भुवनेश्वर (ओडिशा) : ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ (इंटॅक) यांच्या १४ फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक राज्य संयोजक परिषदेत विविध संयोजकांनी ओडिशा राज्यातील मंदिरातून मोठ्या प्रमाणात होणार्या प्राचीन मूर्तींच्या चोरीच्या घटनांवर गंभीर चिंता व्यक्त केली.
१. नुकताच प्राची खोर्याचा अहवाल देणार्या श्री. अनिल धीर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या सर्वेक्षणात विविध ठिकाणी ३००हून अधिक मौल्यवान मूर्ती गायब असल्याचे आढळले. गेल्या दशकात प्राची खोर्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जवळपास ४८ गुन्हे नोंद करण्यात आले. यापैकी केवळ एकच मूर्ती सापडली. गेल्या दशकात मौल्यवान जैन आणि बौद्ध मूर्ती चोरीला गेल्या आहेत.
२. श्री. धीर म्हणाले की, अवैध व्यापार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय निकषांनुसार योग्य पद्धती अवलंबल्या पाहिजेत. धातूच्या मूर्तींमध्ये मालकीच्या पुराव्याचा आधार म्हणून लेसर खुणा असाव्यात. चोरी झाल्यास याचा पुरावा म्हणून कामास येईल. दगडी मूर्तींना मंदिराचे नाव आणि त्या जागेचे नाव धातूवर कोरीव काम करून लिहिलेले असले पाहिजे. बरीच उदाहरणे अशी आढळून आली आहेत की, चोरी केलेल्या मूर्ती सापडल्यावरही त्यांच्या मूळ ठिकाणी परत जाऊ शकल्या नाहीत आणि वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अन् पुरातत्व खात्याच्या गोदामांमध्ये धूळ खात पडल्या आहेत.
३. धीर म्हणाले की, अवैध मूर्ती निर्यातीसाठी ओडिशा हे एक मोठे केंद्र बनले आहे; कारण कंटेनर शिपमेंटमध्ये चोरीस गेलेल्या वस्तू, तसेच मूर्ती या नवीन मूर्ती समवेत पाठवून त्यांची तस्करी सुलभ होत आहे. सर्व मूर्तींना निर्यातीसाठी सक्षम अधिकार्यांकडून संमती प्रमाणपत्र मिळाले आहे का ? हे अधिकार्यांनी सुनिश्चित केले पाहिजे.
४. इंटॅकचे राज्य संयोजक आणि ओडिशाचे माजी पोलीस महासंचालक अमिया भूषण त्रिपाठी यांनी दु:ख व्यक्त केले की, ओडिशामधील सुमारे २२ सहस्र पुरातन धार्मिक स्थळांमध्ये दगड आणि धातू यांच्या मूर्ती अशा सर्व पुरातन वस्तूंची कोणतीही व्यवस्थित संगणकीय नोंद नाही. या मंदिरांमधील ९५ टक्क्यांंपेक्षा अधिक पुरातन मूर्ती कायदेशीररित्या नोंदणीकृत नसल्यामुळे स्मारक आणि पुरातन वस्तूंचे राष्ट्रीय अभियान अपूर्ण राहिले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात