Menu Close

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ येथे संपर्क दौरा

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नुकताच नेपाळ येथे संपर्क दौरा झाला. त्यांनी नेपाळ येथे २० ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांच्या भेटी घेतल्या. या कालावधीत हिंदुत्वनिष्ठांच्या ३ बैठकांचे आयोजनही करण्यात आले होते, तसेच त्यांनी २ ठिकाणी मार्गदर्शनही केले. त्याचप्रमाणे ३ वाहिन्यांनी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत घेऊन त्यांना राष्ट्र, धर्म, साधना, हिंदु जनजागृती समितीचे कार्य यांविषयी प्रश्‍नही विचारले. या दौर्‍यातील काही घडामोडींविषयी आपण याआधी प्रसिद्ध केलेल्या काही वृत्तांद्वारे माहिती घेतली. आज अन्य संपर्क दौर्‍यातील अन्य काही घडामोडी पाहूया.

स्वार्थ आणि आर्थिक लाभ यांसाठी हिंदू धर्मांतर करत आहेत ! – संतोष शहा, संस्थापक, इमर्जिंग लीडर्स अकॅडमी

श्री. संतोष शहा (डावीकडे) यांना ‘नवम अखिल भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे निमंत्रण देतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे

काठमांडू (नेपाळ) : १५ फेब्रुवारी या दिवशी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी ‘इमर्जिंग लीडर्स अकॅडमी’चे संस्थापक श्री. संतोष शहा यांची भेट घेतली. त्या वेळी श्री. शहा म्हणाले की, नेपाळमधील राजसंस्था नष्ट झाल्यापासून ख्रिस्त्यांकडून धर्मांतराचे प्रकार वाढत चालले आहेत. केवळ लोकच नाही, तर राजकारणीही धर्मांतरित झाले आहेत. श्रीलंकेत चर्चमध्ये स्फोट झाल्यावर जगातील सर्व ख्रिस्ती राष्ट्रे त्यांच्यासाठी धावून आली. या वेळी केवळ स्वार्थ आणि आर्थिक लाभ यांसाठी हिंदू धर्मांतरित होत आहेत. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी श्री. संतोष शहा यांना ‘नवम अखिल भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे निमंत्रण दिले.

‘विश्‍व हिंदु महासंघ नेपाळ’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

पोखरा (नेपाळ) : ‘विश्‍व हिंदु महासंघ नेपाळ, जिल्हा कास्की’चे कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्यासाठी १७ फेब्रुवारी या दिवशी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचे मार्गदर्शन झाले. या वेळी ते म्हणाले,

१. ‘‘केवळ मनुष्यच नव्हे, तर समस्त प्राणीमात्रांना शांती प्रदान करू शकतो, अशा धर्माला बाजूला सारून आज धर्मनिरपेक्ष व्यवस्था स्वीकारण्यात आली आहे. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची क्षमता केवळ धर्मातच आहे. सध्याची शिक्षणव्यवस्था केवळ ‘उदर भरण’ करण्यापुरते शिक्षण देते. ही व्यवस्था मुलांना स्पर्धा, ईर्ष्या, द्वेष, अपेक्षा, अहं यांकडे नेते. शिक्षित वर्गात सर्वाधिक घटस्फोट होण्याचे प्रमाण आहे.

२. राष्ट्रात सुख, शांती, आनंद निर्माण करण्यापूर्वी स्वत:मध्ये ते निर्माण केले पाहिजे. यासाठी स्वत: धर्माचरण करणे, साधना करणे आवश्यक आहे.

३. धर्माचरणाविषयी त्यांनी सांगितले की, हळद चुन्याच्या पाण्यात मिसळल्यावर कुंकू निर्माण होते. हळद भूमीत असते. त्यामुळे तिच्यात पृथ्वीतत्त्व अधिक आहे. मनुष्य देह पृथ्वीतत्त्वापासून बनले आहे. कुंकू लावल्याने आपल्यातील पृथ्वीतत्त्वाभोवती सूक्ष्म सुरक्षाकवच निर्माण होते. हिंदूंनी शास्त्र, संस्कार, धर्मपरंपरा यांचे संरक्षण केले पाहिजे. पाश्‍चिमात्य पद्धतीनुसार वाढदिवसाला ‘केक’वर नाव लिहून ते कापले जाते. नाव लिहून ते कापल्याने तंत्रविद्येनुसार गंभीर परिणाम होतात.’’

मार्गदर्शनाच्या प्रारंभी विश्‍व हिंदु महासंघ नेपाळचे श्री. शंकर खराल यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांची उपस्थितांना ओळख करून दिली. कास्की जिल्हा अध्यक्ष पर्वती पौडेल यांनी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांचे स्वागत केले. या मार्गदर्शनाला ब्राह्मण समाज नेपाळचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री. पृथ्वी पौडेल उपस्थित होते.

धर्माचे मूलभूत तत्त्व समजून घ्यायला हवे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळेे

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे (डावीकडे) यांच्याशी चर्चा करतांना पत्रकार परशुराम काफळे

काठमांडू (नेपाळ) : ‘नया पत्रिका’ या दैनिकाचे पत्रकार श्री. परशुराम काफळे यांनी स्वत:हून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. या भेटीमध्ये सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की, सनातन धर्माला समजण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे. या संदर्भात त्यांनी सनातनने प्रकाशित केलेले शिवाच्या चित्राचे उदाहरण दिले. ते म्हणाले, ‘‘शिवाच्या चित्रात पूर्वी नाग उजव्या खांद्यावर होता. कालांतराने पुन्हा चित्र प्रकाशित झाले, तेव्हा नाग शिवाच्या डाव्या खांद्यावर आणि तिसर्‍यांदा प्रकाशित झाले, तेव्हा नाग शिवाच्या डोक्यावर होता.’’

चित्रात होत गेलेल्या पालटांविषयीचे शास्त्र सांगतांना ते म्हणाले की, साधनेने प्रथम सूर्य नाडी शुद्ध होते. पुढे प्रगती झाल्यावर चंद्र नाडी शुद्ध होते. कुंडलिनी मूलाधार चक्रापासून जागृत झाल्यावर ती सहस्रारचक्रापर्यंत पोचते. जितकी चित्त शुद्धी होते, त्या स्तराची अनुभूती येते. त्रिकाल ज्ञानी झाल्यावर संतांना पूर्ण चक्र लक्षात येते.

सद्गुरु (डॉ.) पिंगळेे यांनी सनातन धर्माचे वैशिष्ट्य सांगितले की, मनुष्याचे एक वर्ष म्हणजे पितरांचा एक दिवस असतो. कारण उच्चलोकात गती न्यून होते. आता विज्ञानही हेच सांगते की, अंतरिक्षात जसे वर वर जातो, तशी गती न्यून होते. संप्रदायाची तत्त्वे सर्व ठिकाणी चालत नाहीत. धर्माचे मूलभूत तत्त्व समजून घ्यायला हवे. शुद्ध शास्त्रांचा समाजात प्रसार करण्याची आवश्यकता आहे. सनातन धर्मात दृष्टी देणारे ‘कुणीतरी’ आहे. तो ‘कुणीतरी’ म्हणजे ईश्‍वर. मूर्ती आपले रक्षण करत नाही, तर मूर्तीतील तत्त्वाची भक्ती केली की, ते तत्त्व आपले रक्षण करते.

धर्माचरणाअभावी हिंदु युवकांमध्ये धर्माविषयी न्यूनगंड आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

काठमांडू (नेपाळ) – विज्ञान बाह्य गोष्टींत अडकले आहे. आपल्या धर्म-परंपरेतील कृतींमागील शास्त्रांचा स्वत:ला आणि विश्‍वाला काय लाभ आहे, हे ज्ञात नसल्यामुळे हिंदु युवकांमध्येे धर्माविषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

‘मुश्टो कुलदेवता प्रतिष्ठान’चे श्री. विष्णु बहादुर क्षेत्री यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मोहन सिंह, वरिष्ठ पत्रकार डॉ. सुरेंद्र केसी, निवृत्त डी.एस्.पी. श्री. श्याम बहादुर खडका आणि प्रतिष्ठानचे अन्य सदस्य यांच्या समवेत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. सदगुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘गोवा येथील सनातन आश्रमात ‘वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्याने धर्म-परंपरेतील कृतींचा स्वत:वर आणि समाजावर सकारात्मक परिणाम होतो’, हे विविध प्रयोगांमधून सिद्ध झाले आहे. आपल्याला धर्माचे रक्षण करायचे असेल, तर सर्वप्रथम स्वत:च्या मनात धर्माची स्थापना केली पाहिजे. त्याग केल्याविना धर्म टिकत नाही. ‘माझा देश आणि माझा धर्म यांसाठी मला त्याग करायचा आहे’, ही भावना जागृत असली पाहिजे. सुशासनाच्या नावावर लोकप्रतिनिधी हे जनता आणि प्रशासन यांचे विविध प्रकारे विभाजन करतात. हेच विभाजन संघर्षाचे कारण बनते, हे जाणून आपण एकत्र आले पाहिजे.’’

नेपाळ येथील श्री कोटेश्‍वर महादेव मंदिरात हिंदुत्वनिष्ठांसमवेत झाली बैठक

श्री कोटेश्‍वर महादेव मंदिरातील बैठकीत हिंदुत्वनिष्ठांशी चर्चा करतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे (१), शेजारी श्री. गुरुराज प्रभु (२)

श्री. कृष्ण प्रसाद खनाल यांच्या पुढाकाराने श्री कोटेश्‍वर महादेव मंदिराचे अध्यक्ष श्री. बेंजु भट्टराई, तसेच त्यांचे सहकारी यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याशी ११ फेब्रुवारी या दिवशी भेट झाली.

या वेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरे देतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘जर ‘हिंदु’ शब्द मुसलमानांनी दिला आहे, तर १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी इस्लामची स्थापना होण्यापूर्वी हिंदुकुश पर्वत शृंखला (४ सहस्र वर्षांपूर्वीची) कशी निर्माण झाली ?, हा प्रश्‍न आहे. ऋग्वेदाच्या तिसर्‍या मंडलामधील नदीसूक्तात ‘सिंधु’ या शब्दाचा उल्लेख आहे. सिंधु शब्दापासूनच ‘हिंदु’ हा शब्द सिद्ध झाला आहे. जसे रूप एक आणि कर्मानुरूप नावे अनेक असतात, त्याप्रमाणे ‘सनातन धर्म’, ‘आर्य धर्म’, ‘वैदिक धर्म’ हीसुद्धा एका हिंदु धर्माचीच नावे आहेत.’’ या वेळी समितीचे श्री. गुरुराज प्रभु उपस्थित होते.

हिंदु धर्म, संस्कृती आणि परंपरा यांना जागतिक स्तरावर संरक्षण मिळायला हवे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

‘हिंदी हिमालीनी पत्रिके’चे श्री. सच्चिदानंद मिश्रा यांनी घेतली मुलाखत

नेपाळमधील ‘हिंदी हिमालीनी पत्रिके’चे श्री. सच्चिदानंद मिश्रा यांनीही सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. श्री. मिश्रा यांनी १६ फेब्रुवारीला झालेल्या भेटीच्या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची मुलाखत घेतली. या वेळी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरे देतांना सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘विश्‍वातील तिसरी मोठी लोकसंख्या वैश्‍विक स्तरावर अल्पसंख्य होत चालली आहे. हिंदूंसाठी जगात एकही ‘हिंदु राष्ट’्र नाही. वैश्‍विक पातळीवर समानता येण्यासाठी हिंदु धर्म, संस्कृती आणि परंपरा यांना जागतिक स्तरावर संरक्षण मिळायला हवे.’’

सद्गुरु (डॉ.) पिंगळे पुढे म्हणाले, ‘‘सध्या खोटा इतिहास लिहिला जात आहे. चांगले आणि वाईट यांचा संघर्ष चालूच रहाणार. वाईटावर विजय मिळवण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा पाहिजे. हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंतची भूमी, म्हणजेच भारत ही ऊर्जा विश्‍वात प्रसारित करणार आहे. गुरुमंत्र हा जळत्या कोळशाप्रमाणे असतो, तो सतत प्रज्वलित ठेवणे, हे आपले काम आहे, अन्यथा कालांतराने त्याच्यावर राख जमा होऊन तो विझतो. गुरु कुंडलिनीतील तेतत्त्व जानेपाळ गृत करतात. ते साधनेने जागृत ठेवणे, हे आपले कर्म आहे.’’

हिंदु जनजागृती समितीच्या नेपाळी भाषेतील ‘धर्म आणि अध्यात्म’ या विषयांवरील लेखांमुळे अध्यात्माचे महत्त्व लक्षात आले ! – ‘हम्रा कुरा’ या नेपाळी भाषेतील ‘ऑनलाईन पोर्टल’चे श्री. गोविंद अधिकारी

काठमांडू (नेपाळ) – ‘हम्रा कुरा’ या नेपाळी भाषेतील ‘ऑनलाईन पोर्टल’ चालवणारे श्री. गोविंद अधिकारी यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १३ फेब्रुवारीला भेट घेण्यात आली. समितीचे नेपाळी भाषेतील ‘धर्म आणि अध्यात्म’ यांविषयीच्या लेखांना ते प्रसिद्धी देतात. या लेखांना याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. अधिकारी यांनी सांगितले, तसेच ‘लेखांमुळे मलाही अध्यात्माचे महत्त्व लक्षात आले’, असेही नमूद केले.

सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी घेतली पाशुपत योगमार्गी महात्मा सुशीलजी यांची भेट

पाशुपत योगमार्गाने साधना करणारे महात्मा सुशीलजी यांची सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी भेट घेतली. त्या वेळी महात्मा सुशीलजी म्हणाले, ‘‘नेपाळ ही तपोभूमी आहे. हा ऋषींचा देश आहे. नेपाळचा केवळ भौतिक विकास न करता येथील धर्म, संस्कृती आणि परंपरा लक्षात घेऊन नेपाळचा ‘तपोभूमी’ म्हणून विकास होणे आवश्यक आहे.’’ या वेळी महात्मा सुशीलजी यांनी हिंदु जनजागृती समिती भारतभरात हिंदु राष्ट्रासाठी करत असलेल्या कार्याविषयी जाणून घेतले आणि या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *