Menu Close

शिवजयंतीच्या औचित्यावर खेडी खुर्द (जळगाव) येथे धर्मप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने लावला ‘हिंदु राष्ट्र’चा फलक !

हिंदु राष्ट्राविषयी तळमळ असणार्‍या खेडी खुर्द गावातील सर्व धर्मप्रेमी बांधवांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या धर्मप्रेमींनी यातून बोध घ्यावा !

‘हिंदु राष्ट्र’च्या फलकाच्या अनावरणाच्या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, धर्मप्रेमी आणि हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक १. श्री. सुमित सागवेकर

जळगाव : खेडी खुर्द येथील हिंदु जनजागृती समितीच्या धर्मशिक्षणवर्गात येणारे धर्मप्रेमी आणि गावातील हिंदुत्वनिष्ठ यांनी स्वयंस्फूर्तीने तिथीनुसार शिवजयंतीचे औचित्य साधून ‘हिंदु राष्ट्र खेडी खु.’ असा फलक सिद्ध केला. या फलकाचे अनावरण गावातील मान्यवर श्री. सतीश आनंदा सोनवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या वेळी गावातील धर्मप्रेमी ग्रामस्थ, तसेच हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर उपस्थित होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेच्या इतिहासात हिंदु राष्ट्राचा फलक लावणारे भारतातील पहिले गाव म्हणून ‘खेडी खुर्द’ हे निश्‍चितच ओळखले जाईल’, अशी भावना धर्मप्रेमींनी व्यक्त केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने या गावात मागील वर्षी हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली होती. तसेच गावातील धर्मप्रेमींसाठी धर्मशिक्षणवर्गही चालू करण्यात आले होते. समितीच्या वतीने प्रतिवर्षी जळगाव शहर येथे घेण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला या गावातील धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित रहातात. त्यातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी स्वयंस्फूर्तीने गावामध्ये अशा प्रकारचा फलक लावण्याचे नियोजन केले आणि त्यासाठी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीचे औचित्य साधले. या कार्यक्रमाला गावातील हिंदु धर्मप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील प्रत्येकाने ‘नामधारी’ होण्याचा प्रयत्न केल्यास खेडी खु. खर्‍या अर्थाने लवकरच ‘हिंदु राष्ट्र’ होईल ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राचा फलक गावात लागला आहे. त्यामुळे आपले दायित्व आता वाढले आहे. यापुढे आपण आपले गाव आदर्श कसे होईल ? या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. गाव आदर्श होण्यासाठी सर्वांत पहिले काम म्हणजे आपले गाव व्यसनमुक्त झाले पाहिजे. गाव व्यसनमुक्त होण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रत्येक युवकाने आणि प्रत्येक नागरिकाने गावामध्ये धर्माचरण करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. आपण प्रत्येकाने ‘नामधारी’ झाले पाहिजे. नामधारी म्हणजे ‘कपाळावर नाम धारण करणारा आणि मुखात नाम असणारा !’ असा नामधारी गावातील प्रत्येक नागरिक झाला पाहिजे. गाव हिंदु राष्ट्र आहे, तर आपण प्रत्येकानेच जात-पात, पक्ष, संघटना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून प्राधान्याने हिंदु धर्मासाठी एकत्र आले पाहिजे आणि गावांमध्ये हिंदु धर्म जपला जाईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गावामध्ये तंटे-तणाव यांसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये; म्हणून प्रत्येक वेळी गावकर्‍यांनी धर्मकर्तव्याला प्राधान्य दिले पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता, कोणत्याही जातीविषयक प्रसंगाला बळी न पडता प्रत्येकाने देव, धर्म आणि देश यांच्या हिताचा विचार करायला पाहिजे. या अनुषंगाने सर्वांनी विचार करणे अत्यावश्यक आहे; म्हणून प्रत्येक हिंदु युवकाने चारित्र्यसंपन्न होणे आवश्यक आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याच्या निमित्ताने आपण ‘हिंदु राष्ट्र खेडी खु.’ या फलकाचे अनावरण करत आहोत, त्यांचा आदर्श आपण सर्वांनी ठेवला पाहिजे. संपूर्ण भारतामध्ये ज्या हिंदु राष्ट्राची निर्मिती होणार आहे, त्या हिंदु राष्ट्राच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांमध्ये लिहिला जाईल, असा क्षण आपण सर्व जण अनुभवत आहोत. पहिला मानाचा तुरा संपूर्ण भारतात आपल्या खेड्याला मिळाला आहे.

क्षणचित्रे

१. या कार्यक्रमासाठी गावात आपापसांत मतभेद असणारेसुद्धा सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले होते.

२. ग्रामस्थांनी फलकाच्या अनावरणाची सिद्धता अत्यंत भावपूर्ण केली होती. फलकाजवळील भाग पारंपरिक पद्धतीने शेणाने सारवून त्यावर सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

३. फलकाचे अनावरण हिंदु संस्कृतीनुसार श्रीफळ वाढवून करण्यात आले.

४. हिंदु धर्मानुसार आचरण करण्याविषयीचे मार्गदर्शन ऐकल्यावर उपस्थित सर्वांनी लगेचच कपाळाला टिळा लावला.

५. पंचक्रोशीतील सर्व गावांना भेटी देऊन याविषयी जागृती करणार असल्याचे, तसेच त्या गावांतही असा फलक लावण्याविषयी तेथील धर्मप्रेमींना उद्युक्त करणार असल्याचे स्थानिक धर्मप्रेमी युवकांनी सांगितले. (असे धर्मप्रेमी, हीच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे ! – संपादक)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *