कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच पातशाह्यांचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक वेळी श्री भवानीदेवीचा आशीर्वाद घेऊन युद्धावर जात. त्यांनी देवळांचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रत्येक कृती हिंदु धर्म रक्षणासाठीच होती. याउलट सद्यस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांना निधर्मी अर्थात ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न हिंदूंनी हाणून पाडावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते जोतिर्लिंग मंदिर, म्हासुर्ली (तालुका राधानगरी) येथे झालेल्या मार्गदर्शनात बोलत होते. याचा लाभ म्हासुर्लीसह पंचक्रोशीतील वाड्यांमधील ९० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला.
या वेळी श्री. दुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील युद्धनीती, त्यांनी धर्मांतर रोखण्यासाठी केलेले प्रयत्न, छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेली साधना, परकियांवर बसवलेला वचक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील महिला आणि शेतकरी यांची परिस्थिती, तर आजच्या काळातील महिला आणि शेतकरी यांची स्थिती, हिंदूंचे संघटन यांसह विविध विषयांवर माहिती दिली. येथील व्याख्यानाच्या आयोजनात सर्वश्री विक्रम जोगम, सदाशिव सुतार, सचिन निकम, शंकर खुडे यांचा पुढाकार होता.
याप्रकारे मल्लेवाडी (तालुका करवीर) येथे तिरंगा तरुण मंडळ यांच्या वतीने गावातील मुख्य चौकात श्री. किरण दुसे यांचे मार्गदर्शन झाले. येथे १५० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. याच्या आयोजनात सर्वश्री बबन कलिकते, उत्तम कदम, संदीप पेंढरे यांसह अन्य कार्यकर्त्यांचा पुढाकार होता.
विशेष
१. ‘मल्लेवाडी (तालुका करवीर) या गावात हिंदुत्वाशी संबंधित कार्यक्रम पहिल्यांदाच झाला’, असे ग्रामस्थांनी सांगितले.
२. दोन्ही ठिकाणी मार्गदर्शनानंतर ग्रामस्थांनी शिवजयंतीच्या निमित्ताने फेरी काढली.