Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ येथे संपर्क दौरा

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ येथे संपर्क दौरा

आज युवकांमध्ये ज्ञानाच्या अभावामुळे मनोबल आणि साधनेच्या अभावामुळे आत्मबल नाही ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

चितवन (नेपाळ) : येथील काही हिंदुत्वनिष्ठांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांची भेट घेतली. या वेळी एक बौद्ध लामांनी सांगितले की, मूळ बौद्ध आणि हिंदू एकत्र होते. बौद्ध पंथातील हिनयान, महायान आणि वज्रयान यांविषयी सांगतांना त्यांनी ‘बौद्ध हे हिंदूंपासून कसे वेगळे आहेत’, हे सिद्ध करण्यात आले. त्यांच्यात वाद निर्माण व्हावेत, यासाठी मूळ प्राचीन बौद्ध ग्रंथांमधे कशा प्रकारे पालट करून ते प्रकाशित केले जात आहेत’, याची काही उदाहरणे दाखवत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील षड्यंत्राविषयी सांगितले. हिंदु धर्माला विरोध करणारे बौद्ध नेपाळमध्ये पाय पसरवत आहेत, याविषयीही त्या बौद्ध लामांनी चिंता व्यक्त केली.

छायाचित्र क्रमांक १ : चितवन (नेपाळ) येथील हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे (१)

या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले,

१. ‘‘भारतात मागील २०० वर्षांपासून हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. धर्मशास्त्राचे अध्ययन न करताच जातीवाद, ब्राह्मणवाद या नावांखाली फूट पाडली जात आहे. रावण ब्राह्मण होता, तर श्रीराम क्षत्रिय होते. सुदामा ब्राह्मण होता, तर श्रीकृष्ण क्षत्रिय होता, तरीही राम आणि कृष्ण यांचेच पूजन होते. ब्राह्मणवाद खरोखर अस्तित्वात असता, तर असे झाले असते का ?

२. ‘हिंदु धर्मात अस्पृश्यता आहे’, असे सांगणार्‍या ब्रिटिशांनी ‘इंडियन ब्लॅक डॉग्ज आर् नॉट अलाऊड’ अशा पाट्या लावल्या होत्या. भारतियांना राज्यघटना लिहिण्यास सांगणार्‍या इंग्लंडमध्ये आजही राज्यघटना लिखित स्वरूपात नाही. ‘हिंदु धर्मात उच्च-नीच भेदभाव आहे’, असे म्हणणार्‍यांच्या देशात ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ आणि ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ का आहे ? आम्हाला मानवतावाद सांगणार्‍यांनी अमेरिकेमध्ये ‘रेड इंडियन्स’च्या कत्तली का केल्या ?

३. सद्य:स्थितीतील हिंदूंची स्थिती पालटण्यासाठी धर्माचा शास्त्रशुद्ध प्रसार करणे आवश्यक आहे. ‘जातीयवादामुळे समाजात भांडणे होतात’, असे सांगितले जाते, परंतु संघर्ष आणि भांडणे यांचे कारण जातीयवाद नसून सत्ता, स्वार्थ, अधिकार अन् संपत्ती हे आहे.

४. आज युवकांमध्ये ज्ञानाच्या अभावामुळे मनोबल नाही आणि साधनेच्या अभावामुळे आत्मबल नाही.’’

या वेळी श्रीकृष्ण चैतन्य, श्री केशवाचार्य, चितवन मेडिकल कॉलेजच्या संचालिका ममता न्यापाने, श्रीराम कणेरो, टंका पौडेल आदी मान्यवर उपस्थित होते. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री. प्रेमनिधी भारद्वाज यांनीही सद्गुरु डॉ. पिंगळे यांची भेट घेतली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करून सत्त्वगुणी बनल्यास राष्ट्रमनात सत्त्वगुणी विचार निर्माण होतील ! – डॉ. माधव भट्टराई, अध्यक्ष, राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ

छायाचित्र क्रमांक २ : राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई यांना अधिवेशनाचे निमंत्रण देतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे (उजवीकडे)

काठमांडू (नेपाळ) : राष्ट्रीय धर्मसभा नेपाळचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराई आणि नेपाळच्या पूर्व मंत्री डॉ. कांता भट्टराई यांची सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी १० फेब्रुवारी या दिवशी भेट घेतली. या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले साधना करण्यासाठी का सांगतात’, याविषयी स्वत:चा अनुभव सांगत असतांना डॉ. भट्टराई म्हणाले, ‘‘२० वर्षांपूर्वी पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी मला सांगितले होते की, ‘कार्य करा, पण साधना करा. कारण साधना नसेल, तर संघटना यशस्वी होणार नाही.’ होमिओपॅथीनुसार मनुष्याच्या शरिरात आजार निर्माण होण्यापूर्वी त्याच्या मनात आजार निर्माण होतो. तसेच राष्ट्रातील नागरिकांच्या मनात जेव्हा भोगवादी आणि अनावश्यक विचार असतात. तेव्हा राष्ट्रात अराजकता निर्माण होते. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘साधना करा आणि सत्त्वगुणी बना’, असे सांगितले आहे. यामुळे सत्त्वगुणी विचार राष्ट्रमनात (नागरिकांच्या मनात) निर्माण होतील आणि त्याचा परिणाम होईल.’’ सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी डॉ. भट्टराई यांना ‘नवम्अ खिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे निमंत्रणही दिले.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी नेपाळ येथील ‘फोरम ऑफ नेपालीज् मीडिया’चे अध्यक्ष प्रा. निरंजन ओझा यांची घेतली भेट

काठमांडू (नेपाळ) : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळ येथील ‘फोरम ऑफ नेपालीज् मीडिया’ (नेपाळी प्रसारमाध्यम मंच) चे अध्यक्ष प्रा. निरंजन ओझा यांची भेट घेतली असता प्रा. ओझा यांनी मागील ७-८ वर्षांत नेपाळमधील युवा पिढीवर तीव्र गतीने पाश्‍चिमात्य संस्कृतीचा प्रभाव होत असल्याविषयी चिंता व्यक्त केली. या प्रसंगी सध्या ‘कोरोना व्हायरस’ने जी दहशत पसरवली आहे, याचे उदाहरण देत सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘टेंब्येस्वामी यांच्या चरित्र ग्रंथात अगोदरच सांगून ठेवले आहे की, अशा प्रकारच्या समस्यांमागे आध्यात्मिक कारण असते; परंतु जेथे गुरूंच्या कृपेचे कवच असते, तेथे या शक्तींचा प्रभाव नसतो. प्रा. निरंजन ओझा यांनी काठमांडू येथील श्री शांति विद्या माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांसाठी ‘सध्याची शिक्षणव्यवस्था’ या विषयावर सद्गुरु डॉ. पिंगळे यांचे मार्गदर्शन आयोजित केले.

श्री शांति विद्या माध्यमिक विद्यालयात शिक्षकांसाठी मार्गदर्शन

शिक्षक हे व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या निर्मितीची प्रक्रिया करतात ! – सद्गुरु (डॉ.) पिंगळे

छायाचित्र क्रमांक ३ : सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांच्या मार्गदर्शनाला उपस्थित श्री शांति विद्या माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक

श्री शांति विद्या माध्यमिक विद्यालयात शिक्षकांसाठी झालेल्या मार्गदर्शनात सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘शिक्षक केवळ शिक्षण देत नसून ते व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांच्या निर्मितीची प्रक्रिया करत असतात. शिक्षणाचा उद्देश काय ?, हे स्पष्ट असले पाहिजे. शिक्षणाचा प्रथम उद्देश ‘मनुष्याला मनुष्य म्हणून जागृत करणे आणि त्याला देवत्वाकडे घेऊन जाणे’, हा आहे. माणूस ‘मनुष्य’ बनणार नाही, तोपर्यंत इतरांचा विचार करणार नाही. यामुळे संघर्ष होत रहाणार. प्रत्येक गोष्टीमागे अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसा आहे. साधना आणि उपासना केल्यावर चित्तशुद्धी होते आणि विश्‍लेषण करण्याची क्षमता निर्माण होते.’’

‘शिक्षकांनी अध्यात्म आणि धर्म यातील भेद काय ?’, ‘मंदिरात गेल्यानेच मनुष्य धार्मिक होतो असे आहे का ?’ आदी विविध प्रश्‍न विचारून स्वत:च्या शंकांचे निरसन करून घेतले. मार्गदर्शनाच्या प्रारंभी प्रा. निरंजन ओझा यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचा परिचय करून दिला. तसेच ‘गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलेले अनुभव’ उपस्थितांमोर मांडले.

क्षणचित्र : अनेक शिक्षकांनी ‘आम्हाला अजून जाणून घेण्याची इच्छा आहे’, असे सांगितले.

विश्‍व हिंदु महासंघ नेपाळचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र अधिकारी अन् वरिष्ठ उपाध्यक्ष भरतराज पौडेल यांना ‘नवम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे निमंत्रण

छायाचित्र क्रमांक ४ : डॉ. रामचंद्र अधिकारी (१), भरतराज पौडेल (२) आणि त्यांचे सहकारी यांना अधिवेशनाचे निमंत्रण देतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे (सर्वांत उजवीकडे)

विश्‍व हिंदु महासंघ नेपाळचे अध्यक्ष आणि माजी मंत्री डॉ. रामचंद्र अधिकारी आणि महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरतराज पौडेल यांची भेट घेऊन सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी ‘नवम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे निमंत्रण दिले. या वेळी डॉ. रामचंद्र अधिकारी यांनी विश्‍व हिंदु महासंघाच्या वतीने सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांना सनातन धर्म-संस्कृती विषयक आंतरराष्ट्रीय महासंमेलनाचे निमंत्रण दिले. भरतराज पौडेल यांनी ‘महासंमेलनाचे आयोजन चांगले कसे करावे’, यासाठी मार्गदर्शन आणि साहाय्य करण्याची विनंती केली. सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी हिंदु जनजागृती समिती ही भारतभरात अधिवेशनांच्या माध्यमातून राष्ट्र-धर्माप्रती असलेल्या कर्तव्यांविषयी कशा प्रकारे जागृती करत आहे, याविषयी सांगितले.‘ राष्ट्र-धर्म कर्तव्याप्रती जागृत असलेल्या लोकांसाठीच लोकराज्य (लोकशाही) आहे. यासाठी विविध विषयांवरील कार्यशाळांचे आयोजन करून समिती ही अन्य हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना सक्षम बनवते’, असेही सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *