विषय कुठलाही असला, तरी हिंदुद्वेष्टे हिंदु धर्माचा अवमान करण्याची संधी साधतात, यावरून त्यांचा हिंदु धर्माप्रतीचा द्वेष दिसून येतो !
धर्माभिमानी हिंदूंनी राज्यात विविध पोलीस ठाण्यात केल्या होत्या तक्रारी
फोंडा : बाणावली येथे २९ फेब्रुवारीला सीएए कायद्याच्या विरोधात ‘पीपल्स फोरम फॉर जस्टीस, सेक्युलॅरिझम् आणि डेमॉक्रेसी’ या संघटनेने सभा घेऊन ‘ख्रिस्त्यांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन केले होते. या सभेत रामकृष्ण जल्मी या तथाकथित ‘सामाजिक’ कार्यकर्त्याने त्यांच्या भाषणात भगवान परशुराम यांच्याविषयी अवमानकारक आणि अत्यंत हीन वक्तव्ये केली. यावरून गोव्यातील धर्माभिमानी हिंदूंनी विविध पोलीस ठाण्यात तत्परतेने प्रविष्ट केलेल्या तक्रारींनंतर रामकृष्ण जल्मी यांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून हिंदूंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही धर्माभिमानी हिंदूंनी या विरोधात मोठे आंदोलन उभारण्याचे ठरवले होते. फोंडा, पणजी, कोलवा, वास्को, म्हापसा आदी विविध पोलीस ठाण्यांत धर्माभिमानी हिंदूंनी रामकृष्ण जल्मी यांच्या विरोधात तक्रार केली होती. जल्मी यांच्या विरोधात कलम २९५ ए आणि १५३ ए अंतर्गत कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले होते.
रामकृष्ण जल्मी यांनी भगवान परशुराम यांच्याविषयी अत्यंत अवमानकारक केलेली वक्तव्ये निवेदनात देण्यात आली आहेत. तक्रारीत म्हटले आहे की, आमची भगवान परशुराम यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. तो श्रीविष्णूचा ६ वा अवतार आहे. त्याने बाण मारून ही भूमी निर्माण केली यावर हिंदूंची ठाम श्रद्धा आहे; परंतु रामकृष्ण जल्मी यांनी त्यांची टिंगल उडवली. त्यांच्याविषयीची वक्तव्ये ऐकून आमच्या धर्मभावना दुखावल्या असून त्यांच्यावर कायद्यांनुसार कारवाई करावी, तसेच यापुढे कोणत्याही सभेत भाषण करण्यापासून त्यांना प्रतिबंध करावा.
निवेदन देणार्या संघटना आणि काही हिंदु धर्माभिमानी
१. म्हापसा येथे सर्वश्री तन्वेष केणी, श्रीदत्त केळकर, शुभम् पार्सेकर, रितेश मणेरकर, प्रदीप शेट्ये, प्रवीण आसोलकर, मंदार नाईक आणि अमेय यांनी तक्रार प्रविष्ट केली. त्याचप्रमाणे सर्वश्री संजय नाईक, जयेश थळी, भाई पंडित, अविनाश बेळेकर आणि सौ. शुभा सावंत यांनी स्वतंत्र तक्रार प्रविष्ट केली आहे.
२. फोंडा येथे सर्वश्री विनय तळेकर, विनायक बांदोडकर, रोहित नाईक, देविदास मसुरकर, महेश जोशी आणि सौ. मिनल हसबनीस यांचे शिष्टमंडळ पोलिसांना भेटून त्यांनी तक्रार प्रविष्ट केली.
३. वास्को येथे राष्ट्रीय हिंदू युवा वाहिनीच्या वतीने तक्रार प्रविष्ट करण्यात आली.
४. कोलवा पोलीस ठाण्यात गौरांग मळकर्णेकर यांनी रामकृष्ण जल्मी यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
५. पणजी येथे सर्वश्री अविनाश तिवारी, संजय कोरगावकर, दामोदर कवठणकर, काशीराम नागझरकर, केशव नाईक आणि दिलीप म्हावळणकर यांनी तक्रार प्रविष्ट केली.
रामकृष्ण जल्मी यांनी केलेली हीन आणि अश्लाघ्य वक्तव्ये !
१. भगवान परशुराम हा ग्रीसमधून आला होता. त्याने समुद्रकिनारी भाग उद्ध्वस्त केला आणि येथील शेतकरी समाजाचा १६ वेळा नाश केला. (भगवान परशुराम यांनी गुरुकुले उद्ध्वस्त करणार्या सहस्रार्जुन या क्षत्रिय राजाच्या विरोधात शस्त्र उगारले होते. त्याला आणि त्याच्यासारख्या अन्य उत्मत्त क्षत्रिय राजांना ठार करण्यासाठी २१ वेळा पृथ्वीप्रदक्षिणा करीन, असा पण त्यांनी केला होता. काही जण सर्व क्षत्रियांना मारले असाही अपप्रचार करतात, तेही खोटे आहे. हे सत्य सोडून वेगळाच इतिहास सांगून ख्रिस्त्यांच्या मनात जल्मी यांनी हिंदु धर्माविषयी विष पेरले आहे. समाजात फूट पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा धिक्कार करावा तेवढा अल्पच ! त्यांच्यावर कठोर कारवाईच व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. भगवान परशुराम याने त्याच्या आईला संशयावरून मारले आणि स्वतःच्या मुलीवर बलात्कार केले. (भगवान परशुराम यांनी त्याच्या आईला त्याला गुरुसमान असलेले वडील ऋषि जमदग्नि यांच्या सांगण्यावरून मारले होते. त्यामागील कार्यकारणभाव जल्मी यांच्यासारख्या धर्म न मानणार्यांना काय समजणार ? तसेच मुलीवर बलात्कार केल्याचा उल्लेख जल्मी यांना कुठून मिळाला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. भगवान परशुराम हा एका विशिष्ट जातीचा असल्याने त्याला देव मानण्यात येत असून प्रत्यक्षात तो बिन लादेन याच्यासारखा आतंकवादी होता. (भगवान परशुराम हे जन्माने ब्राह्मण होते, हे सांगायचेही धाडस जल्मी यांच्यात नाही. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे प्रतीक म्हणजे भगवान परशुराम आहेत. त्यांना बिन लादेन या आतंकवाद्याची उपमा देऊन जल्मी यांनी त्यांच्यातील हिंदुविरोधी वैचारिक आतंकवाद प्रकट केला आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात