हे आहेत फटाक्यांचे दुष्परिणाम ! लाखो रुपयांचा चुराडा करण्यासह मनुष्यहानी करणार्या फटाक्यांवर शासनाने आतातरी देशपातळीवर बंदी आणावी !
- ३०० भाविक घायाळ
- पंतप्रधानांची घटनास्थळी भेट
- नौदल आणि वायूदल यांचे साहाय्य
कोल्लम (केरळ) – येथून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या परावूर येथील प्रसिद्ध पुत्तिंगल मंदिरात रात्री साडेतीन वाजता लागलेल्या भीषण आगीत १०२ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३०० भाविक घायाळ झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गोदामात ठेवलेल्या फटाक्यांचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मंदिर प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटना घडली तेव्हा मंदिरामध्ये १ सहस्राहून अधिक भाविक उपस्थित होते. वेळीच साहाय्य पोहोचले नसते, तर या सर्वांच्याच जीवाला धोका पोहोचला असता, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आगीत अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी नौदल आणि वायूदल यांच्या सैनिकांनी साहाय्य केले. राज्याचे मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी घटनास्थळी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेविषयी तीव्र दु:ख व्यक्त केले असून त्यांनी स्वतः तज्ञ डॉक्टरांचे पथक घेऊन घटनास्थळी भेट दिली. केंद्रशासनाकडून मृतांच्या वारसांना २ लाख, तर गंभीररित्या घायाळ झालेल्या भाविकांना ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित करण्यात आले आहे.
१. पुत्तिंगल देवीच्या मंदिरात सध्या चैत्र नवरात्रोत्सव चालू आहे. त्यामुळे येथे ९ एप्रिलच्या रात्री ११.४५ वाजल्यापासून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
२. रात्री ३.३० वाजण्याच्या सुमारास फटाक्याची ठिणगी पडून मंडपाला लागून असलेल्या मंदिरातील फटाक्यांच्या गोदामाला आग लागली. त्यामुळे स्फोट होऊन अधिकच भडका उडाला. आगीत देवास्वम मंडळाची इमारत पूर्णपणे भस्मसात झाली आहे.
३. मंदिर प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडून मंदिरात फटाक्यांचा साठा करण्याची रीतसर अनुमती घेतली नव्हती.
४. मंदिराच्या ज्या भागात आग लागली त्या भागात काही पेंट कंटेनर (रंगाचे डबे) सुद्धा ठेवले होते. त्यात रसायने असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
५. या घटनेच्या वेळी मंदिराच्या परिसरात जवळपास ६ सहस्र लोक होते. मंदिराचा परिसर फार मोठा आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भाविक फटाक्यांची आतषबाजी करत होते. यातील एकच भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
६. १४ एप्रिल या दिवशी मल्याळम नववर्ष चालू होत असून त्याआधी होणार्या नवरात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्याची पुत्तिंगल मंदिराची परंपरा आहे. या वर्षी पोलिसांनी फटाके फोडण्यास अनुमती नाकारली होती. तरीही फटाके फोडले गेले.
७. आगीत भाजलेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी वायूदलाच्या ८ हेलिकॉप्टरसह एम्आय-१७ हे विशेष हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आले.
८. या संपूर्ण प्रकरणाची न्यायाधिशांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ओमान चंडी यांनी दिली.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात