हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु समिती यांच्या वतीने लोणावळा (जिल्हा पुणे) येथे जागृतीपर व्याख्यान
पुणे : सध्या ‘हलाल’रूपी समांतर अर्थव्यवस्था उभी राहिली आहे. धर्मांधांनी षड्यंत्र करून ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून एकप्रकारे आर्थिक जिहाद पुकारला आहे. याविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च या दिवशी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी व्याख्यानामधून ‘हलाल अर्थव्यवस्थे’ची भयावहता विशद केली. या वेळी उपस्थित व्यापार्यांनी ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा, तसेच याविषयी सर्वत्र जागृती करण्याचा निर्धार केला.
‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून त्यामध्ये सौंदर्यप्रसाधने, धान्य, फळे, औषधे अशा अनेक उत्पादनांचा समावेश आहे. व्यावसायिकांना प्रत्येक उत्पादनासाठी जवळपास २१ सहस्र ५०० रुपये भरून ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या खासगी मुसलमान संघटनेकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागते. अन्न आणि औषध प्रशासन हा सरकारचा स्वतंत्र विभाग असतांनाही अशासकीय धर्मांध संघटना या साखळीत कशा ?, याचा संघटितपणे प्रतिकार करायला हवा, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी केले.
या प्रसंगी हिंदू समितीचे प्रमुख श्री. सुनील गायकवाड, लोणावळा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. दिलीप गुप्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोणावळा प्रमुख श्री. भरत चिकणे, मुख्याध्यापक श्री. आनंद गावडे, सर्वश्री जयेश संचेती, ललित सिसोदिया, मृगेंद्र भिडे, हॉटेल चंद्रलोकचे श्री. अनिष गणात्रा यांच्यासह १६० हून अधिक व्यापारी उपस्थित होते.
हिंदुहितासाठी कार्यरत असलेली हिंदु समिती
लोणावळा येथे हिंदुत्वनिष्ठांनी हिंदुहितासाठी हिंदू समिती स्थापन केली आहे. जातपात, संप्रदाय आदी भेद विसरून हिंदूंचे एक ‘हिंदु’ म्हणून संघटन व्हावे, या उद्देशाने हिंदु समिती कार्यरत आहे. समितीच्या वतीने काही मासापूर्वी ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’च्या समर्थनार्थ मोठी फेरी काढण्यात आली होती. ‘हलाल सर्टिफिकेट’च्या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा जेव्हा हिंदू समितीचे श्री. सुनील गायकवाड आणि श्री. जयेश संचेती यांच्याशी या विषयावर संपर्क झाला, त्या वेळी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्याच दिवशी एका घंट्यात काही संपर्क करून २० व्यापार्यांची बैठक ठरवली. त्यात १ मार्चला सर्व व्यापार्यांसाठी जागृतीपर व्याख्यान घेण्याचे ठरवण्यात आले. हिंदुत्वनिष्ठांनी बैठकीचा प्रसारही चालू केला. सामाजिक प्रसारमाध्यमांमधूनही बैठकीची जागृती करण्यात आली. १ मार्च या दिवशीच्या कार्यक्रमानंतर सर्वांनी हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचे ठरवले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. व्याख्यानानंतर उपस्थित व्यापार्यांनी उत्स्फूर्तपणे हिंदूंसाठी आचारसंहिता बनवून त्याचे पालन करण्याचे ठरवले. या अंतर्गत कपाळावर टिळा अथवा कुंकू लावणे, भ्रमणभाषवर बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘नमस्कार’ म्हणणे, प्रतिदिन देवळात जाणे, धर्मकार्यासाठी प्रतिदिन किमान १ घंटा वेळ देणे, हिंदु व्यावसायिकांकडून वस्तू खरेदी करणे अशी पंचसूत्री ठरवण्यात आली. प्रत्येक १५ दिवसांनी एकत्र येऊन संघटन वाढवण्याचे ठरवण्यात आले.
२. महाबळेश्वर येथील चॉकलेट उत्पादनावर हलाल चिन्ह असल्याचे लक्षात आल्यावर लोणावळा येथील व्यावसायिक श्री. दिलीप गुप्ता यांनी या चॉकलेट विक्रेत्याकडून माल घेण्यास नकार दिला.
३. श्री. अमित घोणे यांनी त्यांच्या संपर्कातील खाटिक व्यावसायिकांसाठी ५ मार्च या दिवशी पुन्हा एका बैठकीचे आयोजन केले.