पाकमध्ये अल्पसंख्यांकांना न्याय मिळणेही दुरापास्त झाले आहे, हेच ही घटना दर्शवते !
कराची (पाकिस्तान) : ऑक्टोबर २०१९ मध्ये येथील हुमा या १४ वर्षे वयाच्या ख्रिस्ती धर्मातील मुलीचे अपहरण करण्यात आले. हुमा हिचे पिता युनिस आणि आई नघीना मसीह यांच्या म्हणण्यानुसार हुमाचे बलपूर्वक इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर अपहरण करणारा अब्दुल जब्बार याच्याशी विवाह करण्यास तिला भाग पाडले. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेले, तेव्हा खालच्या न्यायालयाने ‘शरिया कायद्यानुसार हा विवाह वैध आहे’, असा निर्णय दिला. न्यायालयाने असे सांगितले की, मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली, तर तो निकाह वैध ठरवला जातो.
१. या पीडित परिवाराचे अधिवक्ता तबस्सुम युसुफ यांनी सर्वोच्च न्यायालयात याविषयी दाद मागणार असल्याचे सांगितले. हा निर्णय वर्ष २०१४ मध्ये संमत करण्यात आलेल्या सिंध बाल विवाह निरोधक अधिनियमानुसार नाही. या अधिनियमानुसार १८ वर्षांखालील मुलीचा निकाह होऊ शकत नाही. हा नियम या प्रांतातील हिंदू आणि ख्रिस्ती समुदायातील अल्पवयीन मुलींचा बलपूर्वक होणारा विवाह रोखण्यासाठी केला आहे.
२. अधिवक्त्या तबस्सूम म्हणाल्या की, अन्वेषण करणारे पोलीस अधिकारी अब्दुल जब्बार आणि त्याच्या परिवाराचे समर्थन करत आहेत, असे मुलीच्या आई-वडिलांना वाटते. हुमा हिच्या वयाच्या परीक्षणाचा निकाल चुकीचा ठरवून तिला पतीसमवेत पाठवण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचा विवाह लावण्याचे २ प्रकार घडले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात