कोल्हापूर येथे ‘सावरकर विचार दर्शन’ कार्यक्रमास राष्ट्रप्रेमींचा उदंड प्रतिसाद
कोल्हापूर : येणार्या ४० वर्षांत हिंदू जागृत झाले नाहीत, तर ते अल्पसंख्य होतील. तेव्हा त्यांच्यासमोर ‘धर्मांतर करणे किंवा देश सोडून जाणे’, हे दोनच पर्याय असतील. जगात अन्य राष्ट्रे ही ख्रिस्ती अथवा मुसलमानबहुल असल्याने हिंदूंना अन्य कुठेही स्थान नसेल; कारण हिंदुस्थान सोडून पृथ्वीवर एकही हिंदु राष्ट्र नाही. त्यामुळे तमाम हिंदूंनी एक होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक आणि हिंदुत्वनिष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळ’ यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पणदिनाचे औचित्य साधून २ मार्च या दिवशी राम गणेश गडकरी सभागृह, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, पेटाळा येथे श्री. शरद पोंक्षे यांचे ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, उपाध्यक्ष श्री. श्रीरंग कुलकर्णी आणि कार्यवाह श्रीमती शालन शेटे उपस्थित होत्या. ‘वन्दे मातरम्’ गीताने व्याख्यानाचा समारोप झाला.
शरद पोंक्षे यांचे ज्वलंत विचार
१. समाजाला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात अहिंसेचे डोस पाजण्यात आले. हे डोस पिता पिता आपण कधी ‘नपुंसक’ झालो, ते आपल्यालाही कळलेच नाही.
२. स्वातंत्र्यवीर सावरकर हे गोमातेविषयी विचार व्यक्त करतांना ‘गाय उपयुक्त पशू आहे’ इतकेच बोलले होते. त्यांचा गोपूजनाला विरोध होता; पण गोपालनाला नाही. उलट ‘गोपालन आवश्यक आहे’, असे ते म्हणत.
३. महापुरुषांच्या चरित्र वाचनाने आयुष्यात परिवर्तन होऊ शकते. सध्या मला पुणे, यवतमाळ, कोल्हापूर, तसेच अनेक ठिकाणांहून कार्यक्रमाला येण्यासाठी बोलावणे येत आहे. इतका विरोध होत असतांना लोक मला बोलावत आहेत, हीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांमधील ऊर्जा आणि सकारात्मकता आहे.
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेससह काही जण ‘माफीवीर’ संबोधतात. वास्तविक एकालाही या संदर्भातील सत्य जाणून घेण्याची इच्छा नाही. दुर्दैवाने आजची पिढी अभ्यास न करता सामाजिक माध्यमांवर आलेल्या गोष्टी नुसत्या इतरांना पुढे पाठवण्यात समाधान मानते.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर अनंत यातना आणि जन्मठेपेची शिक्षा भोगून त्यानंतर परत राष्ट्रासाठी कार्य करू शकले. यातून प्रेरणा घेऊन मी कर्करोगावर मात केली.
विशेष
१. पुणे येथे काही सावरकरद्वेष्ट्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. तसा कोणताही अनुचित प्रकार न होण्यासाठी कार्यक्रमासाठी श्री. अशोक रोकडे यांच्या ‘व्हाईट आर्मी’च्या सुरक्षारक्षकांनी सुरक्षा पुरवली होती. काही प्रमाणात सैनिकांशी साध्यर्म असणार्या ‘व्हाईट आर्मी’च्या ‘ड्रेसकोड’मुळे या तरुणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अगदी कार्यक्रम संपेपर्यंत ‘व्हाईट आर्मी’च्या युवक-युवती यांनी खडा पहारा दिला.
२. कार्यक्रमासाठी सभागृहातील जागा अपुरी पडल्याने बाहेर ‘एल्.ई.डी.’ प्रोजेक्टर लावण्यात आला होता. सभागृह भरल्याने पाय ठेवायलाही जागा नव्हती. अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक सभागृहात खाली बसले होते.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमासाठी लहान मुले, युवक, प्रौढ, वयस्कर अशा सर्व वयोगटांतील राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.
२. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य आणि विज्ञान मंडळ’ यांच्या वतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
खोटी वृत्ते देणार्या प्रसिद्धीमाध्यमांना खडसवा ! – शरद पोंक्षे
भाषण झाल्यावर श्री. पोंक्षे यांनी ‘जी जी प्रसिद्धीमाध्यमे माझे भाषण मोडून-तोडून लावतील, चुकीची वृत्ते देतील, केवळ काही वाक्येच दाखवतील, त्यांना राष्ट्रप्रेमी नागरिकांनी खडसावले पाहिजे. ‘तुम्ही प्रसिद्ध केलेले वृत्त चुकीचे होते’, असे सांगणार्या वाचकांची पत्रे संबंधित प्रसिद्धीमाध्यमांकडे गेली पाहिजेत. असे केले, तरच ‘आजच्या व्याख्यानाचे खरे चीज झाले’, असे म्हणता येईल’, असे आवाहन शेवटी केले.
पुणे येथील कार्यक्रमात शरद पोंक्षे यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भातील अस्पृश्यता निवारणासंबंधी एक विधान केले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती, तसेच काही प्रसिद्धीमाध्यमांमध्ये हे विधान अयोग्य रितीने प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याला सडेतोड उत्तर देतांना श्री. पोंक्षे यांनी हे विधान परत सांगून ‘पत्रकारांनी अर्धवट माहिती प्रसिद्ध करू नये, तसेच आव्हाड यांच्यासारख्यांनी अगोदर माहिती घेऊन मत व्यक्त करावे’, असे आवाहन केले.
इतरांचा विचार करणे म्हणजे राष्ट्रभक्ती होय ! – शरद पोंक्षे
राष्ट्रभक्तीसाठी मोठ्या गोष्टी करायला हव्यात, असे नाही. घर सोडून बाहेर पडल्यावर प्रत्येक गोष्टीत इतरांचा विचार करणे म्हणजे राष्ट्रभक्ती होय. दुचाकी आणि चारचाकी वाहन लावतांना (पार्क करतांना) इतरांनाही नंतर कसे लावता येईल ?’, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूही आपण देशाचा विचार करू शकतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात