पाकिस्तानी संघटनेच्या अध्यक्षाची माहिती
- काश्मीरमधील ही वस्तूस्थिती पाकचेच नेते विदेशात जाऊन सांगत आहेत आणि दुसरीकडे पाक सातत्याने ते नाकारत आहे. यावरून पाकचा खोटारडेपणा उघड होतो !
- आतातरी जागतिक समूदायाने पाकला काळ्या सूचीमध्ये टाकण्यासह त्याला ‘आतंकवादी देश’ घोषित केले पाहिजे !
जिनेव्हा (स्वित्झर्लंड) : पाकिस्तानमधील इम्रान खान यांचे सरकार पाकव्याप्त काश्मीरचा आतंकवाद पसरवण्यासाठी वापर करत आहे. सरकारने येथे आतंकवाद्यांसाठी प्रशिक्षण केंद्रे आणि ‘लाँचिंग पॅड’ (आतंकवाद्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना येथे आणून भारतात घुसवले जाते.) बनवली आहेत. पाक सरकार त्यांना अर्थपुरवठा करत आहे, अशी माहिती पाकमधील ‘युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टी’चे (यु.के.पी.एन्.पी.चे) नेते सरदार शौकत अली काश्मिरी यांनी जिनेव्हा येथे दिली. ते येथे ‘आतंकवाद आणि मानवाधिकारांचे उल्लंघन यांवर उपाय काढण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील आव्हाने’ या विषयांवरील परिषदेनंतर पत्रकारांशी बोलत होते. या परिषदेत अनेक मुत्सद्दी, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काश्मीरचे नेते सहभागी झाले होते. त्यांनी काश्मीरच्या दोन्ही भागांमधील (म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि भारताचे काश्मीर) आतंकवाद, कट्टरतावाद आणि मानवाधिकारांचे उल्लंघन रोखण्याचा प्रस्ताव संमत केला.
१. शौकत अली पुढे म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांसारख्या आतंकवादी संघटनांंची प्रशिक्षण केंद्रे आहेत. येथून काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करण्यासाठी काश्मिरींना भडकावण्यात येते. काश्मीरच्या दोन्ही भागांमध्ये लोक मरत आहेत. याला पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालणारी आतंकवादी प्रशिक्षण केंद्रे कारणीभूत आहेत. येथून आतंकवादी आणि पाकचे सैन्य गोळीबार करतात आणि त्याला भारतीय सैन्य प्रत्युत्तर देते. यामुळे दोन्ही बाजूंचे लोक मरतात. आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करणे आणि त्यांचे समर्थन करणे पाकने बंद केले पाहिजे.
२. शौकत अली पुढे म्हणाले की, आतंकवाद आमच्या भागातील मोठे आव्हान आहे. ते पेलण्यासाठी आम्ही सर्वांना संघटित आणि सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात