पाकची तळी उचलणार्या तुर्कस्तानसारख्या इस्लामी राष्ट्रांवर कठोर कारवाई करून भारताने त्याला त्याची जागा दाखवणे आवश्यक आहे !
नवी देहली : तुर्कस्तानने ऐकलेच नाही, तर मलेशियाच्या विरोधात जशी कारवाई केली गेली, तशी तुर्कस्तानच्या विरोधातही कारवाई केली जाईल, अशी चेतावणी भारताने पुन्हा एकदा दिली. यापूर्वीही भारताने तुर्कस्तानला ‘काश्मीरच्या प्रकरणात नाक खुपसू नये’, अशी चेतावणी दिली होती. त्यानंतर आता वरील चेतावणी देण्यात आली आहे. तुर्कस्तानचे राष्ट्रपती रजब तैयब एर्दोगान यांनी काही दिवसांपूर्वी पाकच्या संसदेत काश्मीरवरून पाकची बाजू घेतली होती. या पार्श्वभूमीवर भारताने ही चेतावणी दिली आहे. यापूर्वी मलेशियानेही काश्मीरच्या सूत्रावरून पाकची तळी उचलली होती. याची नोंद घेऊन भारताने मलेशियाच्या विरोधात कृती करतांना त्याच्याकडून भारताला होणारी पाम तेलाच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे मलेशियाला फटका बसला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले, ‘एर्दोगान भारताच्या अंतर्गत घटनांवर बोलत असून सीमेपलीकडील आतंकवादाला इस्लामाबादहून मिळणार्या समर्थनाचाही ते बचाव करत आहेत. ‘तुर्कस्तानच्या भारतविरोधी भूमिकेमुळे द्वीपक्षीय संबंधांवर मोठा परिणाम होऊ शकतो’, असे भारतातील तुर्कस्तानचे राजदूत एस्. अकीर तोरुनलर यांच्याही ध्यानात आणून दिले आहे. एर्दोगान यांना ना इतिहासाची माहिती आहे, ना त्यांना रणनीतीविषयक व्यवहारांची जाणीव आहे. एर्दोगान यांचे वक्तव्य वर्तमानातील संकुचित विचारांना पुढे नेणारे, तसेच इतिहासातील घटनांशी प्रतारणा करणारे आहे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात