Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागरण उपक्रमांतर्गत रुखी, तळे येथे प्रवचन आणि वशेणी (जिल्हा रायगड) येथे कार्यशाळा  !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागरण उपक्रमांतर्गत रुखी (ता. दापोली) येथे प्रवचन !

शौर्याची उपासना आणि साधनेच्या सामर्थ्यानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

दापोली : ब्रिटिशांनी हिंदूंना धर्म आणि संस्कृती यांपासून दूर करणारी मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धती चालू केली आणि त्यांनी भारतावर राज्य केले. त्यांनी देश सोडतांना सांगितले की, हिंदूंना त्यांचा धर्म आणि संस्कृती यांचे आचरण करण्यास लाज वाटेल आणि आज तसेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध प्रकारच्या ‘डे’ विकृती आज घराघरात पोचली आहे. आज आपल्याला कुठेही सण, उत्सव, उपासना, शास्त्र, धर्मशिक्षण याविषयी शिकवले जात नाही. शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आपल्या शौर्याच्या गोष्टी शिकवल्या जात नाही. हा सर्व त्याचाच परिणाम आहे. आज छोट्या आमिषांना बळी पडून हिंदु आपला धर्म सोडत आहेत. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा ४२ दिवस अनन्वित छळ केला; मात्र त्यांनी आपला धर्म सोडला नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलदेवता आणि संत यांच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. अशा पद्धतीची शौर्याची उपासना आणि साधनेच्या सामर्थ्यानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. तालुक्यातील रुखी गावातील श्री गणेश मंदिरात ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि शौर्य जागरण’ या विषयावर आयोजित प्रवचनात ते बोलत होते. या वेळी सरपंच सौ. प्राची मांडवकर, रुखी गाव अध्यक्ष श्री. अनंत मांडवकर, गावचे सेक्रेटरी श्री. बाबू मांडवकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी आणि श्री. दिनेश कडव यांच्यासह गावातील १२५ धर्मप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सूरज चव्हाण यांनी केले.

उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन करतांना श्री. निरंजन चोडणकर

आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपण भगवंताचे भक्त बनले पाहिजे ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आज आपण धर्माच्या बाजूने उभे राहिलो नाही, धर्माचरण केले नाही, तर येणार्‍या आपत्काळाला तोंड देणे कठीण आहे. ‘नमे भक्त प्रणश्यती’ हे भगवंताचे वचन आहे. यासाठी आपण भगवंताचे भक्त बनले पाहिजे. धर्माचरण केले पाहिजे, मगच भगवंत आपली काळजी घेतो. नामजपाने आपले रक्षण होते. मनातील भीती नष्ट होते. कलियुगात नामजपाने कल्याण होणार आहे. यासाठी कुलदेवतेचा नामजप प्रतिदिन १ घंटा तरी करा. आज होणारी अतीवृष्टी, अनावृष्टीच्या माध्यमातून असे लक्षात येते की, निसर्गाने स्वत:चे नियम सोडले आहेत. येणार्‍या आपत्काळाला तोंड देण्यासाठी आपण भगवंताचे भक्त बनले पाहिजे.

सत्कार

१. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांचा सत्कार रुखी गावचे उपसरपंच श्री. संदीप मांडवकर यांनी केला.

२. हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांचा सत्कार धर्मप्रेमी श्री. हरिश्‍चंद्र राळे यांनी केला.

क्षणचित्रे

१. या प्रवचनादरम्यान स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली, याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

२. स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग आणि धर्मशिक्षणवर्ग यांची मागणी करण्यात आली.

३. शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी या दिवशी प्रवचनाची आणि क्रांतीगाथा प्रदर्शन लावण्याची मागणी करण्यात आली.

अभिप्राय

श्री. संदीप मांडवकर, उपसरपंच, रुखी : हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला साधना आणि स्वरक्षणाविषयी प्रबोधन केले, त्याविषयी आम्ही आपले शतश: ऋणी आहोत. आम्ही आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करू.


तळे (ता. खेड) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शौर्य जागरण’ उपक्रमांतर्गत प्रवचन

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि आपत्काळात तरून जाण्यासाठी ‘शौर्य जागरण’ आणि ‘साधना’ आवश्यक ! – निरंजन चोडणकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. निरंजन चोडणकर

खेड : धर्म न शिकवल्याने आणि शौर्याची उपासना न झाल्यामुळे आजची युवा पिढी भरकटली आहे. आपला हिंदु धर्म व्यापक आहे, तो विश्‍वाचा विचार करतो. राष्ट्रासमोर असलेली अनेक आव्हाने आणि समस्या यांतून राष्ट्राला बाहेर काढण्यासाठी आपण आता कंबर कसली पाहिजे. देवाच्या आशीर्वादानेच भक्त येणार्‍या आपत्काळात तरून जाऊ शकतो. वर्ष २०२३ नंतर हिंदु राष्ट्राची स्थापना ईश्‍वरीकृपेने होणारच आहे. त्यासाठी आपण आपली साधना वाढवली पाहिजे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘शौर्य जागरण’ आणि आपत्काळात तरून जाण्यासाठी ‘साधने’ची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. निरंजन चोडणकर यांनी केले. तालुक्यातील तळे, देऊळवाडी येथील श्री वाघजाईदेवी मंदिरात ६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शौर्य जागरण’ उपक्रमांतर्गत आयोजित प्रवचनात ते बोलत होते. या वेळी समितीचे प्रा. आेंकार जरळी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समिती करत असलेल्या कार्याची उपस्थितांना ओळख करून दिली.

प्रवचनाच्या प्रारंभी ग्रामदैवत श्री वाघजाईदेवीला श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. मार्गदर्शनानंतर हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अक्षय कदम आणि प्रा. आेंकार जरळी यांनी उपस्थितांना स्वरक्षण प्रात्यक्षिके करून दाखविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुजाता सामंत यांनी केले. या प्रवचनानंतर झालेल्या गटचर्चेमध्ये तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या गटचर्चेत तळे येथे धर्मशिक्षणवर्ग आणि स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेण्याचे ठरवण्यात आले.

सत्कार : ह.भ.प. मधुकर तुकाराम सोंडकर यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. निरंजन चोडणकर यांचा सत्कार केला.

उपस्थित मान्यवर आणि धर्मप्रेमी : तळे गावचे गावप्रमुख श्री. शामराव मोरे, सर्वश्री रघुनाथ मोरे, संभाजी मोरे, संतोष मोरे, संतोष सोंडकर, भरत महाडिक, अशोक जाधव, अनिल बांद्रे, अशोक बांद्रे, युवा धर्मप्रेमी कु. विक्रांत सकपाळ, कु. निखिल मोरे, कु. रणजीत जाधव, श्री. दीपक सकपाळ, कु. समीक्षा सकपाळ, मांडवे गावातील युवा धर्मप्रेमी कु. शुभम भोसले, कु. रणजीत सोंडकर, देवघर येथील धर्मप्रेमी श्री. सुधीर मोरे, युवा धर्मप्रेमी कु. रोहित मोरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. विलास भुवड आदी ६० धर्मप्रेमी उपस्थित होते.

अभिप्राय

१. श्री. रवींद्र मोरे, माजी उपसभापती, पंचायत समिती देवघर (बंदरवाडी) : राष्ट्र-धर्म, स्वरक्षण, धर्माचरण यांविषयी जागृती करणारे प्रबोधन अंगीकारणे आवश्यक आहे.

२. श्री. सुरेश मोरे, सरपंच, मांडवे आणि श्री. अनिल मोरे, तळे : धर्मशिक्षण देणे हा उपक्रम हिंदु धर्मासाठी आवश्यक झाला आहे.

३. श्री. बाबाराम बाबुराव मोरे, तळे : स्वरक्षणासाठी सदर उपक्रम हितावह आहे. यातून हिंदु संस्कृतीचे रक्षण होऊ शकते.


वशेणी (जिल्हा रायगड) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागरण कार्यशाळा

निःस्वार्थीपणे कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीचा आम्हाला आधार वाटतो ! – उपस्थित धर्मप्रेमी

घोषणा देतांना शौर्य जागरण कार्यशाळेतील धर्मप्रेमी

वशेणी (उरण) : येथील श्रीराम मंदिरात गावातील धर्मप्रेमी युवांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ दिवसांच्या शौर्य जागरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धर्मशिक्षणाचे महत्त्व, हिंदूंचा गौरवशाली आणि स्फूर्तीदायक इतिहास, पराक्रमी राजे अन् क्रांतीकारक यांची उदाहरणे देऊन युवांमध्ये शौर्य जागरण करण्यात आले. तसेच स्वरक्षणासाठी आवश्यक कराटे, लाठी-काठी, दंडसाखळी यांची प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली आणि विविध तंत्रांची ओळख करवून देण्यात आली. या वेळी समितीचे श्री. हेमंत पुजारे आणि श्री. राजेंद्र पावसकर यांनी युवांना मार्गदर्शन केले. साप्ताहिक स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करण्याची मागणी उपस्थितांनी केली. शेवटी सर्वांनी मनोगत व्यक्त करतांना समितीचे आभार व्यक्त करत ‘नि:स्वार्थीपणे कार्य करणार्‍या समितीचा आम्हाला आधार वाटतो’, असे सांगितले.

धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत . . .
१. पूर्वी समाजात होणार्‍या घटना पाहून एकटे जाण्यासाठी भीती वाटायची; परंतु आता आत्मविश्‍वास वाढला आहे.

२. आम्हीही आमच्या बहिणींना स्वरक्षण प्रशिक्षण शिकवू. हे प्रशिक्षण घेणे पुष्कळ आवश्यक आहे.

३. आम्ही स्वतः शिकू आणि समाजात अधिक ठिकाणी स्वरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करू.

४. इतिहासातून शिकणे आणि त्याचा व्यवहारात वापर करणे हे येथे शिकायला मिळाले. धर्मशिक्षणातून धर्माचरणाचा भाग शिकायला मिळाला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *