वाराणसी (उत्तरप्रदेश) : हिंदु राष्ट्राची मागणी घटनात्मक आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ यांविषयी झालेली सुधारणा एक षड्यंत्र रचून घटनाविरोधी पद्धतीने केली आहे. आज अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेमध्ये त्यांचे कौशल्य आणि ज्ञान यांद्वारे घटनात्मक लढा देऊन राष्ट्र, धर्म आणि समाज यांच्या हितासाठी कार्य करणे आवश्यक आहे, असे उद्गार हिंदु विधीज्ञ परिषदेचे महाराष्ट्र संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी अधिवक्ता कार्यशाळेला संबोधित करतांना काढले. वाराणसी येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या वतीने येथे अधिवक्ता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ते उपस्थित अधिवक्त्यांना ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी न्यायालयीन लढा देण्याची आवश्यकता का निर्माण झाली ?’, याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. राजन केसरी यांनी केले.
अधिवक्ता सांगोलकर यांनी पुढे म्हटले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात अधिवक्त्यांनी पुष्कळ मोठे योगदान दिले होते. त्या वेळी त्यांनी केलेला त्याग आपल्याला ठाऊक आहे. आजही अधिवक्त्यांनी त्याच प्रकारचा त्याग आणि कार्य करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
पू. नीलेश सिंगबाळ उपस्थित अधिवक्त्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राष्ट्र निर्मितीचे कार्य एक धर्मयुद्धासारखे आहे. यासाठी आपण साधना करणे आवश्यक आहे. न्यायालयीन लढा देतांना तणावाला सामोरे जावे लागते. तणावविरहित आणि आनंदी जीवन जगण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.