भारतमातेवर बलपूर्वक घालण्यात आलेला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा काढून भारताला पुन्हा तेजस्वी हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ
वाराणसी : पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याप्रमाणे भारतातील हिंदूंची संख्या घटत आहे. १९९० या वर्षी आपल्याच देशात साडेचार लाख हिंदूंना विस्थापित व्हावे लागले. काश्मीरमधील ३७० कलम काढून टाकण्यात आले असले, तरी काश्मीर अजूनही आतंकवादापासून मुक्त झालेले नाही. भविष्यात हिंदूंवर ही परिस्थिती येऊ नये, यासाठी घटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द काढून टाकून भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची आवश्यकता आहे. भारतमातेच्या शरिरावर बलपूर्वक घालण्यात आलेला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा काढून भारताला पुन्हा तेजस्वी हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक आहे, असे विचार येथील आशापूर चौकातील मधुवन लॉन्स येथे २३ फेब्रुवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत समितीचे पू. नीलेश सिंगबाळ यांनी व्यक्त केले. तसेच या सभेत सनातन संस्थेच्या साधिका सौ. प्राची जुवेकर आणि केंद्रीय दुर्गापूजा समितीचे अध्यक्ष श्री. तिलकराज मिश्र यांनी त्यांचे विचार मांडले. कु. कुहू पांडेय यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
धर्मशिक्षणाच्या आधारे हिंदु समाजाला संघटित करणे आवश्यक ! – तिलकराज मिश्र, अध्यक्ष, केंद्रीय दुर्गापुजा समिती
श्री. तिलकराज मिश्र म्हणाले, ‘‘धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु समाजामध्ये धर्माविषयी अभिमान अल्प होत आहे. हिंदु समाजाला संघटित करण्यासाठी धर्मशिक्षण घरोघरी पोचवण्याची आवश्यकता आहे. धर्मशिक्षणानेच हिंदु समाजात पसरवले गेलेले अपसमज दूर होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना शक्य होईल.’’
सनातन संस्थेकडून धर्मग्रंथांतील कृतींचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संधोधन चालू ! – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था
सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर म्हणाल्या, ‘‘हिंदु धर्मग्रंथात सांगितलेल्या प्रत्येक कृतीला वैज्ञानिक कारण आहे. सनातन संस्था आधुनिक तंत्रज्ञान वापरून नियमितपणे संशोधन करत आहे. येणार्या आपत्काळाच्या दृष्टीने तसेच वैयक्तिक जीवनात येणार्या कठीण प्रसंगांच्या दृष्टीने स्वतःमधील आत्मबल वाढवणे आवश्यक आहे. यासाठी साधना करण्याची आवश्यकता आहे. यासमवेतच वैज्ञानिक दृष्टीने धर्माचा अभ्यास करून धर्माचरण करणे आवश्यक आहे.’’
या सभेसाठी हिंदु युवा वाहिनीचे प्रदेशातील उपाध्यक्ष श्री. मनीष पांडेय, ‘इंडिया विथ विजडम्‘चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, विश्व सनातन सेना संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल सिंह, पहडिया व्यापारी मंडळाचे महामंत्री श्री. अरविंद लाल, हिंदू जागरण मंचाचे श्री. रवि श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेसाठी १७० धर्मप्रेमी उपस्थित होते. सभेच्या ठिकाणी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी आशापूर भागात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले.
वणी (यवतमाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
येणार्या कठीण काळात हिंदूंचे प्रभावी संघटन होणे आवश्यक ! – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती
धर्मांधांची कुरापतखोर वृत्ती पहाता येणार्या कठीण काळात हिंदूंचे प्रभावी संघटन होणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत खत्री यांनी व्यक्त केले. या वेळी त्यांनी शाहीन बाग, चांदबाग, उत्तर-पूर्व देहली येथील हिंसा प्रकरण, तसेच हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून होणार्या आर्थिक जिहादची उदाहरणे दिली. ते येथील श्री जैताई माता देवस्थानच्या सभागृहात २६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. त्या वेळी बोलत होते.
या वेळी सनातन संस्थेच्या सौ. मंदाकिनी डगवार म्हणाल्या की, हिंदु धर्मातील रुढी-परंपरा यांचे पालन आणि धर्माचरण करून साधना केल्यानेच आपण आसुरी शक्तींशी लढू शकणार आहोत; म्हणून प्रत्येकाने साधना करूया. सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. प्रवीण ढेंगळे यांनी केले. सभेला १०५ धर्मप्रेमींची उपस्थिती होती.