्र आज एकही राष्ट्र नाही. खरे तर हिंदू बहुसंख्यांक भारत आणि नेपाळ ही २ राष्ट्रे धर्मनिरपेक्ष म्हणजेच सेक्युलर बनवली आहेत. जसे ज्या राष्ट्रात ख्रिस्ती बहुसंख्यांक ती ख्रिस्ती राष्ट्रे, ज्या राष्ट्रात मुसलमान बहुसंख्यांक ती इस्लामी राष्ट्रे, तसे ज्या राष्ट्रात हिंदु बहुसंख्यांक आहेत ते राष्ट्र म्हणजे ‘भारत’ हा हिंदु राष्ट्र व्हायला हवा होता; परंतु तसे घडले नाही. म्हणूनच आज आम्हा हिंदूंवर अन्याय केला जातो. हा अन्याय दूर करण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार, १९ जानेवारी या दिवशी जाकादेवी हायस्कूलच्या सभागृहात ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा पार पडली. या सभेला संबोधित करतांना श्री. विनय पानवळकर बोलत होते. या सभेला ५५० धर्मप्रेमींची उपस्थिती होती.
या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा आरंभ शंखनाद करून करण्यात आला. या नंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर आणि सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर यांनी दीपप्रज्वलन केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय हिंदु जनजागृती समितीच्या कु. नारायणी शहाणे यांनी करून दिला. सूत्रसंचालन कु. मिथिला वाडेकर यांनी केले.
श्री. विनय पानवळकर पुढे म्हणाले, ‘‘धर्मनिरपेक्ष देश या अर्थाने सर्वांना समानता असणे अपेक्षित होते; मात्र तसे खरेच होते का ? मुसलमानांना हज यात्रेसाठी २० टक्के अनुदान दिल जाते, तेच हिंदुंचा कुंभमेळा असतांना मात्र ‘प्लॅटफॉर्म तिकिट’ १० चे २० रुपये करून वाढवले जाते, प्रयाग यात्रेवर ४० टक्के अधिभार वाढवला जातो. हे धर्मनिरपेक्ष राष्ट्रात चालू आहे. हे रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.’’
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी धर्मशिक्षण घ्यावे ! – दैवेश रेडकर, सनातन संस्था
राष्ट्र आणि विश्व कल्याणासाठी कार्यरत सत्त्वगुणी लोकांचे राष्ट्र म्हणजे हिंदु राष्ट्र्र होय, अशी हिंदु राष्ट्राची व्याख्या आहे. मनुष्य सत्त्वगुणी त्याच वेळी होऊ शकतो, ज्या वेळी तो धर्माचरण करेल. धर्माच्या आचरणामुळे धर्माचे चैतन्य मिळते आणि या चैतन्यामुळेच मनुष्य सत्त्वगुणी होतो. जगामध्ये ‘हिंदु धर्म’ हा एकमेव धर्म आहे की, जो मनुष्याला सत्त्वगुणी होण्यास साहाय्य करतो. त्यामुळे सर्व हिंदूंनी हिंदु राष्ट्र्र स्थापनेसाठी धर्माचरण करावे, असे आवाहन सनातन संस्थेचे दैवेश रेडकर यांनी केले.
धर्माचरणासमवेत साधनेचीही आवश्यकता आहे. साधना केल्यामुळे आत्मबल जागृत होते. शिवाजी महाराजांनीही साधना केली होती. त्यांना संत आणि ईश्वर यांचे आशीर्वाद मिळाले असल्यानेच त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याच धर्तीवर आजच्या काळात साधना करून हिंदु राष्ट्र्र निर्माण करायला हवे.
सत्कार
वक्ते श्री. विनय पानवळकर आणि श्री. दैवेश रेडकर यांचा सत्कार सनातन संस्थेचे श्री. सुरेश घाणेकर यांनी केला. रत्नागिरी तालुक्यातील वरवडे येथील ह.भ.प. शरद बोरकर महाराज या सभेला उपस्थित होते. त्यांचा सत्कार जाकादेवी येथील सनातन संस्था श्री. गजानन खडसे यांनी केला.
क्षणचित्रे
१. सभेच्या शेवटी उपस्थितांना श्री. विनय पानवळकर यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा दिली.
२. स्वरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. वसंत दळवी आणि त्यांचे सहकारी श्री. नीलेश नेने, श्री. नीलेश शेट्ये, कु. नारायणी शहाणे, कु. नयना दळवी यांनी सादर केली.
साहाय्य
१. ही सभा यशस्वी होण्यासाठी धर्मप्रेमी श्री. मोहन शिवगण यांचे मोलाचे साहाय्य लाभले. यांनी सभेच्या बैठका आयोजित करणे, सभागृह स्वच्छता आदी सर्व प्रकारे साहाय्य केले.
२. मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. नाना मयेकर यांनी सभेसाठी जाकादेवी हायस्कूलचे सभागृह उपलब्ध करून दिले.