Menu Close

मंगळुरू येथे २ दिवसांचे दक्षिण जिल्हा हिंदु राष्ट्र अधिवेशन

भारत विश्‍वगुरु होण्यासाठी गाय, ग्राम, गुरुकुल आणि गंगा सुदृढ होणे आवश्यक ! – अधिवक्ता चंद्रशेखर राव, उपाध्यक्ष, बंटवाळ अधिवक्ता संघ

मंगळुरू (कर्नाटक) : भारतात अनादि काळापासून गाय, ग्राम, गुरुकुल आणि गंगा हे बलवान होते. प्रत्येक गाव स्वावलंबी होते आणि लोकही सुखी होते. गंगा शुद्ध होती, गुरुकुल व्यवस्थेमुळे उच्च पातळीचे शिक्षण देण्यात येत होते. असंख्य गायी असल्याने संपत्ती, समृद्धी होती; परंतु आज गोहत्येमुळे गोधनाचा नाश होत आहे. भारत पुन्हा विश्‍वगुरु व्हावा, असे वाटत असल्यास हे ‘४ जी’ सूत्र सुदृढ झाले पाहिजे, असे प्रतिपादन बंटवाळ अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अधिवक्ता चंद्रशेखर राव यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच २ दिवसांचे दक्षिण जिल्हा स्तरावरचे हिंदु राष्ट्र अधिवेशन येथील श्री व्यंकटरमण देवस्थानातील सभागृहात पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.

या अधिवेशनात सनातन संस्थेचे संत पू. रमानंद गौडा, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता कृष्णमूर्ती पी. आणि कर्नाटक राज्य तुळु साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्री. दयानंद यांचे उपस्थितांना मार्गदर्शन लाभले. या अधिवेशनात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तुरू, सुळ्या, बेळ्तंगडी आणि बंटवाळ येथील हिंदु संघटनांचे प्रमुख, विविध भजनी मंडळे, देवालयांचे विश्‍वस्त, सामाजिक आंदोलनकर्ते, अधिवक्ते, उद्योगपती आदी उपस्थित होते. या वेळी काही वक्त्यांनी केलेले मार्गदर्शन पुढे देत आहोत.

हिंदूंनी जातींची बंधने तोडून केवळ ‘हिंदु’ म्हणून संघटित झाले पाहिजे !  सौ. आशा ज्योती रै, बंटर संघ

सध्या हिंदु धर्म जातींमध्ये विभाजित झाला आहे; परंतु हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्यास जातींचे बंधन काढून हिंदू ऐक्य होण्यासाठी केवळ ‘हिंदु’ म्हणून संघटित होणे आवश्यक आहे.

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर कायदेशीर उपाय करायला हवा !  हनुमंत कामत, अध्यक्ष, सेवांजली ट्रस्ट, मंगळुरू

सध्या अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार होत आहे. देशात या भ्रष्टाचार निर्मूलनासाठी सरकारने कायदा लागू केला पाहिजे. त्या माध्यमातून भ्रष्टाचारमुक्त भारताची निर्मिती करायची आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर कायदेशीर उपाय करायला हवा.

हिंदूंना धार्मिक शिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान जागृत करायला हवा ! – प्रा. अरुण उळ्ळाल, धर्मप्रेमी

इंग्रजी शिक्षणाच्या मोहाने आजची पिढी हिंदु धर्माच्या आचार-विचारांवर टीका करत आहे. त्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान बिंबवण्याची आवश्यकता आहेे.

‘माहिती अधिकार हा कायदा धार्मिक, तसेच सामाजिक क्षेत्रात होणारा भ्रष्टाचार उघड करणारे प्रबळ शस्त्रच आहे. प्रत्येक हिंदूला या कायद्याची माहिती मिळाली पाहिजे.’  एस्. भास्करन्, अध्यक्ष, चामराजपेटे श्री अंजनेय स्वामी प्रतिष्ठापना ट्रस्ट, बेंगळुरू.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाच्या वेळी दीपप्रज्वलन केलेली समई २४ घंटे तेवत होती.

२. अधिवेशनाच्या दिवशी सभागृहाच्या वर गरुड पक्षी येऊन बसला होता.

३. मुख्य अतिथींना सभागृहात प्रवेश करतांना ‘आम्ही ‘हिंदवी स्वराज्या’त प्रवेश करत आहोत’, असे वाटत होते’, असे त्यांनी सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *