प्रभु श्रीरामाच्या जळगावनगरीतील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत निनादला हिंदु राष्ट्राचा उद्घोष !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा ७ सहस्र धर्मप्रेमींचा निर्धार !
जळगाव : ग्रामदेवता प्रभु श्रीरामाप्रती अपार श्रद्धा असणार्या जळगाववासियांनी रामराज्याप्रमाणे आदर्श असे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार येथील शिवतीर्थ मैदानावर केला. ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ च्या जयघोषात १ मार्च या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी एकवटलेल्या हिंदूंनी एकत्रितपणे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची शपथ घेतली. ७ सहस्र हिंदूंनी उपस्थित राहून हिंदु राष्ट्राचा प्रेरक विचार समस्त हिंदु बांधवांमध्ये प्रसृत करण्याचा निश्चय केेला. वीरश्री निर्माण करणार्या शंखनादाने या सभेला प्रारंभ झाला. त्यानंतर व्यासपिठावरील मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. वेदमूर्ती श्री. पुरुषोत्तम शुक्ल, वेदमूर्ती श्री. भूषण मुळ्ये, वेदमूर्ती श्री. महेंद्र जोशी, वेदमूर्ती श्री. देवेंद्र साखरे आणि वेदमूर्ती श्री. निखिल पोहनकर यांनी वेदमंत्रपठण केले. यानंतर सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती दिली. सभेचे सूत्रसंचालन कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. सभेच्या शेवटी उपस्थित धर्मप्रेमींनी हिंदुु राष्ट्राच्या स्थापनेची शपथ घेतली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यासपिठावरील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी त्यांचा आशीर्वाद घेतला.
देहली येथील दंगलीत हत्या झालेल्या हिंदु बांधवांना श्रद्धांजली अर्पण
देहली येथील दंगलीमध्ये हत्या झालेल्या निर्दोष हिंदु बांधवांना सद्गती मिळावी, यासाठी सभेला उपस्थित सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी हिंदु संस्कृतीप्रमाणे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करून त्यांना सद्गती मिळावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली.
धर्मप्रेमींची कृतीशीलता
- बैठका आयोजित करून धर्मप्रेमींचा स्वयंस्फूर्तीने प्रचार !
- धर्मशिक्षणवर्गातील महिलांचाही प्रचारात सक्रीय सहभाग
- धर्माभिमानी रिक्शाचालकांकडून व्हॉट्सअॅप गट सिद्ध करून प्रचार
- धर्मप्रेमींकडून स्वत:च्या गावासह आजूबाजूच्या गावांत दायित्व घेऊन सभेचा प्रचार
- धर्मप्रेमींनी स्वत: ‘पोस्ट’ सिद्ध करून सामाजिक माध्यमांद्वारे केला सभेचा प्रचार
- धर्मप्रेमींनी सभेसाठी स्वत:हून अर्पण दिले !
न्याय, समता आणि बंधुता यांची शिकवण देणारे हिंदु राष्ट्रच सर्वकल्याणकारी असेल ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
रामराज्यात कुणावरही अन्याय होत नव्हता. असेच हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केले. याच संकल्पनेवर आधारित हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राला कोणी विरोध करण्याचे कारण नाही. जर्मनी, इटली, इंग्लंड, फ्रान्स या ख्रिस्ती राष्ट्रांत, तसेच सौदी अरेबिया, ओमान, तुर्कस्थान आदी मुसलमान राष्ट्रांमध्ये जर हिंदू जाऊन काम करू शकतात, राहू शकतात, तर भारत हिंदु राष्ट्र झाल्यानंतर अन्य धर्मीय येथे का राहू शकणार नाहीत ? ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही हिंदु राष्ट्राची संकल्पना आहे; मात्र धर्मनिरपेक्षतावाद्यांनी हिंदु राष्ट्राविषयी अनाठायी भीती निर्माण केली आहे. न्याय, समता आणि बंधुता यांची शिकवण देणारे हिंदु राष्ट्रच सर्वकल्याणकारी असेल.
गोमाता, मंदिरे आणि धर्मशास्त्र यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात चालू असलेले गृहयुद्ध, हे भारताला कमकुवत करण्याचे सुनियोजित षड्यंत्र ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
‘संविधान बचाव रॅली’ काढणार्यांना राज्यघटनेतील समान नागरी कायदा का मान्य नाही ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद
स्वरक्षणाची प्रात्यक्षिके पाहून धर्मप्रेमींकडून स्वरक्षणवर्गाची मागणी
समाजातील महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता प्रत्येकाला स्वत:चे रक्षण करता यावे, यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. ही प्रात्यक्षिके पाहून सभेला उपस्थित धर्मप्रेमींनी त्यांच्या भागांत स्वरक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.
खामगाव (जिल्हा सोलापूर) येथे पार पडली हिंदु राष्ट्र-जागृती सभा
खामगाव : येथील श्री विठ्ठल मंदिर पटांगण येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे म्हणाल्या की, सध्या राष्ट्र आणि धर्म संकटात आहे. प्रत्येक १५ मिनिटाला या देशात एका मुलीवर बलात्कार होत आहे. गायींची राजरोसपणे हत्या होत आहे. आतातरी हिंदूंनी जागे होऊन हिंदु राष्ट्र यावे यासाठी आपापल्या परीने योगदान देऊया. आपण हिंदु आहोत. त्यामुळे नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्यालाच देऊया. या सभेला १८० महिला आणि पुरुष उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. खामगाव येथे सभेला स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय होती.
२. या सभेतून प्रत्येक आठवड्याला धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
नगर (महाराष्ट्र) येथे पार पडली हिंदु राष्ट्र-जागृती सभा
हिंदूंंना समान वागणूक देणारे हिंदु राष्ट्र हवे ! – कु. प्रतीक्षा कोरगावकर, हिंदु जनजागृती समिती
नगर : अल्पसंख्यांकांच्या विरुद्ध काही झाल्यास त्यांना अल्पसंख्यांक आयोग असतो. त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक विकास मंत्रालय’ आहे; मात्र बहुसंख्यांक हिंदूंना राजकीय संरक्षण नसल्याने त्यांच्यासाठी ना बहुसंख्यांक आयोग आहे ना बहुसंख्यांक विकास मंत्रालय. यासाठी हिंदूंंना सामान वागणूक देणारे हिंदु राष्ट्र हवे, असे प्रतिपादन कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी केले. त्या हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विठ्ठल मंदिर, पंचवटी परिसर येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होत्या. या वेळी सनातन संस्थेचे श्री. रामेश्वर भुकन यांनीही मार्गदर्शन केले. सभेला ८० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. या सभेस ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज शिंदे यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.
जत (जिल्हा सांगली) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी १०० जिज्ञासूंची उपस्थिती
धर्मकार्यासाठी आठवड्यातून एकदा एकत्र येण्याचा युवकांचा निर्धार
बसवराज मंदिर येथे ८ मार्च या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी १०० जिज्ञासू उपस्थित होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई यांनी येथे संबोधित केले. सभेचे सूत्रसंचालन सौ. विनया चव्हाण यांनी केले. सभेनंतर काही युवकांनी सभेतील वक्त्यांशी एक घंटा चर्चा केली. या वेळी युवकांनी धर्मकार्यासाठी आठवड्यातून एकदा एकत्र येण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच ‘हलाल’ शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासमवेत समाजात जागृती करण्यासाठी पुढाकार घेऊ’, असे सांगितले.
राजापूर आणि पळाशी (नंदुरबार) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
नंदुरबार : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पळाशी येथे श्रीराम चौकात, तर राजापूर येथे श्री रामदेव बाबा मंदिर येथे ‘हिंदु-राष्ट्र जागृती सभा’ आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांत सनातनच्या सौ. निवेदिता जोशी, हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. सतीश बागुल यांनी मार्गदर्शन केले. सभेला शंखनादाने प्रारंभ झाला. या प्रसंगी ह.भ.प. रविंद्र पाठक महाराज यांची वंदनीय उपस्थिती होती. पळाशी येथे सरपंच प्रल्हाद पटेल, तर राजापूर येथे रामदेवबाबा मंदिराचे अध्यक्ष श्री. गोरखभाई पटेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सौ. निवेदिता जोशी यांनी ‘जीवनात साधनेचे महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. सतीश बागुल यांनी ‘पाश्चात्त्य संस्कृतीच्या आचरणाने होणारी हानी आणि हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण केल्याने होणारे लाभ’ याविषयी माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.
दारव्हा (यवतमाळ) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली
दारव्हा (यवतमाळ), ३ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील गोपालनगर येथील राधाकृष्ण मंदिराच्या सभागृहात १ मार्च या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मंगेश खांदेल यांनी मार्गदर्शन केले. समितीचे श्री. अनिकेत अर्धापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
नागेवाडी (जिल्हा सातारा) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली
सातारा : नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी सध्या देशात राजकारण चालू आहे. धर्मांध मुसलमान कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून जाळपोळ आणि दंगल करत आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापिठात भारतविरोधी घोषणाबाजी केली जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करून अल्पसंख्यांकांना सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत. शाहीन बाग येथे चालू असलेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. या धर्मांधांना चोख प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर हिंदु राष्ट्रच आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेंद्र निकम यांनी केले. १ मार्च या दिवशी नागेवाडी (जिल्हा सातारा) येथील श्री वीर गणेश मंदिर परिसरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. रूपा महाडिक उपस्थित होत्या. मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून सभेला प्रारंभ झाला. नागेवाडीसह पंचक्रोशीतील १०० हून अधिक धर्माभिमानी सभेला उपस्थित होते. या वेळी सौ. रूपा महाडिक यांनी आत्मबळ वाढवण्यासाठी साधनेची आवश्यकता विशद केली.