नव्या शैक्षणिक वर्षात पाठ्यपुस्तकातील चुकीचा उल्लेख वगळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा यांचे आश्वासन
२३ फेब्रुवारी २०२०
पणजी : ११ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्याविषयी विपर्यस्त आणि चुकीच्या माहितीचा जो उल्लेख केला आहे, तो यंदाच्या (जून २०२०-२१) शैक्षणिक वर्षापासून त्यातून काढण्यात येणार आहे, याची मी निश्चिती देतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श विचार आणि योग्य इतिहास सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोेचवण्यासाठी सरकार आणि शिक्षणमंत्री या नात्याने मी कार्यरत रहाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. ‘११ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी चुकीचा उल्लेख झाला आहे. आमच्या राजांविषयी असा खोटा इतिहास कोणीही हिंदु सहन करणार नाही. ११ वीच्या इतिहासाचे पाठ्यपुस्तक शासनाने त्वरित मागे घ्यावे अन्यथा समस्त शिवप्रेमी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील’, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने गोवा शासनाला दिली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘जून २०१९ मध्ये शैक्षणिक वर्ष चालू झाल्यानंतर पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा उल्लेख केला गेल्याची माहिती निदर्शनास आणून देण्यात आली होती; मात्र शैक्षणिक वर्ष चालू झाल्याने तेव्हा त्यात काही पालट करणे शक्य झाले नाही. याविषयावर शिक्षण खात्याशी पूर्वीच चर्चा करण्यात आली आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून चुकीच्या उल्लेखाचा भाग पाठ्यपुस्तकातून काढला जाणार आहे.’’
शासनाने नोंद घेतल्याविषयी आभार; मात्र लिखाण तात्काळ रहित करून संबंधितांवर कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पणजी : मुख्यमंत्र्यांनी तत्परतेने नोंद घेतली, याविषयी हिंदु जनजागृती समिती मुख्यमंत्र्यांचे आभार मानते; मात्र सद्यःस्थितीत असलेल्या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना चुकीचेच शिक्षण मिळत असल्याने छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे ते लिखाण तात्काळ पुस्तकातून रहित करावे आणि पुढील वर्षीच्या अभ्यासक्रमातून ते पूर्ण वगळावे, तसेच ज्यांनी हे चुकीचे लिखाण केले आहे, त्यांच्यावरही तत्परतेने कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे गोवा समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी केली आहे.
…तर चुकीचे लिखाण करणार्यांवर वचक रहाणार नाही !
गोवा शासनाच्या इयत्ता ११ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाला जोडण्यात आलेल्या पुरवणीत गोव्यातील बार्देश तालुक्यात छत्रपती शिवरायांनी आक्रमण करून सलग ३ दिवस गावे लुटली, जाळपोळ केली, लहान मुले आणि महिला यांना डांबून ठेवले. तसेच काहींना ठारही मारले, असे धादांत खोटे अन् छत्रपती शिवरायांची प्रतिमा मलीन करणारे लिखाण केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवरायांच्या संदर्भात असे होणे, हे दुर्दैवाचे आहे. यापूर्वीही चुकीचा इतिहास शिकवणे किंवा हिंदु राजांची माहिती त्रोटक अन् मोगल आक्रमकांची माहिती अनेक पाने छापण्याचे प्रकार झाले आहेत. अशा प्रकरणांत जर कठोर कारवाई केली गेली नाही, तर असे चुकीचे लिखाण करणार्यांवर वचक रहाणार नाही अन् यापुढेही असे होतच राहील. त्यामुळे मा. मुख्यमंत्र्यांनी याविषयीही आदेश द्यावेत. मुख्यमंत्री शिवप्रेमींच्या मागण्या निश्चितच मान्य करतील, अशी अपेक्षाही डॉ. सोलंकी यांनी व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचा अपमान करणारे पुस्तक तत्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समितीची चेतावणी
१९ फेब्रुवारी २०२०
पणजी : हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणता राजा शिवछत्रपती यांची एकीकडे आज जयंती साजरी होत असतानाच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान करणारे लिखाण असल्याचे उघड झाले, हे अतिशय संतापजनक आहे. हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करते. अमाच्या राजांविषयी असा खोटा इतिहास कोणीही हिंदु सहन करणार नाही. हे इतिहासाचे पुस्तक शासनाने त्वरित मागे घ्यावे अन्यथा समस्त शिवप्रेमी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे गोवा राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी दिली आहे.
Hon. @goacm @DrPramodPSawant ji, we urge to you look into this matter of insulting #ShivajiMaharaj in Goa history textbooks. Shivaji Maharaj always had high regards towards women & children. Please withdraw insulting matter ASAP !#Stop_Insulting_Shivaji_Maharaj_In_Goa_Textbooks https://t.co/ZS8x3swLQ0
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) February 19, 2020
गोवा शासनाच्या इयत्ता ११ वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाला एक पुरवणी ‘गोव्याचा इतिहास’ या नावाखाली जोडण्यात आली आहे. त्यामध्ये गोव्यातील बार्देश तालुक्यात छत्रपती शिवरायांनी आक्रमण करून सलग तीन दिवस गावे लुटली, जाळपोळ केली, लहान मुले आणि महिला यांना डांबून ठेवले आणि काहींना ठारही मारले, असे धादांत खोटे अन् छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा मलीन करणारे लिखाण केले आहे. ‘परस्त्री मातेसमान’ या धर्मवचनानुसार वागणार्या आणि शत्रूच्या स्त्रियांनाही सन्मानपूर्वक परत पाठवणार्या छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर अशा प्रकारे चिखलफेक करणे, हा एक मोठा अपराधच आहे. त्यामुळे असे लिखाण करणारे लेखक आणि ते पाठ्यपुस्तकात समावेश करणारे संबंधित सर्व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी, अशी मागणीही डॉ. सोलंकी यांनी या वेळी केली. हे पहिल्यांदाच होत नसून २००८ मध्ये देखील अशाच एन.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकात छ. शिवरायांचा अपमान करण्यात आला होता, त्याविरोधात तीव्र आंदोलन केल्याने शासनाने ते पुस्तक मागे घेतले होते. शासनाने आताही या पुस्तकाची पुरवणी मागे घेतली नाही, तर पुन्हा त्या आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, असेही डॉ. सोलंकी यांनी सांगितले.
Today a delegation of devout Hindus, along with @HinduJagrutiOrg members of Goa, met Ms. @Vandana_Gem, Director of Education, Goa state regarding the issue of insult of Chhatrapati #ShivajiMaharaj in Goa history textbooks. #Stop_Insulting_Shivaji_Maharaj_In_Goa_Textbooks pic.twitter.com/ay659KAiyr
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) February 19, 2020
या प्रकरणी त्वरीत कारवाई करावी, यासाठी आज दुपारी १२ वा. गोवा राज्य शिक्षण संचालक वंदना राव यांची शिवप्रेमी संघटनांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी शिक्षण संचालकांनी ‘हा विषय गंभीर आहे. येत्या अभ्यासक्रमात हा भाग त्वरीत वगळू, तसेच अन्य कोणत्याही पाठ्यक्रमात असे काही आढळल्यास आम्हाला कळवा, त्यावरही कारवाई करू’, असे आश्वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आणि सौ. शांती मामलेदार, ‘स्वराज्य गोमंतक’चे प्रमुख श्री. प्रशांत वाळके आणि श्री महेश शिरगावकर, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. भाई पंडीत, शिवप्रेमी श्री. मयुरेश कुष्टे, पर्वरी येथील धर्मप्रेमी श्री. केशव चोडनकर, तसेच श्री. जयेश थाळी, श्री दयानंद गावकर, श्री. अंकुश नाईक आदी उपस्थित होते.
या संदर्भात आमच्या शासनाकडे मागण्या –
१. छत्रपती शिवाजी महाराज यांना परस्त्री मातेसमान होती. हे त्यांच्या प्रत्येक कृत्यातून शिकायला मिळते. असे असतांना देशाच्या भावी पिढीवर विद्यार्थी दशेतच बुद्धीभेद करून छत्रपती शिवरायांनी लहान मुले आणि स्त्रियांना मारल्याचे खशेटा इतिहास पद्धतशीरपणे शिकवून त्यांच्यावर अयोग्य संस्कार केले जात आहेत. हे लिखाण करणारा लेखक, प्रकाशक आणि संबंधितांवर तत्काल गुन्हा नोंद करण्यात यावा.
२. हा खोटा आणि छत्रपतींचा अपमान करणारे लिखाण असलेली पुरवणी तत्काळ अभ्यासक्रमातून वगळावी. आम्ही सनदशीर मार्गाने याचा निषेध करून या मागण्या करत आहोत. शासनाने याबाबत त्वरीत दखल घ्यावी. अन्यथा समस्त शिवप्रेमी या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडतील, याची शासनाने नोंद घ्यावी.