‘मॉब लिंचिंग’ची ओरड करणारे काश्मीरमध्ये १९९० ला घडलेल्या ‘मॉब लिंचिंग’विषयी मूग गिळून गप्प का ? – कु. रागेश्री देशपांडे, हिंदु जनजागृती समिती
धुळे : ‘र-लिव्ह’, ‘च-लिव्ह किंवा ग-लिव्ह’ म्हणजे अनुक्रमे ‘धर्मांतर करा’, ‘काश्मीर सोडून चालते व्हा’ किंवा ‘मृत्यू स्वीकारा’ अशा धमक्या देऊन १९ जानेवारी १९९० या दिवशी साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना काश्मीर सोडायला भाग पाडले होते. त्या वेळी सहस्रोंच्या संख्येने काश्मिरी हिंदूंच्या हत्या झाल्या, महिलांवर बलात्कार झाले. आज या घटनेला ३० वर्षे पूर्ण झाली; पण अजूनही काश्मिरी हिंदु बांधवांना न्याय मिळाला नाही. या देशातील भूमीपूत्र सोडून सर्वांना या देशात स्थान मिळते. ‘मॉब लिंचिंग’ची ओरड करणारे काश्मीरमध्ये १९९० ला घडलेल्या ‘मॉब लिंचिंग’विषयी मूग गिळून गप्प का ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केला. मालेगाव रस्त्यावरील ‘संस्कार अॅकॅडमी’ येथे पार पडलेल्या काश्मिरी हिंदूंच्या विस्थापन दिनाला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘काश्मीरमध्ये झालेला अत्याचार, नरसंहार, विस्थापन आजच्या समाजाला माहीत व्हावे’, या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडणारे फॅक्ट प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचप्रमाणे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांचे अनुभवकथन करणारी ‘…आणि जग शांत जाहले’ ही ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. अशा घटना वारंवार होत असतांना ‘हिंदूंनी स्वत:चे रक्षण कसे करावे ?’, हे शिकण्यासाठी समितीच्या वतीने शौर्य जागरणाची प्रात्यक्षिकेही या वेळी सादर करण्यात आली. ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमाला १५० हून अधिक धर्म अन् राष्ट्र प्रेमींचा भरघोस प्रतिसाद लाभला. ‘जोपर्यंत काश्मिरी हिंदूंना त्यांची भूमी, त्यांचे घर परत मिळत नाही, तोपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार’ही या वेळी करण्यात आला. ‘संस्कार अॅकॅडमी’ने या प्रदर्शनासाठी जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली.
क्षणचित्रे
१. राष्ट्रभक्त नागरिक पुष्कळ आत्मियतेने फॅक्ट प्रदर्शन पाहून माहिती जाणून घेत होते. अनेक जणांनी भ्रमणभाषमध्ये छायाचित्रे काढली, तसेच छायाचित्रणही करून घेतले.
२. शौर्य जागरण प्रात्यक्षिकांना सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘युवक-युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करावा’, अशी इच्छा अनेक जणांनी व्यक्त केली.