बांगलादेशमधील असहिष्णुता !
ढाका (बांगलादेश) : जिहाद्यांवर टीका करणारा नझीमुद्दीन समद या २८ वर्षीय विद्यार्थ्याची जुन्या ढाक्यामधील सूत्रपूर भागात अज्ञात आक्रमणकर्त्यांनी अल्लाहु अकबरच्या घोषणा देत धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. समद याच्यावर प्रथम वार करून नंतर तो ठार झाल्याची खात्री करण्यासाठी आतंकवाद्यांनी त्याच्यावर गोळीबारही केला.
समद जगन्नाथ विद्यापिठात कायद्याचे शिक्षण घेत होता. विद्यापिठामधील वर्ग संपल्यानंतर तो त्याच्या मित्रासमवेत घरी जात असतांना त्यास आतंकवाद्यांनी लक्ष्य केले. मूळचा सिल्हेट येथील रहिवासी असलेला समद येथील बंगबंधू जातीय जुबो परिषदेचा माहिती आणि संशोधन विभागाचा सचिव होता.
जिहाद्यांचा टीकाकार असलेल्या समद याने धर्मनिरपेक्षतेच्या विचाराचा प्रसार करण्याकरता फेसबूकचा आधार घेतला होता. आक्रमण होण्याच्या एकच दिवस आधी त्याने देशातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. बांगलादेशमध्ये गेल्या काही वर्षांपासून धर्मनिरपेक्ष विचारवंत, ब्लॉगर्स आणि हिंदू यांना लक्ष्य करण्यात येत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात