ओडिशा येथे हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी संपर्क अभियान
राऊरकेला (ओडिशा) : राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्या आघातांच्या विरोधात संवैधानिक मार्गाने लढण्यासाठी अधिवक्त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अनेक अन्याय्य, भ्रष्टाचारी, अनैतिक घटनांच्या संदर्भात न्यायालयीन लढा देणे आवश्यक आहे. या सर्व दृष्टीकोनातून ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’च्या कार्यात अधिवक्त्यांची भूमिका आणि योगदान आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी येथे केले.
ओडिशा येथे ‘हिंदु राष्ट्र-स्थापना संपर्क अभियाना’च्या अंतर्गत राऊरकेला न्यायालयातील धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी अधिवक्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे आयोजन अधिवक्ता विभूति भूषण पलेई यांनी केले होते. या वेळी पू. सिंगबाळ यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून देशभरातील जागरूक अधिवक्ते करत असलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली, तसेच ‘अधिवक्ते संघटितपणे न्यायालयीन स्तरावर किती व्यापक कार्य करू शकतात’, हे विशद केले. पू. सिंगबाळ ‘सेक्युलर’ या शब्दाविषयी म्हणाले की, राज्यघटनेत पालट करून घातलेल्या ‘सेक्युलर’ या शब्दामुळे भारत एक ‘सेक्युलर’ राष्ट्र बनले. ‘सेक्युलर’ या शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ असा करून प्रसारमाध्यमे आणि बुद्धीवादी यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून हिंदूंना ‘तुम्ही ‘धर्मनिरपेक्ष’ आहात’, असे बिंबवले. त्याचा परिणाम म्हणजे गेली अनेक वर्षे धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांवर सर्व बाजूंनी आघात होत आहेत. यासाठी न्यायालयीन लढा देऊन या आघातांना उत्तर देणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’च्या या प्रक्रियेत अधिवक्त्यांनी सहकार्य करावे.’’
उपस्थित सर्व अधिवक्त्यांनी राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यात ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’च्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे सहकार्य करू’, असे सांगितले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर उपस्थित होते.