आधुनिक विज्ञानासमवेत प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास करणे आवश्यक ! – डॉ. विजय जंगम (स्वामी), संस्थापक-संचालक, ब्रह्मांड वेदिक इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
मुंबई : प्राचीन ग्रंथांतील मार्गदर्शक तत्त्वे आजही विज्ञानयुगात तंतोतंत लागू पडतात. त्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी अशा अभ्यासक्रमांची आवश्यकता आहे. भारतीय प्राचीन विज्ञान सदासर्वकाळ श्रेष्ठच आहे, हे यावरून सिद्ध होते. यासाठीच आधुनिक विज्ञानासमवेत प्राचीन धर्मग्रंथांचा अभ्यास करणे तितकेच आवश्यक आहे, असे मत डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी व्यक्त केले.
फलज्योतिष आणि वास्तूशास्त्र या विषयांचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा ब्रह्मांड वेदिक इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना ज्योतिर्विद्यालंकार, ज्योतिष विशारद आणि वास्तूविशारद या पदव्यांनी गौरवण्यात आले. दादर येथील नवनीत सभागृहात १६ फेब्रुवारी या दिवशी हा कार्यक्रम पार पडला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी, मुंबई समन्वय श्री. बळवंत पाठक हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. विजय जंगम म्हणाले की, ज्योतिष आणि त्याविषयी समाजात असलेली दूरवस्था अन् अपसमज दूर व्हायला हवेत. खर्या अर्थाने ज्योतिषशास्त्र समाजाला मार्गदर्शक शास्त्र म्हणून लाभायला हवे. आतापर्यंत विविध क्षेत्रांतील शेकडो विद्यार्थ्यांनी या संस्थेत ज्योतिष शिक्षणाचा लाभ घेतला आहे. डॉक्टर, अधिवक्ता, अभियंता, शिक्षक, सी.ए., सरकारी कर्मचारी आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी या संस्थेमध्ये अभ्यासक्रम आवडीने आणि विश्वासाने पूर्ण केला आहे.
ज्योतिषशास्त्राला साधनेची जोड द्यायला हवी ! – वैद्य उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
ज्योतिषशास्त्राच्या संवर्धनासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार संशोधनाचे कार्य चालू आहे. या संशोधन कार्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे संशोधन आध्यात्मिक विषयांवर होत आहे. या संशोधन कार्याला सर्वत्रचे ज्योतिषी सहकार्य करू शकतात. ज्योतिषांनी साधना करणे अपेक्षित आहे. ज्योतिष हे वेदाचे ६ वे अंग समजले जाते. त्यामुळे ज्योतिषशास्त्राला ‘वेदांग ज्योतिष’ असेही म्हणतात. यासाठीच ज्योतिषशास्त्राला साधनेची जोड द्यायला हवी. साधनेची जोड दिली, तर ज्योतिषी उत्तम फलादेश कथन करू शकतात, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते वैद्य उदय धुरी यांनी केले.
डॉ. विजय जंगम (स्वामी) म्हणाले की, वैज्ञानिक सिद्धांतावर आधारीत आणि अंधश्रद्धा विरहित विश्लेषण हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या वेळी डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी ब्रह्मांड वेदिक इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेद्वारे मागील १५ वर्षांतील संस्थेच्या वाटचालीविषयी उपस्थितांना माहिती दिली.
विद्यार्थ्यापासून साधक-शिष्य असा प्रवास करत गुरुपदापर्यंत होणे अपेक्षित आहे, याविषयी श्री. बळवंत पाठक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री महादेव जंगम, जगन्नाथ जंगम, मंदार जंगम, गणेश जंगम, प्रतिक जंगम यांनी साहाय्य केले.