श्रीरामनवमीला रामजन्मभूमीवर श्रीरामाची पूजा करण्यास हिंदूंना विशेष अनुमती देण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीची एक स्वाक्षरी प्रभु श्रीरामासाठी या नावाने स्वाक्षरी मोहीम !
मुंबईत केवळ ५ दिवसांत ५४ सहस्र १८६ नागरिकांकडून निवेदनावर स्वाक्षर्या !
मुंबई : श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. उत्तरप्रदेशमधील अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असून ३० सप्टेंबर २०१० या दिवशी प्रयाग (अलाहाबाद) उच्च न्यायालयानेही सदर स्थळ रामजन्मभूमी आहे आणि इथे श्रीराम मंदिर होते, असा निर्णय देऊन श्रीरामजन्मभूमीवर शिक्कामोर्तब केले आहे. ज्या स्थळासाठी श्रीरामभक्त करसेवकांनी रक्त सांडले, ते स्थळ न्यायालयाकडून श्रीरामजन्मभूमी आहे, हे स्पष्ट होऊनही तेथील मुख्य स्थानावर हिंदूंना पूजा करण्यास कोणतीही अनुमती नाही. यामुळे श्रीरामनवमीच्या दिवशी श्रीराम जन्मभूमीस्थानावर श्रीरामाची पूजा करण्यास हिंदूंना विशेष अनुमती द्यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपूर्ण भारतात स्वाक्षरी मोहीम चालू करण्यात आली असून येत्या ८ दिवसांत विविध ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबई शहरात केवळ ५ दिवसांत ५४ सहस्र १८६ नागरिकांनी निवेदनावर स्वाक्षरी करून सहभाग घेतला. या मोहिमेत हिंदु गोवंश रक्षा समिती, हिंदु राष्ट्र जनजागरण समिती, विश्व हिंदू परिषद, शंभूराजे प्रतिष्ठान भंडार्ली, श्री योग वेदांत सेवा समिती, शिवकार्य प्रतिष्ठान विक्रोळी, स्वराज्य हिंदु सेना, हिंदु राष्ट्र सेना, बजरंग दल, श्री शिवछत्रपती प्रतिष्ठान, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवसम्राट मित्र मंडळ-ठाणे, श्री बजरंग सेवा दल, बिलाल पाडा-नालासोपारा, जीवदया संघटना, नालासोपारा, अय्यपा मंदीर समिती, नालासोपारा, नवतरुण मित्र मंडळ, नालासोपारा, शिवसेना-नालासोपारा, युवा सेना-नालासोपारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना-नालासोपारा, आम आदमी पक्ष, नालासोपारा, ओंकारेश्वर मंदिर ट्रस्ट, अझादगल्ली, चुनाभट्टी, पंचशील नगर-चुनाभट्टी आदी संघटनांनी, तसेच भिवंडी येथील भादवड, सावंदे गावातील मुरबाड येथील धर्माभिमान्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेअंतर्गत ऑनलाईन स्वाक्षरी मोहीमही समितीच्या वतीने चालू करण्यात आली असून सामाजिक संकेतस्थळावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
या निवेदनाच्याअंतर्गत केलेल्या मागण्या
१. भाजप शासनाने विशेषाधिकार वापरून श्रीरामाची विधीवत् पूजा करण्यास हिंदूंना अनुमती द्यावी.
२. सध्या मूर्तीजवळ जाण्यास अनेक मेटल डिटेक्टर आहेत, तसेच अन्य वस्तू तेथे नेण्यास बंदी आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी पूजेचे साहित्य आणि प्रसाद नेण्याचीही अनुमती मिळावी.
३. श्रीरामाची मूर्ती एका कापडी तंबूत ठेवून तिची एकप्रकारे विटंबनाच केली जात आहे. तेथे भाविकांना पूजा-अर्चा करता येत नाही. हे टाळण्यासाठी तात्पुरते लहान मंदिर बनवून त्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करावी अन् त्या मंदिरात नियमित पूजा-अर्चा आरंभ करून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा आदर राखावा.
क्षणचित्रे
१. नालासोपारा येथे रेल्वे स्थानकाच्या बाहेर मेगाफोनद्वारे घोषणा करून समाजात आवाहन केले जात होते. या वेळी हिंदी, मराठी, भोजपुरी भाषेत घोषणा देण्यात आल्या.
२. नालासोपारा येथील मोहीम रात्री १२.३० पर्यंत होती. तरीही कार्यकर्ते उत्साहात सेवा करत होते.
३. अनेक शहरात कार्यकर्त्यांनी त्यांच्या संपर्कातील विविध आस्थापनांमध्ये कार्य करणारे कर्मचारी, दुकानदार, ब्युटीपार्लरमध्ये काम करणार्या महिला, कार्यकर्त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार यांना संपर्क केला. त्यांनीही त्यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात