‘महाशिवरात्रीला शिवाला दुग्धाभिषेक करण्याऐवजी दूध दान करा’ – रोट्रॅक्ट क्लबचा धर्मद्रोही उपक्रम !
- हिंदूंच्या सणांच्या वेळी पुरो(अधो)गाम्यांना उठणारा पोटशूळ !
- मुसलमानांचा मातम किंवा ख्रिस्त्यांच्या प्रार्थना सभा येथे जाऊन पुरोगामी उपदेशाचे डोस कधी पाजतात का ?
- महाशिवरात्रीला शिवतत्त्व वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होत असते. त्यामुळे भाविकांना चैतन्याचा लाभ होत असतो. भाविक श्रद्धेने शिवपिंडीवर दुग्धाभिषेक करतात. त्याचा आध्यात्मिक स्तरावर भाविकांना लाभ होतो. हे धर्मशास्त्र जाणून न घेता धर्माचरणाला विरोधासाठी विरोध करणारे हे धर्मविरोधकच होत !
डोंबिवली (जिल्हा ठाणे) : येथील २ शिवमंदिरांत रोट्रॅक्ट क्लबच्या युवा विभागाकडून भाविकांनी श्रद्धेने शिवपिंडीवर अर्पण करण्यासाठी आणलेले दूध गरजूंना देण्याच्या नावाखाली गोळा करण्यात येत होते. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा हा प्रकार सनातन संस्थेच्या साधिका, तसेच हिंदु जनजागृती समिती, बजरंग दल आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे कार्यकर्ते यांनी रोखला.
१. येथील पूर्वेकडील कोटेश्वर महादेव मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे वितरणकेंद्र उभारण्यात आले होते. या वेळी येथे रोट्रॅक्ट क्लबच्या डोंबिवली येथील युवा विभागाकडून भाविकांनी श्रद्धेने शिवपिंडीवर अर्पण करण्यासाठी आणलेले दूध गरजूंना देण्याच्या नावाखाली संकलन केले जात असल्याचा अयोग्य प्रकार सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्रतिमा शिंपी यांच्या निदर्शनास आला. त्यांनी या तरुणांचे प्रबोधन करून त्यांना धर्मशास्त्र समजावून सांगितले; मात्र हे तरुण दूधसंकलन करणे थांबवण्यास सिद्ध नव्हते.
२. यानंतर सौ. शिंपी यांनी या अपप्रकाराविषयी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, बजरंग दलाचे ठाणे जिल्हा गोरक्षा प्रमुख श्री. मोतीराम गोंधळी, बजरंग दलाचे श्री. आकाश पाटील आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते यांना सांगितले. यानंतर काही वेळातच विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ तेेथे आले.
३. या वेळी बजरंग दलाचे डोंबिवली ग्रामीण विभागाचे प्रखंड प्रमुख श्री. समीर भोईर यांनी या तरुणांना ‘‘यासाठी तुम्ही पोलीस किंवा मंदिराचे व्यवस्थापक यांची अनुमती घेतली आहे का ?’’, असे विचारले. त्यावर ते तरुण अनुत्तरीत झाले. (असे जागृत हिंदूच हिंदु धर्माची खरी शक्ती आहेत. प्रत्येकाने हिंदूने अशा प्रकारे हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यास सिद्ध झाले पाहिजेे ! – संपादक)
४. मंदिराच्या विश्वस्तांनीही या तरुणांना वरील कृती करण्यास विरोध दर्शवला. ‘‘तुम्ही करत असलेला प्रकार हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा असून हे अयोग्य आणि गंभीर आहे’’, असे त्यांना सांगितले.
५. त्यानंतर काही वेळातच रोट्रॅक्ट क्लबचे कार्यकर्ते तेेथून निघून गेले.
६. असाच प्रकार रोट्रॅक्ट क्लबच्या वतीने येथील पिंपळेश्वर महादेव मंदिर येथेही होत होता. हा प्रकार हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय संभूस यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलिसांच्या साहाय्याने या तरुणांना हा प्रकार थांबवण्यास भाग पाडले.
हिंदु धर्मियांवरील आघात रोखण्यास आम्ही सिद्ध ! – समीर भोईर, प्रखंड प्रमुख, डोंबिवली ग्रामीण विभाग, बजरंग दल
इतर धर्मियांचे सण आणि उत्सव यांतील धार्मिक कृतींमध्ये केव्हाही हस्तक्षेप न करणार्यांना हिंदूंच्या धार्मिक कृतींमध्ये शास्त्र समजून न घेता हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणी दिला ? यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून असे आघात रोखण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. भाविकांकडून त्यांनी गरजूंना देण्यासाठी गोळा केलेले दूध जर्सी गाय, देशी गाय किंवा म्हशीचे असे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते. हे दूध एकत्र गोळा केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम गरजूंना भोगावे लागू शकतात. त्याचे दायित्व रोट्रॅक्ट क्लब घेणार का ?
हिंदूंना धर्माचे ज्ञान नसल्यामुळे ते अशा अपप्रचाराला भूलतात आणि पापाचे भागीदार होतात ! – मोतीराम गोंधळी, गोरक्षा प्रमुख, ठाणे जिल्हा, बजरंग दल
हिंदूंच्या सणांच्या वेळी अशा प्रकारे अपप्रचार करून हिंदूंचा बुद्धीभेद केला जातो. काही हिंदूंना धर्माचे ज्ञान नसल्यामुळे ते अशा प्रचाराला भुलतात आणि पापाचे भागीदार होतात. अशी महादेवाची होत असलेली चेष्टा आम्ही सहन करणार नाही. दूधदानाचे असे प्रकार इतर मंदिरांमध्येही होऊ नयेत यासाठी प्रयत्न करू. धर्महानी रोखण्यासाठी कुठल्याही क्षणी आम्ही तत्पर राहू.