-
तांडूर (आंध्रप्रदेश) येथे शिवजयंतीच्या दिवशी मिरवणूक आणि सभा यांचे आयोजन
-
उपस्थित ३ सहस्र धर्माभिमानी हिंदूंकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संकल्प
-
हिंदु जनजागृती समितीचा सहभाग
तांडूर (आंध्रप्रदेश) : येथे उपस्थित प्रत्येक हिंदूने संकल्प केला पाहिजे की, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु राष्ट्रासाठी जीवन समर्पित केले, तसेच आपणही आपले जीवन हिंदु राष्ट्रासाठी समर्पित केले पाहिजे, असे आवाहन भाग्यनगर येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी येथे केले. १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येथे मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीचा शेवट येथील शिवाजी चौकात होऊन तेथे सभा घेण्यात आली. या सभेला संबोधित करतांना टी. राजासिंह बोलत होते. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा बौद्धिक प्रमुख श्री. कुरा जयदेव आणि हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनीही मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या सौ. तेजस्वी व्यंकटापूर यांनी केले. हिंदू उत्सव समिती आणि हिंदू वाहिनी यांनी या मिरवणुकीचे अन् सभेचे आयोजन केले होते. यात ३ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदू सहभागी झाले होते. त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संकल्प केला.
श्री. चेतन गाडी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे प्रसंग सांगून म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे जर आपण आज हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा संकल्प केल्यास येणारे भविष्य आनंदमय असेल. जीवनाचा त्याग केल्यानेच एका आदर्श राष्ट्राची निर्मिती होते. सध्या धर्माला ग्लानी आली आहे आणि राष्ट्राचे आध्यात्मिक बळ क्षीण झाले आहे. त्यामुळे धर्मसंस्थापनेची आवश्यकता आहे. धर्मसंस्थापनेच्या महायज्ञासाठी तन, मन, धन अर्पण करण्याची आपण जर सिद्धता ठेवली, तर पुढील एक सहस्र वर्षापर्यंत हिंदु राष्ट्र कार्यरत राहील. या दैवी कार्यामध्ये समर्पित होण्यासाठी मी भगवान श्रीकृष्ण, आमचे गुरु आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो.