शिवरायांच्या मावळ्यांचा अवमान थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश, मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच राज्यपाल यांच्या वैयक्तिक सेवेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्यांचा पोषाख मराठेशाहीतील मावळ्यांच्या पोषाखाप्रमाणे असतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या मराठेशाहीच्या स्वाभिमानावर हा एक प्रकारचा डाग आहे. त्यामुळे ‘शिपाई, तसेच पट्टेवाले यांच्यासाठी असलेला ‘मराठेशाही पगडी आणि पोषाख’ असा गणवेश तात्काळ पालटण्यात यावा’, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि भाजपचे आमदार श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यासाठी शासनाकडे मागणी करावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी २७ फेब्रुवारी या दिवशी विधीमंडळामध्ये भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, एखाद्याला प्रत्यक्ष युद्धात हरवण्यापूर्वी त्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरण केले जाते. इंग्रजांच्या राजवटीतही अशाच प्रकारे शूरवीर मराठ्यांना गुलामांप्रमाणे वागवून समाजमनावर त्यांची ‘गुलामगिरी’ भिनवण्याचा प्रयत्न केला गेला. स्वातंत्र्यानंतर ७३ वर्षे उलटूनही आपण या इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होऊ शकलेलो नाही. उलट ही खूण आपण भूषण म्हणून मिरवत आहोत. ‘५ पातशाह्यांना पाणी पाजणारे मराठी मावळे यांचा असा अवमान चालेल का ?’ या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे असेल, तर शासनाने उच्च न्यायालय, मंत्रालय, राजभवन, विधानभवन आदी ठिकाणचे शिपाई तथा पट्टेवाले यांसाठी असलेला मराठीशाहीचा अवमान करणार्या पोषाखात पालट करावा.
सार्वजनिक ठिकाणी होणारे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे विषय मांडू ! – राहुल पाटील, आमदार, शिवसेना
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी असलेल्या इमारतींमधील जिने, संरक्षक भिंत, कोपरे, तसेच अन्य ठिकाणी थुंकू नये आणि कचरा टाकू नये, यासाठी या सर्व ठिकाणी देवतांच्या, तसेच धार्मिक प्रतिकांच्या टाईल्स लावल्याने देवतांचे विडंबन होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे ‘या विषयात तातडीने लक्ष घालण्यात यावे’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे आमदार श्री. राहुल पाटील यांना देण्यात आले. हे निवेदन वाचून आमदार श्री. राहुल पाटील यांनी ‘तत्परतेने या विषयात लक्ष घालून येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रश्नाला वाचा फोडण्यात येईल’, असे आश्वासन दिले, तसेच त्यांनी त्यांच्या स्वीय साहाय्यकाला यासंबंधीचे पत्र सिद्ध करण्याचे निर्देशही दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते अरविंद पानसरे आणि श्री. सतीश सोनार उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीने दिलेले विषय काळजाला भिडणारे असून त्यात जातीने लक्ष घालू ! – भाजपचे आमदार महेश लांडगे
मुंबई : हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे आणि श्री. सतीश सोनार यांनी भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे यांची नुकतीच विधानभवनात भेट घेतली. ‘मंत्रालयात कर्मचार्यांना मावळ्यांचा वेश दिल्याने मराठ्यांची विटंबना होत असल्याविषयी आणि इमारतींच्या कोपर्यात देवतांच्या टाईल्स लावल्याने त्यांची विटंबना होऊ नये यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या कायद्यात योग्य ते पालट करण्याविषयीचे निवेदन या वेळी लांडगे यांना देण्यात आले. त्या वेळी लांडगे यांनी ‘‘हिंदु जनजागृती समितीने लक्षात आणून दिलेले प्रश्न काळजाला भिडणारे असून त्याविषयी जातीने लक्ष घालण्यात येईल’’, असे आश्वासन दिले.