आमदार भरतशेठ गोगावले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !
मुंबई : १५ कोटी (मुसलमान) १०० कोटींवर (हिंदुंवर) भारी असल्याचे दाखवून देऊ, असे देशद्रोही वक्तव्य करून धार्मिक सलोखा बिघडवून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणारे एम्.आय.एम्. पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी आमदार श्री. भरतशेठ गोगावले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे करण्यात आली. वारिस पठाण यांनी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील सार्वजनिक सभेत हिंदूंना दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर समितीच्या वतीने २५ फेब्रुवारी हे निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या हिंदु देवता आणि धार्मिक प्रतिके यांच्या टाईल्स काढण्याची मागणी
हिंदूंच्या देवता, संत हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये (जिन्यावर, संरक्षण भिंतीवर, कचरा टाकण्याच्या ठिकाणी आणि अन्य ठिकाणी), तसेच बाहेरील सार्वजनिक वा खाजगी जागेत कोणीही थुंकू नये, लघवी करू नये, कचरा टाकू नये यांसाठी हिंदूंच्या देवता, संत, धार्मिक स्थळे यांचे चित्र असलेल्या टाईल्स लावलेल्या आहेत. अनेकदा असे आढळून येते की, त्यावर काही जणांकडून घाण केली जाते. श्रद्धास्थानांची विटंबना केली जाते. ते अत्यंत क्लेशदायक, तसेच संताप आणणारे आहे. त्यातून जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. मुळात देवतांच्या मूर्ती वा धार्मिक प्रतीक यांचे स्थान देवळात वा घरात असले पाहिजे, थुंकण्यासाठीच्या जागेवर नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. यापुढे गृहनिर्माण संस्था, खाजगी तथा सार्वजनिक जागा येथे लावलेल्या सर्व देवता आणि धार्मिक प्रतिके यांच्या टाईल्स, फरशा, चित्रे त्वरित काढून त्या दृष्टीने नियम करण्यात यावेत, या मागणीचे निवेदनही या वेळी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना समितीच्या वतीने देण्यात आले.