हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी स्वतःमध्ये आध्यात्मिक बळ असणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था
चिपळूण : सध्याची हिंदु धर्मियांची स्थिती फारच गंभीर आहे. यातून बाहेर पडण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी स्वतःमध्ये आध्यात्मिक बळ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील स्वामी मंगल हॉल, बहाद्दुरशेख नाका येथे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या अधिवेशनात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून १३० धर्मप्रेमी सहभागी झाले होते.
सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुढे म्हणाल्या,
१. आध्यात्मिक बळ मिळवण्यासाठी आणि स्वतःची जलद गतीने वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रत्येकाने ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
२. कालमाहात्म्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. त्यामुळे या कार्यात सहभागी होणार्यांची समष्टी साधना होणार आहे.
३. आज जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अशात राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी अधिकाधिक वेळ देण्याची आवश्यकता असतांना हिंदू मात्र एका दिवसाच्या वेळेचाही त्याग करायला सिद्ध नाहीत.
४. आपण राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी आज जर वेळेचा त्याग केला नाही, तर त्याचे परिणाम आपल्या पुढील पिढ्यांना भोगावे लागतील, याचा समस्त हिंदूंनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी माहितीचा अधिकार कायदा हे प्रभावी शस्त्र ! – अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी
माहिती कायद्याचा आधार घेऊन आपण राष्ट्र आणि धर्म या कार्यासाठी त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. त्याआधारे सरकारवर लक्ष ठेवण्याचे काम करू शकतो. हा कायदा सर्व स्तरावर लागू होतो. कायद्यासाठी प्रत्येक कार्यालयात जनसंपर्क अधिकारी नेमलेला असतो. या कायद्याच्या माध्यमातून आपण जी माहिती मागवतो, ती ३० दिवसांत जर मिळाली नाही, तर संबंधित अधिकार्यांना २५० रुपये २५ सहस्र रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघटित होण्याची आवश्यकता ! – ह.भ.प. नंदकुमार कालेकर, चिपळूण
१. पृथ्वीवर ख्रिस्त्यांची १५७ राष्ट्रे, मुसलमानांची ५२, तर बौद्धांची १२ राष्ट्रे आहेत; परंतु १०० कोटी हिंदूंसाठी पृथ्वीच्या पाठीवर एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही.
२. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये मंदिरे सुरक्षित होती. माय-भगिनी सन्मानाने जगत होत्या; परंतु आजची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. माणसे जनावरांप्रमाणे वागू लागली आहेत. आपली सद्यःस्थिती केविलवाणी झाली आहे.
३. धर्मविरोधकांचा उद्दामपणा वाढला आहे. याचे ताजे उदाहरण सांगायचे झाले, तर एम्.आय.एम्.चे वारिस पठाण यांनी ‘१५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना भारी आहेत’, अशा आशयाचे केलेले वक्तव्य होय. यासाठीच आजच्या परिस्थितीत हिंदूंना त्यांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यासाठी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे.
४. आगामी कठीण काळाविषयी अनेक द्रष्टे संत, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच प्रेरणेने हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र्र स्थापनेचे कार्य गेल्या २० वर्षांहून अधिक काळ अव्याहतपणे चालू आहे. हे कार्य ईश्वरी अधिष्ठानावर आधारित असल्यामुळेच त्यास उत्तरोत्तर हिंदूंचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. हे कार्य आज सर्वत्र प्रभावीपणे चालू आहे. हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन हे हिंदूसंघटक घडवणारी कार्यशाळा ! – मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
१. हिंदु जनजागृती समितीची स्थापना चिपळूण येथे, म्हणजेच पवित्र अशा परशुरामभूमीत झाली आहे. या समितीचे कार्य अल्पावधीतच केवळ देशभरच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्येही पोचले आहे.
२. हे कार्य ‘सामर्थ्य आहे चळवळेचें। जो जो करील तयाचें ॥ परंतु तेथें भगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥’ या समर्थांच्या उक्तीनुसार ईश्वरी अधिष्ठान ठेवून अव्याहतपणे चालू आहे.
३. सद्य:स्थितीत हिंदु धर्मावर सातत्याने होणारी आक्रमणे, हिंदूंच्या मंदिरांचे होणारे सरकारीकरण, धर्मांधांनी चालू केलेला ‘लव्ह जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ ‘हलाल सर्टिफिकेट’ या सर्व माध्यमांतून ‘आर्थिक जिहाद’, यांसारखी अनेक सुलतानी संकटे ‘आ’ वासून उभी आहेत. यावर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ हा एकमेव उपाय आहे.
४. हिंदु राष्ट्राची स्थापनेसाठी प्रत्येक राष्ट्र्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूने स्वतःचे कर्तव्य म्हणून धर्माचरण करणे अन् त्याविषयी अन्य हिंदु धर्मबांधवांमध्ये जागृत करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यादृष्टीने हिंदु जनजागृती समिती राष्ट्र आणि धर्म यांप्रतीचे कर्तव्य म्हणून विविध उपक्रम राबवत असून त्यामध्ये प्रत्येक हिंदूनेही सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावणे आवश्यक आहे.
हिंदु राष्ट्राचे कार्य करणार्यांनी ‘आपण ईश्वराचे सेवक आहोत’, असा भाव ठेवून कार्य करायला हवे ! – सद्गुरु सत्यवान कदम
१. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदूसंघटन करणे आवश्यक आहे. हिंदु राष्ट्राच्या भावनेने प्रेरित झालेल्या प्रत्येक हिंदूला आपला आधार वाटला पाहिजे.
२. हिंदु राष्ट्र स्थापनेचे भव्य कार्य आपल्याकडून होण्यासाठी आपली तळमळ वाढवली पाहिजे.
३. आपण साधारण धर्मसेवक आहोत आणि धर्मसेवा करण्याचे कर्म केवळ आपल्या हातात आहे. त्याच्या फळावर आपला अधिकार नाही आणि जरी फळ मिळाले, तरी ते ‘ईश्वरी प्रसाद’ म्हणून स्वीकारायचे आहे. ईश्वरी कार्य ईश्वराच्या आशीर्वादानेच होत असते.
४. भारताची वैज्ञानिक संस्था ‘इस्रो’ला सातत्याने संशोधनात यश लाभत आहे. याचे कारण त्यांच्या शास्त्रज्ञांना आध्यात्मिक अधिष्ठान आहे आणि तेथील शास्त्रज्ञ स्वत:ला ईश्वराचे सेवक समजतात. हिंदु राष्ट्राचे कार्य करणार्यांनीही आध्यात्मिक अधिष्ठान आणि ‘आपण ईश्वराचे सेवक आहोत’, असा भाव ठेवून कार्य केले, तर निश्चित यश लाभेल, याची निश्चिती बाळगा.
‘हलाल’ अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढत आहे ! – मनोज खाडये
आपल्या नित्य वापरात येणार्या वस्तू साबण, सौंदर्यप्रसाधने, सुकामेवा , फळे अशा प्रकारची अनेक उत्पादने ‘हलाल सर्टिफिकेट’च्या माध्यमातून विक्री होत आहेत. भारत सरकार अनुमती देतांना ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ ‘एफ्.डी.ए.’या माध्यमातून सर्टिफिकेट देते. त्या माध्यमातून सरकार चाचणीही घेते; मात्र ‘हलाल सर्टिफिकेट’ला अशी कोणतीही प्रयोगशाळा नाही. आज हलाल अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढत आहे. वर्ष २०१७ मध्ये हलाल अर्थव्यवस्था २.१ ट्रिलीयन अमेरिकन डॉलर्स (१ ट्रिलीयन म्हणजे १ वर १२ शून्य – १००० अब्ज) इतकी होती. वर्ष २०२३ मध्ये ती ३ ट्रिलीयन अमेरिकन डॉलर्सवर पोचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याचा अर्थ हलाल अर्थव्यवस्था लवकरच भारताच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल.
हिंदुत्व जपण्याचे कार्य करतांना खरा आधार हिंदु जनजागृती समितीचा मिळतो ! – शशिकांत मोदी, नगरसेवक, शिवसेना
कोणत्याही कामासाठी आपल्याला एक विशिष्ट समूह सिद्ध करावा लागतो. चांगले काम असते, त्याला प्रतिसाद अल्प असतो; पण तोच प्रतिसाद आपल्याला यशाकडे नेतो. आपली ओळख दाखवतांना ती हिंदु म्हणून दाखवायला हवी. आपले आचरण हिंदु धर्मानुसार असले पाहिजे. ‘प्रत्येकाने प्रतिदिन टिळा लावणे’, ‘एकमेकांना भेटतांना हस्तांदोलन न करता नमस्कार करणे’ अशा धर्माचरणाच्या कृती करायला हव्यात. जेव्हा आपली कृती समोरचा स्वीकारतो, तेव्हा संपर्क अभियान चालू होते. आमच्यासारख्या मंडळींना हिंदुत्व जपण्याचे कार्य करतांना खरा आधार जर कोणाचा असेल, तर तो हिंदु जनजागृती समितीचा आहे, असे आम्ही ठामपणे सांगू शकतो. त्यामुळेच हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांमध्ये आम्ही गेल्या ७ वर्षांपासून सहभागी आहोत.
धर्मप्रेमींचे मनोगत
१. ह.भ.प. बाळकृष्ण बाईत, कात्रण, दापोली : ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे पहिले पाऊल म्हणचे आजचे हे प्रांतीय अधिवेशन आहे. आम्हाला आज समितीचे पूर्ण कार्य सविस्तर समजले. तरुणांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करीन. हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी मी तन-मन-धन सर्वस्व अर्पण करण्यास सिद्ध आहे.
२. श्री संदीप मांडवकर, उपसरपंच, रुखी, दापोली : खर्या अर्थाने आपला धर्म काय सांगतो, याची जाणीव या अधिवेशनातून झाली. या धर्मकार्यात स्वतःच्या कुटुंबापासून प्रारंभ करायला हवा. ‘हलाल’च्या माध्यमातून आपण जिहादला साहाय्यच करत आहोत. मी स्वतः आता हे करणार नाही आणि त्याचा प्रसारही करीन. हिंदु राष्ट्र आपण ३ वर्षांत नाही, तर ३ मासांत कसे आणू ?, हा विचार केला पाहिजे.
३. श्री. अशोक रेवाळे, भडवळे, दापोली : हा विषय गावात पोचायला पाहिजे, यासाठी मी सहकार्य करीन.
४. श्री. विनय माळी, खेड : अशा स्वरूपाचे अधिवेशन हे तरुणांसाठी होणे आवश्यक आहे. त्यासाठी मी प्रयत्न करीन.
५. श्री. संदीप सोहनी, मार्गताम्हाणे, चिपळूण : ‘सनातन प्रभात’वाचणे आणि प्रत्यक्ष अनुभवणे यात काय फरक आहे, याची प्रचीती आली. या कार्याचा वणवा समाजात पसरवण्यासाठी मी प्रयत्न करीन. माझ्या पंचक्रोशीत हा विषय पोचवेन.
६. श्री. रवींद्र पाटील, खेड : या कार्यासाठी मी आजपासून १०० प्रतिशत प्रयत्न करीन.
७. श्री. नीलेश सावंत, बांदा, सिंधुदुर्ग : मला हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याच्या माळेतील मणी बनण्याची संधी या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळाली. मी भाग्यवान आहे.
८. श्री. अभिलाष देसाई, तांबुळी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग : ज्या धर्मात जन्माला आलो, त्या धर्मासाठी काहीतरी करायला पाहिजे. त्याची वाट मला आज मिळाली. मी शेवटच्या श्वासापर्यंत धर्मकार्य करीन.