Menu Close

कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह बैठक घेतली जाईल : पर्यावरण राज्यमंत्री

हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनावर सरकारचे आश्‍वासन

पर्यावरण राज्यमंत्री श्री. संजय बनसोडे (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे आणि शेजारी श्री. सतीश सोनार

मुंबई : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार कागदी लगद्याद्वारे बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देणे थांबवून त्याविषयी जनजागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना एका निवेदनाद्वारे ११ मार्च या दिवशी करण्यात आली. या वेळी मंत्री बनसोडे यांनी ‘याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवासमवेत बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल’, असे सांगून अशी बैठक घेण्याविषयी त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना निर्देश दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे, कार्यकर्ते श्री. अजय संभूस आणि श्री. सतीश सोनार उपस्थित होते.

राष्ट्रीय हरित लवादाचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्ती कागदी लगद्यापासून सिद्ध कराव्यात, कागदाच्या लगद्यापासून सिद्ध केलेल्या मूर्तीपासून प्रदूषण होत नाही’, असा अपप्रचार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चालू केला होता. या अंधश्रद्धेला तत्कालीन सरकार बळी पडले आणि ३ मे २०११ या दिवशी पर्यावरण विभागाच्या माध्यमातून ‘सण पर्यावरणपूरक साजरे करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना’, या नावाने शासन निर्णय घेतला. या निर्णयात ठिकठिकाणी ‘कागदी लगद्यापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन मिळावे, अशा प्रकारच्या मूर्ती सर्वत्र उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पुढाकार घ्यावा अथवा त्यांना विशेष सवलत द्यावी’, असे नमूद केले होते; मात्र हा निर्णय चुकीचा आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी राष्ट्रीय हरित लवाद, पुणे (National Green Tribunal) यांनी एका जनहित याचिकेवर निर्णय देतांना दिला आहे.

हिंदु जनजागृती समितीची विनंती मान्य

या निर्णयाच्या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेल्या ४ वर्षांपासून पर्यावरणमंत्री, राज्यमंत्री, आमदार यांना निवेदन देऊन ‘कागदी लगद्यापासून सिद्ध केलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रतिबंध घालावा’, अशी मागणी वारंवार करण्यात आली. प्रत्यक्षात सरकारकडून याविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या विषयाच्या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांसमवेत प्रत्यक्ष बैठकच घ्यावी, अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात आली. या वेळी मंत्री संजय बनसोडे यांनी ही विनंती मान्य करून वरील आश्‍वासन दिले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *