समारोपप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी
सोलापूर : शाळा आणि महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास शिकवला जायला हवा. हिंदु वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ यांचा आदर्श आपल्यासमोर आहे. हिंदूंचा इतिहास हा शौर्यशाली आहे. सध्या अनेक जण पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असल्याने हिंदु संस्कृतीचा र्हास होत असल्याने प्रत्येकाने धर्मशास्त्रानुसार कृती करणे आवश्यक आहे. काही दिवसांत येणार्या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्याही धर्मविरोधी आवाहनांना बळी न पडता शास्त्रानुसार गुढी उभी करूया. कोरोनासारख्या विषाणूमुळे हिंदु धर्मातील ‘नमस्कार’ करण्याचे महत्त्व जगाला ठाऊक होत आहे. त्यामुळे धर्मपालन करून धर्मरक्षण करूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी केले.
१२ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती, तसेच ५ ते ११ मार्च या कालावधीत झालेल्या शौर्य जागरण शिबिराचा समारोप कार्यक्रम बनशंकरीनगर येथे पार पडला. त्या वेळी ‘हिंदु धर्माची महानता, धर्माचरणाचे महत्त्व आणि हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता’ या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे हेही उपस्थित होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘रणरागिणी झाशीच्या राणीचा विजय असो’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ अशा घोषणा देण्यात आल्या. शौर्य जागरण शिबिरात सहभागी झालेल्या युवती आणि त्यांचे पालक उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
विशेष
१. कार्यक्रमानंतर अनुभवकथन करतांना युवतींच्या पालकांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले.
२. उपस्थितांनी त्यांच्या भागात धर्मशिक्षण वर्ग आणि मुलांसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी केली.
मनोगत
१. सौ. सुजाता जाधव – हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून युवतींनी स्वरक्षण कसे करावे आणि धर्मशिक्षण यांचे महत्त्व समजले.
२. श्री. महादेव वांगीकर – हिंदु जनजागृती समिती आणि अन्य संघटना युवकांचे चांगले संघटन करत आहेत.
३. कु. श्रुतिका जाधव – शारीरिक प्रशिक्षणासमवेत साधनेचे महत्त्व समजले, तसेच येथे आल्याने धर्मासाठी कृती करण्याचा निर्धार झाला.
४. कु. संजना चारी – शिबिरामध्ये सहभागी झाल्यामुळे आत्मविश्वास वाढला. मी नामजपही नियमित करत आहे.