वर्धा : आमच्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. आमचे धर्मपुरुष हे सारे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्रपुरुषही धर्म पाळणारे आहेत. आम्ही देवतांचे चरण धुतांनासुद्धा ‘या राष्ट्राला बळ प्राप्त होवो’, असा मंत्र म्हणतो. मंत्रपुष्पांजलीमध्येही ‘समुद्रवलयांकित पृथ्वी एक राष्ट्र होवो’, ही प्रार्थना करतो. धर्माचे सारे मंत्र विश्वकल्याणाचे आहेत. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्र आणि विश्व कल्याण हे होणारच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग बिंड यांनी केले. १८ जानेवारी या दिवशी बोरगाव (मेघे) येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ते संबोधित करत होते.
मंदिरांसाठी राष्ट्रव्यापी लढा उभारणे आवश्यक ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, सनातन संस्था
आज आमची ऐश्वर्यसंपन्न मंदिरसंस्कृती संकटात आहे. शासनाकडून मंदिरांना कोणतेही साहाय्य मिळत नाही; याउलट मंदिरांचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न, दागिने, भूमी आदी बळकावण्यासाठी मंदिरांचे सरकारीकरण केले जात आहे. देवनिधीचा वापर हिंदु धर्माच्या प्रसारासाठी, धर्मग्रंथांच्या अध्ययनासाठी न करता सरकारच्या योजनांसाठी केला जात आहे. अनेक ठिकाणी सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील प्राचीन परंपरा नष्ट करण्याचे कार्य चालू आहे. मंदिरांवर सरकारी विश्वस्त म्हणून अन्य पंथियांची नेमणूकही होत आहे. त्यामुळे मंदिरांच्या रक्षणासाठी अन् सरकारीकरणातून मुक्तता होण्यासाठी एक राष्ट्रव्यापी लढा उभारणे आवश्यक आहे.
या सभेला बोरगाव (मेघे)चे सरपंच श्री. संतोष सेलूकर, शिवमंदिराचे विश्वस्त श्री. चंद्रदेव यादव, श्री गणपति मंदिराचे विश्वस्त श्री. काळसरपे, श्री विठ्ठल मंदिराचे विश्वस्त श्री. मनोहरराव वाळके, श्री भवानीमाता मंदिरचे विश्वस्त श्री. दिनेश नेहारे, श्रीराम मंदिराचे विश्वस्त श्री. उमरकर, श्री गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त श्री. शरद डोणारक आदी मान्यवर उपस्थित होते.