भारतातील मुसलमानांना हिंदूंपासून धोका असल्याचा तुर्कस्तानकडून अपप्रचार !
- तुर्कस्तानच्या या भारतद्वेषी कारवायांवर भारताने आताच कठोर पाऊल उचलून त्याला धडा शिकवला पाहिजे ! तुर्कस्तानशी असलेले सर्व प्रकारचे संबंध तोडून त्याच्यावर बहिष्कार घातला पाहिजे !
- भारतातील हिंदूंनाच धर्मांधांकडून गेल्या ७२ वर्षांपासून धोका आहे, हे दिसून आले आहे. त्यापूर्वीही तो धोका होता आणि तो प्रत्यक्षात येऊन भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाला. त्या वेळी १० लाख हिंदूंची कत्तल करण्यात आली. काश्मीरमध्ये हिंदूंना धर्मांधांमुळेच विस्थापित व्हावे लागले, ही वस्तूस्थिती आहे.
नवी देहली : तुर्कस्तानमधील जिहादी इस्लामी संघटना भारतात द्वेष पसरवण्याचा कट रचत आहेत. त्यासाठी भारतातील मौलवी आणि इस्लामविषयीचे जाणकार यांना भडकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘भारतामध्ये मुसलमान सुरक्षित नाहीत आणि त्यांना हिंदूंपासून धोका असल्याचे त्यांना सांगितले जात आहे’, अशी माहिती गुप्तचर विभागाने गृहमंत्रालयाला दिलेल्या अहवालात देण्यात आली आहे. गुप्तचरांच्या या माहितीनंतर तुर्कस्तानशी संबंधित सर्व संघटनांवर लक्ष ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
१. ‘झी न्यूज’च्या वृत्तानुसार भारतातील काही मौलवी आणि इस्लामचे जाणकार यांना काही मासांपूर्वी तुर्कस्तानमध्ये बोलावण्यात आले होते. त्यांनी तिकडे शरीयतविषयीचा काही अभ्यासक्रमही पूर्ण केला. हा अभ्यासक्रम शिकवतांना त्यांना वरील प्रकारे भडकावण्यात आले.
२. ‘तुर्की दियानेट फाऊंडेशन’सारख्या संस्था अनेक वेळा भारत आणि नेपाळ या देशांमधील मौलवी अन् इस्लामचे जाणकार यांना तुर्कस्तानामध्ये आमंत्रित करत असते. ही संस्था तुर्कस्तान सरकारच्या ‘डायरेक्टरेट ऑफ रिलीजियस अफेयर्स’ची एक शाखा आहे.
३. काही दिवसांपूर्वीच तुर्कस्तानचे राष्ट्रपती एर्दोगान यांनी पाकच्या संसदेत भाषण करतांना काश्मीरविषयी पाकची बाजू घेत भारतावर टीका केली होती. याला भारतानेही प्रत्युत्तर देत भारताच्या अंतर्गत प्रकरणात नाक न खुपसण्याची तंबी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानचा मुसलमानांना भडकावण्याचा प्रयत्न गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात