‘हे देश बंदी घालू शकतात, तर भारत का घालू शकत नाही ?’, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे !
नवी देहली : अश्लील संकेतस्थळांमुळे देशात बलात्कारांचे प्रमाण वाढत आहे. बलात्कार करणार्या आरोपींना अटक केल्यावर त्यांनी अश्लील चित्रपट पहात असल्याची स्वीकृती दिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. भारतात ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ची (लहान मुलांच्या अश्लील चित्रपटांची) निर्मिती, विक्री आणि वापर यांवर पूर्णपणे बंदी आहे. यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे. तरीही असे व्हिडिओ, छायाचित्रे आदी साहित्य संकेतस्थळांवर पहाता येत आहेत. जगातील ४२ देशांत अश्लील चित्रपटांवर (पोर्नोग्राफीवर) पूर्णपणे बंदी आहे, तर अशी बंदी भारतात का घालता येत नाही ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१. पाकिस्तानने गेल्या वर्षी ८ लाख अश्लील संकेतस्थळांवर त्यांच्या देशात बंदी घातली आहे. पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने अशी संकेतस्थळे बंद करून ११ सहस्र प्रॉक्सी साईट्स आणि नेटवर्क यांनाही बंद केले आहे. तसेच तेथे ज्या नेटवर्कच्या माध्यमातून अशी संकेतस्थळे सहज पहाता येतात, त्या नेटवर्कवरही काटेकोरपणे लक्ष ठेवले जात आहे.
२. श्रीलंकेनेही गेल्या वर्षीच अश्लील संकेतस्थळांवर बंदी घालण्यासाठी नियम लागू केले आहेत. येथे पोर्नोग्राफी साहित्य बाळगणे, बनवणे आणि विक्री करणे यांसाठी २० वर्षांपर्यंतचा कारावास, दंड आणि मालमत्ता जप्त करण्याच्याही तरतुदींचा समावेश आहे.
३. बांगलादेशातही गेल्या वर्षी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १ सहस्र ५६३ संकेतस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे.
४. मलेशियात पोर्नोग्राफीवर पूर्णपणे बंदी आहे. गेल्या वर्षी येथे पोलिसांनी ‘इंटरनेट क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रेन इन्व्हेस्टिगेशन युनिटची स्थापना केली आहे. या माध्यमातून ३ सहस्रांपेक्षा अधिक संकेतस्थळांना बंदी घालण्यात आली आहे.
५. ब्रिटनही १८ वर्षांखालील मुलांना प्रौढांसाठीच्या साहित्यापासून दूूर ठेवण्यासाठी कायदा करत आहे. असे करणारा तो जगातील पहिलाच देश आहे. कायद्याचा मसुदा बनवण्यात होणार्या विलंबामुळे गेल्या वर्षी ब्रिटिश संसदेत स्टेट सेक्रेटरी जेरेमी राइट यांनीही क्षमाही मागितली आहे.
६. पोर्नोग्राफी आणि त्याच्याशी संबंधित संकेतस्थळांवर पूर्णपणे बंदी आणणार्या देशांत दक्षिण आणि उत्तर कोरिया, सौदी अरेबिया, इजिप्त, बांगलादेश अन् नेपाळ यांचाही समावेश आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात