गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडून बैठक बोलावण्याचे आश्वासन
मुंबई : कुणीही थुंकू नये आणि कचरा टाकू नये, यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींमधील जिने, संरक्षक भिंती, कोपरे, तसेच अन्य ठिकाणी देवता, तसेच धार्मिक प्रतीके यांच्या ‘टाईल्स’ (फरशा) लावण्यात येतात. त्यावर बंदी आणण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अधिनियमांत पालट करण्यात यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटून करण्यात आली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी सहकारमंत्री पाटील यांना निवेदन देऊन त्यावर कार्यवाही करण्याची विनंती केली. त्या वेळी मंत्री पाटील म्हणाले, ‘‘तुम्ही चांगले कार्य करत आहात. या संदर्भात लक्ष घालून कार्यवाही करीन.’’
याच विषयासाठी गृहराज्यमंत्री (शहरे) शंभुराज देसाई यांचीही भेट घेण्यात आली. ‘गृहनिर्माण संस्थांसह बाहेर सार्वजनिक ठिकाणी लघवी करू नये, तसेच कचरा टाकू नये, यासाठी जागोजागी देवता किंवा धार्मिक प्रतीके यांच्या ‘टाईल्स’ लावण्यात येतात. त्यामुळे देवतांची विटंबना होऊन धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. तरी यासंदर्भात गृह विभाग आणि सहकार विभाग यांच्या अधिकार्यांसमवेत एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात यावे’, अशी मागणी शिवसेनेचे महाड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी केली. त्यावर राज्यमंत्री देसाई यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर बैठक बोलवण्याचे निर्देश खासगी सचिवांना दिले.
अशाच प्रकारची मागणी सहकारमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे आमदार श्री. गोगावले यांनी केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय संभूस आणि श्री. सतीश सोनार उपस्थित होते.
शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन
मुंबई : हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट अन् समितीचे कार्यकर्ते श्री. सतीश सोनार यांनी संभाजीनगर येथील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार श्री. प्रदीप जयस्वाल यांची विधान भवनातील पक्ष कार्यालयात भेट घेतली.
अनेक ठिकाणी इमारतीमधील जिने, संरक्षक भिंत, कोपरे, तसेच अन्य ठिकाणी थुंकू नये आणि कचरा टाकू नये, यांसाठी त्या ठिकाणी देवता, तसेच धार्मिक प्रतीकांच्या टाईल्स लावण्यात येतात. त्यावर बंदी घालण्यात यावी, याविषयीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. याशिवाय गृहनिर्माण कायद्यात त्याविषयी योग्य ती तरतूद करण्यात यावी, यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीही त्यांना करण्यात आली.
या वेळी श्री. सुनील घनवट यांनी ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून चालू असलेल्या षड्यंत्राची सविस्तर माहिती आमदार श्री. जयस्वाल यांना दिली. यावर श्री. जयस्वाल म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर संभाजीनगर येथे व्यापारी संघटना आणि व्यापारी यांची बैठक आयोजित करून याविषयी जागृती करण्यासाठी प्रयत्न करीन.’’
सार्वजनिक ठिकाणी होणारे देवतांचे विडंबन रोखण्यासाठी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे विषय मांडू ! – राहुल पाटील, आमदार, शिवसेना
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी असलेल्या इमारतींमधील जिने, संरक्षक भिंत, कोपरे, तसेच अन्य ठिकाणी थुंकू नये आणि कचरा टाकू नये, यासाठी या सर्व ठिकाणी देवतांच्या, तसेच धार्मिक प्रतिकांच्या टाईल्स लावल्याने देवतांचे विडंबन होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे ‘या विषयात तातडीने लक्ष घालण्यात यावे’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे आमदार श्री. राहुल पाटील यांना देण्यात आले. हे निवेदन वाचून आमदार श्री. राहुल पाटील यांनी ‘तत्परतेने या विषयात लक्ष घालून येत्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे या प्रश्नाला वाचा फोडण्यात येईल’, असे आश्वासन दिले, तसेच त्यांनी त्यांच्या स्वीय साहाय्यकाला यासंबंधीचे पत्र सिद्ध करण्याचे निर्देशही दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते अरविंद पानसरे आणि श्री. सतीश सोनार उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीने दिलेले विषय काळजाला भिडणारे असून त्यात जातीने लक्ष घालू ! – भाजपचे आमदार महेश लांडगे
मुंबई : हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे आणि श्री. सतीश सोनार यांनी भाजपचे आमदार श्री. महेश लांडगे यांची नुकतीच विधानभवनात भेट घेतली. ‘मंत्रालयात कर्मचार्यांना मावळ्यांचा वेश दिल्याने मराठ्यांची विटंबना होत असल्याविषयी आणि इमारतींच्या कोपर्यात देवतांच्या टाईल्स लावल्याने त्यांची विटंबना होऊ नये यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या कायद्यात योग्य ते पालट करण्याविषयीचे निवेदन या वेळी लांडगे यांना देण्यात आले. त्या वेळी लांडगे यांनी ‘‘हिंदु जनजागृती समितीने लक्षात आणून दिलेले प्रश्न काळजाला भिडणारे असून त्याविषयी जातीने लक्ष घालण्यात येईल’’, असे आश्वासन दिले.