ज्योतिषशास्त्र विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून संशोधन ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
नवी देहली : भावी पिढीला ज्योतिषशास्त्र विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकडून अविरतपणे संशोधन चालू आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथे केले. २३ फेब्रुवारी या दिवशी येथील ‘ऑल इंडिया नवयुग अॅस्ट्रोलोजर्स असोसिएशन’च्या वतीने ज्योतिषांसाठी परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे बोलत होते. देश-विदेशांतील २०० हून अधिक ज्योतिषी या परिषदेला उपस्थित होते. या परिषदेसाठी हिंदु जनजागृती समितीला आमंत्रित करण्यात आले होते.
सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मांडलेली सूत्रे
१. ‘ज्योतिषांनी सांगितलेला उपाय आणि त्याचा परिणाम कसा होतो ?’, ‘काहींनी साधना केली; पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास नाही केला, तरीही त्यांच्यात त्रिकाल समजण्याची क्षमता असते; त्यांच्यामध्ये ही क्षमता कशी येते ?’, ‘एखाद्या व्यक्तीच्या जीवनात सदेह गुरु येतात, तेव्हा गुरूंच्या कृपेने त्याच्या जीवनातील समस्यांचे निवारण होते का ?’ आदी गोष्टींचे अध्ययन चालू आहे.
२. यामागील प्रमुख कारण म्हणजे महाराष्ट्रात १० वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा येणार होता. त्यातील एका कलमात ‘ज्योतिष हे विज्ञान नाही आणि ज्योतिषाची भविष्यवाणी जर चुकीची ठरली, तर त्याच्यावर ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत दंड करून कारवाई केली जावी’, अशा आशयाची तरतूद असल्याचे सांगितले गेले.
३. हिंदु जनजागृती समितीने या कायद्याच्या विरोधात वैचारिक लढा दिला. त्याचा परिणाम असा झाला की, ज्योतिषांच्या विरोधातील हे कलम काढूनच हा कायदा संमत झाला. यामुळे हिंदु धर्माचे अविभाज्य अंग असलेले ज्योतिषशास्त्र सुरक्षित ठेवण्यात यश आले.
क्षणचित्र : या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.