सोलापूर येथील धर्मप्रेमींची मागणी
सोलापूर : ‘सीएए’च्या विरोधात विविध ठिकाणी व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा अपलाभ घेत आंदोलने केली जात आहेत. नुकतेच देहली येथील आंदोलनात हिंसाचार करण्यात आला. या हिंसाचारात पोलीस कर्मचारी अंकित शर्मा आणि अन्य निरपराध हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. त्यामुळे या हत्या करणार्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी हिंदु जनजागृती समिती आणि विविध धर्मप्रेमी यांनी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना देण्यात आले.
या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री आप्पा शहापुरे, अंबादास कडगुड्डा, मल्लेश पुजारी, योगेश भाईकट्टी, मल्लिकार्जुन सालीमठ, शिवकुमार गोरकल, महेश गोरकल, सिद्धाराम पुजारी, आदित्य काटवे, विशाल चव्हाण, श्रीशैल अक्कलकोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके आदी उपस्थित होते.
निवेदनातील मागण्या
१. राज्यघटना पायदळी तुडवून राष्ट्रहितैषी कायद्याच्या विरोधात बळजोरीने आंदोलन करणार्यांवर देशद्रोहाचा खटला चालवून कठोर कारवाई करावी.
२. शाहीन बाग आंदोलनाला साहाय्य करणार्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या देशद्रोही संघटनेवर बंदी आणावी.
३. अशी आंदोलने देशात विविध भागांत चालू आहेत. तेथे जमाव बंदीचे कलम लावून ही आंदोलने तातडीने मोडून काढावीत.
४. आक्रमण करणार्यांच्या विरोधात कठोर कायदे करण्यात यावेत, तसेच तो देशद्रोहाचा गुन्हा ठरावा.
५. सोलापूर शहरामध्येही अशी आंदोलने होत आहेत आणि नियोजित आहेत, असे दिसून येते. त्यावर तातडीने निर्बंध घालून त्याचा बिमोड करावा.
गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा आणि मुख्य हवालदार रतनलाल यांच्या मारेकर्यांवर कारवाई करा !
‘हमारा देश’ संघटनेचे बेळगाव येथील पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन
बेळगाव : देहली येथील हिंसाचारात गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी अंकित शर्मा आणि मुख्य हवालदार रतनलाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी मारेकर्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी २ मार्च या दिवशी ‘हमारा देश’ संघटनेच्या वतीने पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि उपायुक्त यांना देण्यात आले. या वेळी श्री. व्यंकटेश शिंदे, मल्लिकार्जुन कोकणी यांसह हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर उपस्थित होते. ‘सार्वजनिक आणि बाजारपेठेतील मालमत्तेची हानी करणार्या दंगलखोरांना त्वरित गजाआड करून त्यांना कठोर शिक्षा करावी’, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.