हरिद्वार येथे गंगानदीच्या रक्षणासाठी गेले ४७ दिवस आमरण उपोषण
गंगानदीच्या रक्षणासाठी सातत्याने संत आणि साध्वी यांना उपोषण करावे लागणे सरकारला लज्जास्पद आहे ! सरकारने याचा गांभीर्याने विचार करून अशी स्थिती येऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत !
हरिद्वार (उत्तराखंड) – गंगानदी अविरत वाहण्यासाठी आणि तिच्या रक्षणासाठी गेल्या ४७ दिवसांपासून येथील मातृसदन आश्रमामध्ये आमरण उपोषण करणार्या साध्वी पद्मावती यांची प्रकृती खालावल्यावर पोलिसांनी त्यांना बलपूर्वक रुग्णालयात भरती केले. १५ डिसेंबरपासून साध्वी उपोषण करत होत्या. काही दिवसांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी साध्वी पद्मावती यांना समर्थन दिले होते आणि त्यांच्या सरकारमधील मंत्री संजय झा आणि खासदार कौशलेंद्र कुमार यांना साध्वींना भेटायला पाठवले होते. तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा संदेश घेऊन त्यांचे अधिकारीही साध्वी यांना भेटण्यास गेले होते; मात्र साध्वी यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला होता.
१. साध्वी पद्मावती यांना रुग्णालयात बलपूर्वक नेल्यानंतर त्यांच्या जागेवर संत आत्मबोधानंद यांनी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी यापूर्वीच घोषित केले होते की, साध्वी पद्मावती यांचे उपोषण बंद केल्यास ते स्वतः उपोषणास बसतील. संत आत्मबोधानंद यांनी यापूर्वी याच मागणीसाठी १९४ दिवस उपोेषण केले होते. ते म्हणाले की, प्रशासनाने साध्वी यांना बलपूर्वक नेले आहे. पोलीस साध्वींना बलपूर्वक खाण्यास देऊन त्यांचे उपोषण समाप्त करू इच्छित आहेत.
२. साध्वी पद्मावती यांना बलपूर्वक रुग्णालयात नेण्याचा मातृसदन आश्रमाचे स्वामी शिवानंद यांनी विरोध केला. ते म्हणाले की, याविषयी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. मातृसदनच्या संतांचे उपोषण आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत चालूच राहणार आहे. एकानंतर दुसरे संत आणि साधू गंगानदीच्या रक्षणासाठी तपस्येसाठी बसून राहतील. आवश्यकता पडली, तर अन्न आणि जल यांचा त्याग करून तपस्या करतील.
३. स्वामी दयानंद यांनीही याचा विरोध करत आरोप केला की, राज्यातील भाजप सरकार खाण माफियांच्या आदेशानुसार काम करत आहे.
गंगानदीच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणारे संत-महंत !
१. २ वर्षांपूर्वी स्वामी ज्ञानस्वरूप सानंद (प्रा. जी.डी. अग्रवाल) यांनी १११ दिवस उपोषण करून प्राणार्पण केले होते.
२. वर्ष २०१४ मध्ये बाबा नागनाथ यांनी गंगानदीच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषण करून प्राणार्पण केले होते.
३. स्वामी निगमानंद यांनीही वाराणसीमध्ये गंगानदीच्या स्वच्छतेसाठी १०० दिवस आमरण उपोषण करून प्राणत्याग केला.
यावरून आमरण उपोषणासारखा मार्ग अवलंबून गंगानदी स्वच्छ होणार नाही, हेच खरे. यासाठी धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी यांनी संघटित होऊन जनआंदोलन उभारले, तरच सरकारी यंत्रणा गंगानदीच्या स्वच्छतेचे सूत्र गांभीर्याने घेईल !