लाजपतनगर (देहली) येथे हिंदु जनजागृती समितीकडून व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन
देहली : येथील ‘लाजपतनगर – २’ या भागात हिंदु जनजागृती समितीकडून व्यावसायिकांसाठी एका बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या बैठकीत समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘लोकतंत्र आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर उपस्थितांचे प्रबोधन केले. या वेळी ‘अपवर्ड फाऊंडेशन’चे श्री. अजय शर्मा यांनी हलाल सर्टिफिकेशन आणि त्यामुळे निर्माण होणारी समांतर अर्थव्यवस्था याविषयी माहिती दिली. तसेच त्यावर कोणती उपाययोजना करू शकतो, याविषयी व्यावसायिकांचे प्रबोधन केले.
लाजपतनगर क्षेत्रातील ‘सेंट्रल मार्केट शॉपकीपर्स असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. योगेंद्र डावर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत उपस्थित असलेल्यांपैकी श्री. परवीन चौहान यांनी ‘हलालविषयी आम्ही समाजात जागृती करू’, असे सांगितले. या वेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार केला.
या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, संस्थेच्या देहली राज्य प्रवक्त्या कु. कृतिका खत्री, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे हेसुद्धा उपस्थित होते.
फरिदाबाद येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘लोकतंत्र आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
फरिदाबाद (हरियाणा) : येथील सेक्टर १५ मध्ये असलेल्या ‘कम्युनिटी सेंटर’मध्ये हिंदु जनजागृती समितीकडून ‘लोकतंत्र आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर एका व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. श्री. रमेश शिंदे यांनी या व्याख्यानाद्वारे उपस्थित सर्वांचे प्रबोधन केले. या प्रसंगी ‘हलाल सर्टिफिकेशन’संदर्भात बोलतांना श्री. शिंदे म्हणाले, ‘‘उत्पादनाला हलाल प्रमाणित करतांना केवळ त्या उत्पादनाचा संबंध येतो,
उदा. हलाल मांसाचे प्रमाणपत्र घेतांना ते मांस हलालच्या नियमांनुसार असायला हवे; मात्र एखाद्या मांसाहारी उपाहारगृहाला हलाल प्रमाणपत्र हवे असल्यास त्या उपाहारगृहात अल्कोहोल, स्पिरीट यांचे मिश्रण असलेल्या कोणत्याही घटकाचा वापर किंवा विक्री करता येणार नाही. तेथील मांस तर हलाल हवेच, त्यासह तेल, मसाल्याचे पदार्थ, खाद्य रंग, तांदूळ, धान्य सर्वकाही हलाल प्रमाणित असले पाहिजे.’’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यासाठी फरिदाबाद येथील सर्वश्री प्रवीण गुप्ता, बंसल आणि आझाद सिंह नरवत यांनी विशेष साहाय्य केले. कार्यक्रमासाठी ९० धर्माभिमानी उपस्थित होते. सर्व हिंदु धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. भविष्यात अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याचेही निश्चित करण्यात आले.