Menu Close

‘माहितीचा अधिकार’ या शस्त्राचा उपयोग करून कर्नाटकमधील वैद्यकीय महाविद्यालयाला त्याच्या भोंगळ कारभाराची जाणीव करून देणारे अधिवक्ता उमाशंकर मेगुंदी !

१. भारतातील वैद्यकीय व्यवस्थेमधील भ्रष्टाचार

अधिवक्ता उमाशंकर मेगुंदी

‘भारताच्या विद्यमान व्यवस्थेतील अनागोंदीपणा दिवसेंदिवस ठळकपणे दिसू लागला आहे. सर्वत्र दंगली, भ्रष्टाचार, दरोडे, अनैतिकता, परस्परांविषयी असहिष्णुता यांत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. श्रेष्ठ असा सनातन धर्म आणि संस्कृती यांची उपेक्षा करून पाश्‍चात्त्य संस्कृती अन् कायदे यांचे होणारे अवलंबन हेच यामागचे एकमेव कारण आहे. समाजातील अस्वस्थ करणारे असे अनेक प्रसंग प्रत्येकानेच अनुभवले असतील, तरीसुद्धा ‘समाजाला पालटण्यासाठी एक व्यक्ती काय करू शकते ?’, या विचाराने आपण अशा प्रसंगांना सामोरे जायचे टाळतो. यावर कोणताही पर्याय नसल्याने भ्रष्टाचारी समाजाशी तडजोड करून तो आपल्या जीवनाचाच एक भाग म्हणून आपण त्याचा स्वीकार करतो.

‘वैद्यकीय क्षेत्र’ हे एक अशाच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनलेे आहे. हा भ्रष्टाचार केवळ आधुनिक वैद्यांपुरताच सीमित नसून त्याने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र व्यापले आहे. या क्षेत्रातील पुढील विभागांतर्गत होणारा भ्रष्टाचार नित्याचा झाला आहे.

अ. वैद्यकीय सुविधांची उभारणी आणि देखभाल

आ. औषधांची खरेदी आणि पुरवठा

इ. औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सेवा यांचे वितरण, तसेच त्यांचा वापर

ई. उत्पादने आणि सुविधा यांच्या गुणवत्तेचे नियमन

उ. रुग्णालयात भरती करणे

ऊ. चिकित्सालयातील परीक्षण आणि प्रयोगशाळेतील चाचण्या

ए. वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळवणे आणि वैद्यकीय परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणे (करणे)

ऐ. वैद्यकीय प्राध्यापक आणि आधुनिक वैद्य यांची नियुक्ती

२. महाविद्यालयात रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या रक्तातील रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) वेगळ्या करण्याच्या यंत्राचा उपयोग केला जात नसल्याने गरीब रुग्णांनासुद्धा खर्चिक खाजगी रुग्णालयातील रक्तपेढ्यांकडे वळावेे लागणे

रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांच्या वापरात सध्या होणारा भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा यांचा मला आलेला अनुभव सर्वांसमोर मांडावासा वाटतो. हुब्बळ्ळी येथील एका रुग्णालयात रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारासाठी माझ्या एका मित्राला भरती करण्यात आले होते. उपचारांसाठी त्याला रक्तबिंबिका (प्लेटलेट्स) देणे आवश्यक असल्याने मी माझे रक्त देण्यासाठी त्या रुग्णालयात गेलो होतो. या उपचारासाठी रक्तातील रक्तबिंबिका वेगळ्या करणे आवश्यक असल्याने ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स (S.D.P.)’ हे विशिष्ट यंत्र त्यासाठी वापरले जाते. ‘कर्नाटक मेडिकल कॉलेज’ (K.M.C.) जे आता ‘कर्नाटक इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स’ (K.I.M.S.) या नावाने ओळखले जाते, तेे दक्षिण कर्नाटकमधील सर्वाधिक जुने आणि मोठे बहुउद्देशीय रुग्णालय आहे; परंतु तिथे ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स (S.D.P.)’ या यंत्राचा उपयोग केला जात नसल्याने गरीब रुग्णांनासुद्धा खाजगी रुग्णालयातील रक्तपेढ्यांकडे वळावेे लागते. सरकारी रुग्णालयात यासाठी फारतर ५ ते ६ सहस्र रुपये व्यय (खर्च) येतो; मात्र खाजगी रुग्णालयात त्यासाठी १० ते १५ सहस्र रुपये मोजावे लागतात. कर्करोगाच्या अशा रुग्णांना किमान ५ ते ६ वेळा रक्तबिंबिका द्याव्या लागतात. त्यासाठी खाजगी रुग्णालयातील एकूण व्यय साधारणतः ९० सहस्र रुपयांपर्यंत येतो, तर सरकारी रुग्णालयात ३० सहस्र रुपये एवढाच व्यय येतो. म्हणजे खाजगी आणि सरकारी रुग्णालय यांच्या उपचारांच्या खर्चातील भेद ६० सहस्र रुपये एवढा आहे.

३. माहितीच्या अधिकाराचे साहाय्य घेऊन कर्नाटक मेडिकल कॉलेजमधील या यंत्रासंदर्भात माहिती मिळवणे

या संदर्भात मला माहिती मिळवण्याची तीव्र इच्छा झाल्याने मी माहितीच्या अधिकाराचे साहाय्य घेऊन ‘कर्नाटक मेडिकल कॉलेज’ला (K.M.C.) पुढील मुद्यांच्या संदर्भात माहिती पुरवण्याची विनंती केली.

अ. या रुग्णालयात एस्.डी.पी. (S.D.P.) या यंत्रांची संख्या किती आहे ?  ते यंत्र खरेदी केल्याचा दिनांक आणि त्यासाठी प्राप्त झालेले संबंधितांची अनुमती पत्रे यांचा तपशील.

आ. एस्.डी.पी. (S.D.P.) या यंत्राच्या सद्यःस्थिती संदर्भातील अहवाल

इ. वरील यंत्राशी संबंधित नियमक, पर्यवेक्षक आणि देखभाल करण्याचे दायित्व असलेल्या कर्मचार्‍यांची नावे

ई. ते यंत्र कार्यरत झाल्यापासून आजपावेतो ते हाताळलेल्या व्यक्तींची नावे

उ. या यंत्राद्वारे रक्तबिंबिका वेगळ्या करण्यासाठी निर्धारित केलेल्या शुल्काच्या संदर्भातील विवरण आणि नोंदींची कागदपत्रे.

४. महाविद्यालयाने पुरवलेली माहिती

वरील ५ सूत्रांपैकी ‘कर्नाटक मेडिकल कॉलेज’च्या (K.M.C.) सार्वजनिक माहिती अधिकार्‍याने मला केवळ ३ सूत्रांशी संबंधित पुढील माहिती दिली.

अ. सरकारी रुग्णालयात एक एस्.डी.पी. (S.D.P.) यंत्र उपलब्ध आहे; परंतु मागील ७ वर्षांपासून ते वापरण्यायोग्य नसून आजपावेतो ते एकदाही दुरुस्त केलेले नाही. यंत्र दुरुस्त करण्याचे कौशल्य असणारा कर्मचारी उपलब्ध नसल्याने ते दुरुस्त केले नाही.

आ. त्याच्या उपयोगासाठी आकारण्यात येणारे शुल्क रुग्णालयाकडून निश्‍चित करण्यात आलेले नाही.

इ. यंत्र उपयोगात आणलेल्या व्यक्तींच्या नावांच्या नोंदींसाठी नोंदवही ठेवलेली नाही.

५. मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘कर्नाटक इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स’च्या (K.I.M.S.) संचालकांकडे गार्‍हाणे (तक्रार) नोंदवणे

‘माहितीच्या अधिकारा’द्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे मी ‘कर्नाटक इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स’च्या (K.I.M.S.) संचालकांकडे गार्‍हाणे (तक्रार) नोंदवले. त्या गार्‍हाण्यात म्हटले होते, ‘या यंत्रासाठी सरकारने वर्ष २०१० मध्ये अनुमाने २७ लक्ष ४ सहस्र रुपये खर्च करून अन् निविदा जाहीर करूनही आजपर्यंत आपण त्याचा उपयोग केलेला नाही. कित्येक गरीब रुग्ण दूरवरून येथे उपचारांसाठी येतात. त्यांना खर्चिक उपचार परवडत नसल्याने आवश्यक त्या उपचारांअभावी त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागतात. त्यामुळे हे यंत्र उपयोगात आणण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, तसेच हे पत्र तुम्हाला प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांत तुम्ही केलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात मला कळवावे; अन्यथा यासंदर्भात आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.’

६. ‘माहितीचा अधिकार’ या शस्त्राचा उपयोग केवळ अधिवक्ताच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने करून समाजजागृतीचे कार्य करावे !

‘माहितीचा अधिकार’ या शस्त्राचा उपयोग केवळ अधिवक्ताच करू शकतो, असे नसून प्रत्येक नागरिक त्याचा उपयोग करू शकतो. भारतातील सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थेची जाणीव समाजाला करून देण्यासाठी आपण एक पाऊल पुढे सरसावले पाहिजे. ही व्यवस्था पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही; परंतु समाजात त्याविषयीची जागृती करणे, हे प्रत्येकाचे सामाजिक कर्तव्य आहे.

मला ही सेवा करण्याची संधी मिळाली, त्याविषयी मी भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– अधिवक्ता उमाशंकर मेगुंदी, कर्नाटक उच्च न्यायालय, बेंगळुरू. (७.१.२०१८)

आरोग्य क्षेत्रातील अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी ‘आरोग्य साहाय्य समिती’स साहाय्य करा !

१. अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी संघटित व्हा !

आरोग्य क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. अन्नभेसळीच्या संदर्भात आपल्याला कटू अनुभव आले असल्यास, तसेच आपल्या परिसरातील अन्नभेसळीच्या संदर्भात घटना घडत असल्यास त्याविषयी ‘आरोग्य साहाय्य समिती’स त्वरित कळवा.

२. आपले अनुभव कळवण्यासाठी आणि मोहिमेत सहभागी होण्यासाठी पत्ता

सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. पिन – ४०३ ४०१

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

इ-मेल पत्ता : [email protected]

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *