Menu Close

‘वसुधैव कुटुम्बकम्’प्रमाणे विश्‍वात हिंदु राष्ट्राची स्थापना होणार : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘पत्रकार स्नेहसंवाद’ सोहळा उत्साहात साजरा !

‘पत्रकार स्नेहसंवाद’ सोहळ्यात उपस्थित संपादक आणि पत्रकार

देवद (पनवेल) : भारतात हिंदु राष्ट्र येईल का ? याविषयी चर्चा चालू असतांना विविध लोक ‘संविधान’ धोक्यात येईल’, असा हिंदूंच्या विरोधात खोटा प्रचार करत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी नव्हे, तर १९ व्या शतकात सर सय्यद अहमद यांनी द्विराष्ट्रवादाचा विचार मांडला होता. धर्माच्या आधारे देशाचे विभाजन होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. पाकिस्तान ‘इस्लामिक रिपब्लिक’ देश झाला; मात्र भारत हिंदु राष्ट्र झाला नाही. स्वा. सावरकरांनी देशात हिंदू बहुसंख्य असल्याने आणि ‘वसुधैव कुटुम्बकम्’ याद्वारे हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडली होती. यानुसार हिंदु राष्ट्रात जातीभेद केला जाणार नाही. सर्व धर्म, जाती आणि समाज यांना समान अधिकार असतील. हिंदु राष्ट्रात कोणत्याही समाजाचे लांगूूलचालन केले जाणार नाही. अशा पद्धतीने हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

श्री. रमेश शिंदे

मकरसंक्रांतीनिमित्त येथील सनातनच्या आश्रमात १९ जानेवारीला आयोजित केलेला ‘पत्रकार स्नेहसंवादा’चा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. या वेळी ते ‘हिंदु राष्ट्र : मूलभूत विचार, आक्षेप आणि खंडण’ या विषयावर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.

राष्ट्रप्रेमी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे संघटन, हिंदु राष्ट्राची संकल्पना आणि सनातनवर होत असलेल्या आरोपांचे खंडण करण्यासाठी हा सोहळा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुंबई, ठाणे आणि पनवेल येथील पत्रकार सहभागी झाले होते.

सोहळ्याच्या प्रारंभी सनातनचे साधक श्री. हर्षल भगत यांनी शंखनाद केला. कल्याण येथील पुरोहित श्री. उदय पिंपुटकर यांनी वेदमंत्रपठण केले. समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी त्यांचा पुष्प देऊन सत्कार केला. या सोहळ्याला सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. श्री. चेतन राजहंस यांनी स्वागतपर प्रस्तावना केली. सनातनच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘सनातन संस्थेचा परिचय आणि कार्य’ याविषयी प्रोजेक्टरद्वारे माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी ध्वनीचित्र-चकतीद्वारे समितीच्या कार्याची माहिती दिली.

सनातनच्या पाठीशी पत्रकार उभे राहिल्याने प्रतिकूल परिस्थितीतही आम्ही धर्मकार्य करू शकलो ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

जिहादी आतंकवाद्यांनी आतापर्यंत अधिकाधिक बॉम्बस्फोट केलेले असतांनाही गेल्या १० वर्षांपासून केवळ राजकीय दृष्टीकोनातून, तसेच अल्पसंख्यांकांविषयी सहानुभूती निर्माण करण्यासाठी आणि मुसलमान मतपेढी सुरक्षित ठेवण्यासाठी ‘भगवा आतंकवाद’ असा शब्दप्रयोग केला जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांचेच हे षड्यंत्र होते. काँग्रेस सरकारने ‘भगवा आतंकवाद’ संबोधून ‘हिंदू आतंकवादा’चे षड्यंत्र रचले. ‘भगवा’ म्हणजे ‘संन्यासी’ आणि ‘त्यागी’ असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ‘भगवा’ आणि ‘आतंकवाद’ हे दोन्ही शब्द कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. भगव्या आतंकवादासमवेत सध्या ‘मॉब लिचिंग’चे काहूर माजवून हिंदुत्वनिष्ठ संघटनांना लक्ष्य केले जात आहे.

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणांत विसंगती आहे. या प्रकरणांत सनातनला विनाकारण गोवून आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. सनातनला संपवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. सनातन ही मानवजातीच्या कल्याणासाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणारी संस्था आहे. आमच्या पाठीशी पत्रकार उभे राहिल्याने आणि त्यांनी चांगली साथ दिल्यामुळे आम्ही प्रतिकूल परिस्थितीतही धर्मकार्य करू शकलो. आमच्या कार्याला पत्रकारांनी चांगली प्रसिद्धी दिली. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे.’’

‘राष्ट्रीय पत्रकार मंच’च्या माध्यमातून राष्ट्र-धर्म प्रेमी पत्रकारांचे संघटन करण्याचा प्रयत्न ! – अरविंद पानसरे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आज समाजात प्रत्येक विचारांचे गट निर्माण झाले आहेत, उदा. साम्यवादी, मुसलमान, नास्तिकतावादी, तसेच अन्य विचारधारांचा पुरस्कार करणारे पत्रकारांचे गट आहेत. ते त्यांच्या विचारांच्या विषयांना प्रसिद्धी देतात. त्यांच्या बाजूने उभे राहतात; पण राष्ट्र आणि समाज यांचा विचार कोणीच करत नाही. अशा वेळी राष्ट्र-धर्म प्रेमी पत्रकारांनी संघटित व्हावे, या उद्देशाने ‘राष्ट्रीय पत्रकार मंच’ची स्थापना करण्यात आली आहे. पत्रकारांच्या वैयक्तिक हक्कांसाठी लढणार्‍या अनेक संघटना आहेत; मात्र राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाच्या समष्टी उद्देशाने लढणारी संघटना असावी; म्हणून आम्ही पुढाकार घेतला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *