पाकमधील न्यायालयाचा आदेश
एखाद-दुसर्या प्रकरणात पाक न्यायालयाने असा निर्णय दिल्याने काहीही साध्य होणार नाही आणि अशा घटना थांबणार नाहीत ! भारताने अशा घटनांमध्ये थेट हस्तक्षेप करून तेथील हिंदु मुलींना न्याय देणे अपेक्षित आहे !
इस्लामाबाद (पाकिस्तान) : पाकमधील मेहक कुमारी या अल्पवयीन हिंदु मुलीचे बलपूर्वक अपहरण, धर्मांतर आणि मुसलमानाशी विवाह करून दिल्याच्या प्रकरणी पाकमधील जेकबाबाद न्यायालयाने आरोपींच्या विरोधात कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच या मुलीला २ वर्षे सुधारगृहात ठेवण्याचाही आदेश दिला आहे. आरोपींच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी पाकिस्तानमध्ये अनेक मुसलमान आणि हिंदु संघटनांनी आंदोलन छेडले होते.
१. अतिरिक्त सत्र न्यायाधीश गुलाम अली कांसिरो यांनी या वेळी बाल विवाहविरोधी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे नमूद केले. तसेच मुलीचे अपहरण करून तिच्याशी विवाह करणारा अली रजा आणि या विवाहात सहभागी असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्या विरोधातही कारवाई करण्याचे निर्देश दिले. मेहक कुमारी १८ वर्षांची असल्याचा दावा करण्यात आला असला, तरी जन्मदाखल्यावरून ती अल्पवयीन असल्याचे सिद्ध होत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
२. यापूर्वी मेहक कुमारी हिचे २ व्हिडिओ समोर आले होते. पहिल्यामध्ये मेहक हिने ‘मी स्वेच्छेने इस्लाम धर्म स्वीकारून अली रजा याच्याशी विवाह केला’, असे म्हटले होते, तर दुसर्या व्हिडिओमध्ये तिने या विधानाच्या उलट सांगत, ‘मला हिंदु धर्मातच राहायचे असून कुटुंबियांकडे जायचे आहे’, असे म्हटले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात