देहलीच्या जंतर मंतर येथे काश्मिरी हिंदूंकडून आंदोलन
नवी देहली : येथे १९ जानेवारी या दिवशी काश्मिरी हिंदूंच्या ‘विस्थापन दिना’ला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काश्मिरी समिती देहली यांच्याकडून जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात आले होते. यात पनून कश्मीर, रूट्स इन काश्मीर, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या संघटनांचे कार्यकर्ते तसेच मोठ्या प्रमाणात काश्मिरी हिंदू सहभागी झाले होते. काश्मिरी हिंदूंवर झालेल्या या अत्याचाराला सरकारने ‘वंशविच्छेद’ असे घोषित करून त्याला उत्तरदायी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. तसेच सरकारने लवकरात लवकर काश्मिरी हिंदूंचे पुन्हा काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्याची योजना बनवावी आणि त्यांचे सुरक्षित पुनर्वसन करावे, अशीही मागणी करण्यात आली.
१. आंदोलनातील उपस्थितांनी डोक्यावर काळ्या फिती बांधून काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहाराला उत्तरदायी असलेल्या जिहादी आतंकवाद्यांचा निषेध केला. तसेच आतंकवादाला बळी पडलेल्या हिंदूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
२. या वेळी आतंकवाद्यांची छायाचित्रे लावून त्यांना जोडे मारले गेले. या आंदोलनात युवा आणि ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी अनेक काश्मिरी हिंदूंनी त्यांच्या वेदना उपस्थितांसमोर मांडल्या.
३. आंदोलनानंतर राष्ट्रपती आणि काश्मीरचे राज्यपाल यांना निवेदन पाठवण्यात आले.
४. काश्मिरी समितीचे श्री. समीर श्रुंगू, श्री. विजय भट, श्री. संजय कौल; पनून कश्मीरचे श्री. चांदजी पंडिता, श्री. रूपेश पंडिता; हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे आणि सनातन संस्थेचे श्री. अभय वर्तक उपस्थित होते.