हिंदु शब्दाच्या संदर्भात वैमनस्याचे वातावरण निर्माण होणे गंभीर ! – अधिवक्ता अरुण कुमार गुप्ता
प्रयागराज : ‘हिंदु’ शब्द राज्यघटनात्मक आहे; कारण घटनेच्या कलम २५ मध्ये त्याचा उल्लेख आहे. ‘हिंदु एक जीवनशैली आहे’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ‘हिंदु’ शब्दाच्या संदर्भात आज वैमनस्येचे वातावरण बनवले जाणे ही गंभीर गोष्ट आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येक भारतियाने ‘हिंदु’ शब्दाचा वापर गर्वाने करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता आणि न्यायमित्र अरुण कुमार गुप्ता यांनी येथे केले. येथील ‘हिंदुस्थानी अकादमी’मध्ये हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते.
१. या अधिवेशनाचे उद्घाटन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले. या वेळी ते म्हणाले, ‘‘भारतामध्ये धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यास देशातील सर्व समस्यांचे निराकरण होईल. धर्म व्यक्तीला नैतिकता आणि सदाचार शिकवतो. धर्मनिरपेक्षता व्यक्तीला अनैतिक आणि भ्रष्टाचारी बनवते. यामुळेच भारतामध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी राज्यघटनात्मक मार्गाने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.’’
२. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश संगोलकर, बुद्धेश्वर महादेव पीठाधीश्वर योगीराज कुमार महाराज, अधिवक्ता अभिषेक शुक्ला आदी मान्यवरांनी या अधिवेशनात त्यांचे विचार मांडले.
३. अधिवेशनाच्या शेवटी भारत आणि नेपाळ या देशांना राज्यघटनात्मक दृष्टीने हिंदु राष्ट्र बनवण्याचा ठराव, तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करणारा ठरावही संमत करण्यात आला.